ओपेनहायमर, फ्रांट्स : (३० मार्च १८६४—३० सप्टेंबर १९४३). एक आधुनिक जर्मन समाजशास्त्रज्ञ. बर्लिनच्या उपनगरातील एका गरीब व उदारमतवादी ज्यू धर्मगुरूच्या कुटुंबात जन्म. बर्लिनमध्येच अनेक वर्षे वैद्यकीचा व्यवसाय. १९०८ साली अर्थशास्त्रातील कील विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी. १९०९ साली बर्लिन विद्यापीठात अर्थशास्त्राचे विनावेतन प्राध्यापक व पहिल्या महायुद्धाच्या वेळी युद्धखात्याचे आर्थिक सल्लागार. १९१९ ते १९२९ या काळात फ्रँकफर्ट विद्यापीठात समाजशास्त्राचे व अर्थशास्त्राचे प्राध्यापक. पुढे ग्रामीण भागातील एका सहकारी वसाहतीत वास्तव्य. १९३३ पासून अभ्यागत व्याख्याते म्हणून पॅरिस, पॅलेस्टाइन व अमेरिकेस अधूनमधून भेट.

न्याय्य समाजरचना, समाजशास्त्रातील मूलभूत नियम आणि समाजसुधारणेचा कार्यक्रम हे त्यांच्या विचारांचे तीन भाग आहेत. ओपेनहायमर यांच्या मते, समाजशास्त्र हे समाजाला जीव कल्पून समाज आणि सामाजिक प्रक्रिया यांविषयी काढलेल्या वेगवेगळ्या निष्कर्षांचे एकत्रीकरण करणारे एक सामान्य विज्ञान आहे. या भूमिकेतून समाजशास्त्राला वेगवेगळ्या घटनांसंबंधी काही सर्वसामान्य नियम प्रतिपादणे शक्य होते. तात्त्विक भूमिकेवरून सिद्ध झालेल्या न्यायसंकल्पनेच्या आधारे समाजपुरुषाची सर्वसाधारण अवस्था कोणती असावी, याबद्दल समाजशास्त्र अचूक अंदाज करू शकते. समाजपुरुषाची स्थिती न्याय्य आहे की नाही, हे व्यक्तिव्यक्तींतील अन्योन्यक्रियांमुळे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत मर्यादित होते, यावरून ठरविले जाते. न्यायसंकल्पनेच्या आधारे विविध घटनांचे मूल्यमापनही ते करू शकते.

राज्य, कायदे, सामाजिक वर्ग, खासगी मालमत्ता, एकाधिकार इत्यादींचा उदय आणि विकास यांच्यात सारखेपणा दिसून येतो, हा एक मूलभूत विचार ओपेनहायमर यांनी मांडला. समाजात एखादे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता संपूर्णत: अगर मुख्यत: आर्थिक साधनेच वापरली जातात असे नाही, राजकीय साधनेही वापरली जातात. जेत्यांनी पराजितांवर आर्थिक दास्य लादून स्वत:च्या हितसंबंधांच्या रक्षणाकरिता सत्तेची मक्तेदारी घेतली आणि इतर कायदे बनविले, तेव्हा आर्थिक विषमता आणि राज्य उदयास आले.

गावातून स्थलांतर करणाऱ्यांची संख्या ही जमीनदारांच्या हातात असलेल्या जमिनीशी समप्रमाणात आणि छोट्या शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीशी व्यस्त प्रमाणात असते, असाही एक नियम त्यांनी प्रतिपादन केला. सर्व विषमतेला कारण जमिनीचा एकाधिकार हाच आहे आणि यामुळेच समाजात न्यायाचा लोप झालेला आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे. तसेच गावातून होणारे स्थलांतर आणि नागरी औद्योगिक मजुरांची मजुरी यांत अन्योन्य संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजात न्यायाची प्रतिष्ठापना व्हावयाची  असल्यास सहकारी संघाशिवाय अन्य उपाय नाही, असे ओपेनहायमर यांचे मत, किंबहुना आग्रह असे. ग्रामीण सहकारी उत्पादकांची वसाहत हा त्यांचा आदर्श होता. या सहकारी प्रक्रियेची अंतिम परिणती जागतिक पातळीवर सर्व सहकारी संघांना सामावून घेणाऱ्या महासंघात होईल. हा महासंघ म्हणजे घटक राष्ट्रांतील अनुकरणीय वैशिष्ट्यांचा एक समन्वय ठरेल. ओपेनहायमर यांचे हे स्वप्न होते.

ओपेनहायमर यांनी वॉर्ड, गिडिंग्ज, गूमप्लाव्हिच, गोसेन, गोल्ट्स, वेबर इ. समकालीन व पूर्वीच्या अनेक विचारवंतांकडून जरी काही विचार उचलले असले, तरी अनेक विरोधी विचारांचा समन्वय साधून त्यांनी वरीलप्रमाणे नवे विचारही मांडलेले आहेत.

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी System der Soziologie (४ खंड, १९२२—३५ ), Der Staat (१९०८, इं. भा. द स्टेट, १९२६), Die Siedlungsgenossenschaft …… (१९२२) हे विशेष उल्लेखनीय होत. लॉस अँजेल्स येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, मा. गु.