ओडिसी नृत्य : ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यप्रकार. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. हा भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्यप्रकार मानला जातो. ओरिसातील नृत्यपरंपरा फार जुनी आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात खारवेल हा जैन राजा येथे राज्य करीत असता त्याने प्रजेच्या रंजनांसाठी ‘तांडव’ व ‘अभिनय’ हे नृत्यप्रयोग सादर केल्याचा उल्लेख उदयगिरी येथील हाथीगुंफेच्या शिलालेखात आढळतो. ह्याच काळात उभारलेल्या मंदिरांतील शिल्पांतूनही विविध नृत्याविष्कार शिल्पित केलेले आढळून येतात. नवव्या शतकापासून ओरिसामध्ये देवदासींची प्रथा सुरू झाली. त्यांना ‘महारी’ असे संबोधण्यात येई. ह्या ओडिसीच्या आद्यनर्तिका होत. पुरी येथील जगन्नाथमंदिरात नाचणाऱ्या महारींचे दोन संच होचे. त्यांपैकी एक ओडिसी व दुसरा तेलुगू होता. नवव्या शतकातील ‘नृत्यकेसरी’ व ‘गंधर्वकेसरी’ ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या राजांनी तसेच बाराव्या शतकातील अनंग भीमदेव ह्या राजाने नृत्य- संगीतास उत्तेजन दिले. त्यातून ह्या नृत्याचा विकास घडून आला. बाराव्या शतकातच महेश्वर महापात्र ह्याने आपल्या अभिनयचंद्रिका ह्या ग्रंथात ओडिसी नृत्याचे शास्त्रशुद्ध विवेचन केले. सोळाव्या शतकात महारींच्या जागी तरुण नर्तक देवळात नेमण्यात आले, ते ‘गोटिपुआ’ ह्या नावाने ओळखले जात. ते स्त्रीवेषात नृत्य करीत. ह्या महारी व गोटिपुआ ह्यांनीच ओडिसी नृत्याची परंपरा दीर्घकाळ चालू ठेवली. तथापि कालांतराने ह्या नृत्यप्रकाराचा र्हास होत गेला. अलीकडेच ह्या नृत्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे. दिल्ली येथील आंतरविद्यापीठीय युवकमहोत्सवस्पर्धेत हे नृत्य सादर करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध नर्तकी इंद्राणी रेहमान ह्यांनी दिल्ली येथे १९५८ मध्ये हे नृत्य सादर केले. त्यांनी भारतभर तसेच परदेशातही ह्या नृत्याचे प्रयोग करून त्यास लोकप्रियता मिळवून दिली. ओरिसा संगीत नाटक अकादमी, कलाविकास केंद्र आदि संस्थांचाही ह्या नृत्याच्या पुनरुज्जीवनास हातभार लागला आहे.
ओडिसी नृत्याचे स्वरूप : हा नृत्यप्रकार तांडव व लास्य या दोन भिन्न पद्धतींनी बनलेला आहे. लास्य नृत्यपद्धती मूळ महारींनी तयार केली आणि नंतर आलेल्या गोटिपुआंनी नृत्यात ताठरपणा आणला. चांडव पद्धती म्हणजे उद्धत अंगविक्षेपांनी केलेली जलद, जोरदार व झटकेबाज हालचाल. सर्व नृत्यांचे मूळ जरी समान असले, तरी नृत्यपद्धती व शास्त्र ह्या दृष्टींनी ओडिसी नृत्य इतरांहून भिन्न आहे. त्यातील प्रमुख नृत्यावस्था त्रिभंगी (शरीर तीन ठिकाणी वाकविल्यानंतर होणारी नृत्यावस्था ) व चौकभंगी ह्या प्रकारच्या असतात. अभिनयचंद्रिका या ग्रंथात महेश्वर महापात्र यांनी ओडू नृत्याच्या पुरातन प्रार्थनांच्या संदर्भात त्यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
ओडिसी नृत्यप्रकारात पुढील गोष्टी येतात : (१) पादभेद : स्तंभपाद, कुंभपाद, धनुपाद व महापाद हे ह्याचे चार प्रकार आहेत. पण परंपरेनुसार ते रेखापाद, नुपूरपाद व आश्रितपाद असेही मानले जातात. ह्यात पादक्रिया महत्त्वाच्या असतात. (२) भूमी : नर्तकाची रंगमंचावर हालचाल करण्याची पद्धती. तिचे आठ प्रकार आहेत. (३) चारी : वेगवेगळ्या प्रकारचे पदाघात. हे भूमीशी संबंधित असतात. (४) भ्रमरी : गिरक्या घेण्याचे प्रकार. एकपाद भ्रमरी, कुंचित भ्रमरी व अंग भ्रमरी हे भ्रमरीचे तीन प्रकार होत. (५) भंगी : प्रमुख नृत्यावस्था. उदा., त्रिभंगी, चौकभंगी इत्यादी. (६)हस्त किंवा मुद्रा : ह्या अर्थ व्यक्त करण्यासाठी नृत्यात वापरतात. यांचे एकूण ४८ प्रकार आहेत.
रंगभूषा : नर्तकाच्या सर्व अंगाला केशर लावण्यात येते. ‘गोरचना’ म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यासारखी नक्षी कपाळावरून खाली गालापर्यंत काढलेली असते. भुवयांच्या मध्यभागी कुंकुमतिलक असतो. हनुवटीवर छोटासा तीळ असतो. डोळे व भुवयांना काजळ तसेच हातांना कुंकू व बोटांना अलता लावतात.
वेशभूषा : साडीला ‘पट्टसाडी’ हे विशिष्ट नाव असून ती हिरव्या किंवा लाल रंगाची ‘रेशमी ’ नऊवारी असते. ‘कांचुला ’ म्हणजे लाल किंवा काळ्या रंगाचा, जरीची किनार असलेला पोलका. ‘निबिबंध ’ म्हणजे झालरी लावलेले वस्त्र. हे पार्श्वभागाकडून समोर आणून बांधलेले असते. दागदागिन्यांमध्ये पायांमध्ये घुंगूर, कमरेला बेंगपाटिया, मनगटात करकंकण, हातांत ताईत, गळ्यात चापसरी व पदकतिलक व डोक्यावर अलका असून अंबाड्यावर रत्नजडित जाळी असते.
संगीत : ह्या नृत्यातील विविध प्रकारांना अनुसरून भिन्न भिन्न रागतालांवर आधारलेले शुद्ध शास्त्रोक्त संगीत उपयोजतात. हिंदुस्थानी व कर्नाटक संगीत वापरात असले, तरी त्यांची वैशिष्ट्ये कटाक्षाने पाळली जातात. कविसूर्य बलदेव रथ, गोपीकृष्ण, उपेंद्र भंज इत्यादींच्या काव्यरचना संगीतात वापरल्या जातात. मर्दल (मृदंगाचा एक प्रकार), गिनी (झांजा), पखावज, वीणा, बासरी ही वाद्ये साथीला असतात.
ताल : ह्या धृवादी सप्ततालपद्धती वापरतात व त्यांतील विशिष्ट बोलांना ‘ अडसा ’ असे म्हणतात.
ओडिसीचे पुढीलप्रमाणे नृत्यप्रकार आहेत : (१) मंगलाचरण : हे आद्य नृत्य आहे. त्यात आणखी लहानसहान प्रकार असतात. उदा., पुष्पांजली, भूमिप्रणाम, वंदना इत्यादी. (२ ) पल्लवी : ह्यातील अंगविक्षेप काव्यात्मक असतात. त्यात संगीत व ताल ह्यांना समान महत्त्व असते. हे एका विशिष्ट रागावर आधारलेले असतात. त्यांत ‘नृत्त’ (शुद्ध नृत्य) असून नर्तक डोळे, भुवया व मान ह्यांच्या तालबद्ध हालचाली करतो. नर्तक प्रत्येक वेळी पुढचा प्रकार सुरू करण्यापूर्वी ‘थाई’ म्हणजे मूळ स्थानात येतो. बाह्यतः स्वरपल्लवी असे दोन भाग असले, तरी ते मूलतः एकच होत. वसंतपल्लवी व कल्याणपल्लवी विशेष प्रसिद्ध आहेत. (३) बाटू नृत्य: हा सर्वांत कठीण प्रकार मानला जातो. यात शुद्ध नृत्य असून ते भगवान शंकराच्या आराधनेसाठी केले जाते. ते बटुकभैरव म्हणून ओळखले जाते. त्याचे ६४ प्रकार आहेत. (४) अभिनय : ह्यात गीतावर आधारलेले भावनाविष्कार असतात. हा सर्वांत महत्त्वाचा प्रकार असून त्यात बहुधा राधाकृष्णाच्या क्रीडांवर तसेच गीतगोविंद ह्या काव्यरचनेवर आधारलेली नृत्ये केली जातात. त्यात शृंगार व भक्ति-रस ह्यांना प्राधान्य असते. तसेच दशावतारही विशेषत्वाने नृत्यांकित केले जातात. (५) मोक्ष नाट : हा अंतिम नृत्यप्रकार असून त्यात फक्त नृत्त असते. साथीला संगीत नसले, तरी तालांना विशेष महत्त्व असते.
शब्द स्वरपाठ हा प्रकार १९५५-५६ पर्यंत केला जात नसे पण १९५८ मध्ये हा प्रकार ‘शब्दनृत्य’ म्हणून केला जाऊ लागला. त्यात तांडव ह्या प्रकाराचा जोशपूर्ण आविष्कार असून शिवतांडव व गणेशतांडव हे प्रकार केले जातात. ‘बंधनृत्य’ हा एक मजेदार प्रकार असून त्याला फार जुनी परंपरा आहे. हा कसरतीचा व अवघड अंगविक्षेपांचा नृत्यप्रकार आहे. त्याचे अभिनयचंद्रिकेनुसार दहा प्रकार आहेत.
ओडिसी नृत्यप्रकारामध्ये आजपर्यंत मोहन महापात्र हे महारींचे शिक्षक, पद्मचरण दास हे गोटिपुआंचे शिक्षक तसेच मोहन गोस्वामी, पंकज चरण दास, देवप्रसाद दास, केलुचरण महापात्र, कालीचरण पटनाइक हे गुरू व इंद्राणी रेहमान, संयुक्ता पाणिग्राही, डॉ. कुमकुमदास, डॉ.विनती मिश्र, रीतादेवी, यामिनी कृष्णमूर्ती हे नर्तक-नर्तकी मान्यता पावले आहेत.
संदर्भ : 1. Bhavnani, Enakshi, The Dance in India, Bombay, 1965.
2. Marg Publications, Classical and Folk Dances of India, Bombay, 1963.
3. Singha, Rina Massey, Reginald, Indian Dances : Their History and Growth, London, 1967.
पार्वतीकुमार
“