ओबो : एक पश्चिमी वाद्य. पश्चिमी वाद्यवर्गीकरणानुसार त्याचा समावेश लाकडी वायुवाद्यात केला जातो. भारतीय शहनाईप्रमाणे ह्या वाद्यास दोन जिव्हाळ्या असतात. ह्या वाद्याचा आकार निमुळत्या नळीसारखा असतो. त्यात दोन संपूर्ण सप्तके असून वर सहा स्वरांपर्यंत मर्यादा असते. वाद्यवृंदातील इतर वाद्ये मिळवून घेण्यासाठी ओबोवर वाजविलेला ‘ए’ हा स्वर प्रमाण मानण्यात येतो. या ना त्या स्वरूपात हे वाद्य खिस्तोत्तर पहिल्या शतकापासून आढळते. तथापि ह्या वाद्याशी विशेष साम्य असलेले वाद्य १६६०च्या सुमारास फ्रान्सच्या चौदाव्या लुईच्या दरबारात होते. मोट्सार्टने आपल्या वाद्यवृंदात एक महत्त्वाचे वाद्य म्हणून त्याचा बराच उपयोग करून घेतला.
ओबो हे एक वाद्यकुलही असून त्यात कॉर आंग्ले, बसून, डबल बसून अशा काही वाद्यांचा समावेश होतो. लीअन, गुसेन्स, ईव्हलिन रॉथवेल, ईअन विल्सन हे आजचे काही प्रभावी ओबोवादक होत.
मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)