ओपल : खनिज. अस्फटिकी. संपुंजित, कधीकधी वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराच्या), झुंबराकार, ग्रंथिल किंवा चूर्णाच्या स्वरूपात आढळते. भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान]. कठिनता ५·५ — ६·५. वि. गु. १·९ — २·२. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी, राळेसारखी, कधीकधी मोत्यासारखी. रंग दुधी किंवा पिवळा, लाल, उदी, हिरवा, करडा, निळा या रंगांच्या छटा. मलद्रव्यांमुळे रंग गडद होतो किंवा वर्णविलासही (एकाच नमुन्यात निरनिराळे रंग दिसणे) दिसतो. रा. सं. SiO2. nH₂O (पाणी १०% पर्यंत). सामान्यत: कमी तापमानास सिलिकायुक्त पाण्यामार्फत निक्षेपित झालेले (साचलेले) असते. ते अनेक प्रकारच्या खडकांतील पोकळ्यांत आढळते. ओपलाचे काही प्रकार दिसावयास सुंदर असून त्यांचा रत्न म्हणून उपयोग होतो. रत्न (खडा) या अर्थाच्या उपल या संस्कृत शब्दावरून नाव पडले.
ठाकूर, अ. ना.