ओडिया भाषा : भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या ओरिसा प्रांतातील ८५ टक्के लोकांची मातृभाषा ओडिया (उडिया) आहे. याशिवाय शेजारच्या आंध्र, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यांसारख्या परप्रांतांत कायमचे स्थायिक झालेले ओडिया भाषिक लोक पन्नास लाख असावेत. भारतातील ओडिया भाषिकांची एकूण संख्या १,५७,१९,३९८ (१९६९) आहे.

ओडिया ही एक आधुनिक आर्य भाषा असून तिला एक हजार वर्षांचा इतिहास आहे. ओडियातील सर्वांत जुना शिलालेख १०५१ चा असून तो उरजंग येथे सापडला. परंतु या भाषेचे व विशेषेकरून ‘उग्री’ या लिपीचे उल्लेख ललितविस्तरसारख्या बौद्ध ग्रंथांतून तसेच प्राकृतसर्वस्व  आणि प्राकृतचंद्रिका यांसारख्या प्राचीन व्याकरण ग्रंथांतून आढळतात. ओरिसातील राजांचे सहाव्या शतकापासूनचे बरेच कोरीव लेख ओरिसा व आंध्र राज्यांत अलीकडे मिळाले आहेत. या कोरीव लेखांची भाषा संस्कृत आहे परंतु त्यांवरील ओडिया भाषेचा प्रभाव त्यांतील शब्दसंपदा, त्यांचे विकार, विभक्तिप्रक्रिया व क्रियापदांची रूपे यांतून दिसतो. या संस्कृत लेखांत मध्येच ‘अचान्ति’, ‘कही’ यांसारखे शब्द दिसतात, त्यांवरून ओडिया भाषा ही स्वतंत्र भाषा म्हणून त्या काळी अस्तित्वात असावी असे वाटते. साहित्यिक भाषा म्हणून या भाषेचा उपयोग इ. स. १००० पासून झाल्याचे आढळते आणि त्याचा पुरावा बौद्ध संतांनी रचलेल्या चर्यागीतांत मिळतो. तथापि सूर्यवंशाच्या (१४३५ — १५३३) कारकीर्दीत ओडिया साहित्याने मूळ धरले व मोठ्या प्रमाणावर साहित्य रचले जाऊ लागले. सर्व पुराणे, महाभारत,रामायण, काही उपनिषदे, वेदान्त इत्यादींची या काळात ओडिया कवींनी भाषांतरे किंवा रूपांतरे केली. गेली पाच शतके ओडियातील साहित्यनिर्मिती अव्याहतपणे चालू आहे.

ओडिया ही तृतीय प्राकृत भाषा-गटातील भाषा असून ती प्रत्यक्षपणे पूर्व–मागधीपासून निघाली आहे. तसेच मैथली किंवा बिहारी भाषेशी तिचा जवळचा संबंध आहे. तथापि ओडिया भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव पडला आहे. दक्षिणेकडील द्राविडी भाषा, पूर्वेकडील टेकड्यांतील ऑस्ट्रिक भाषा, वायव्येकडील बंगाली व हिंदी यांचा प्रभाव पडल्यामुळे भिन्न भिन्न ठिकाणी तीत भिन्न भिन्न भाषिक परिवर्तने होणे साहजिक आहे. उदा., वत्री, छत्तीसगढी, लरिया, संबळपुरी व मिदनापुरी हे भेद. तथापि भाषाशास्त्रीय दृष्ट्या ओडिया भाषेच्या स्वतंत्र बोली नाहीत. त्यामुळे ही भाषा एकसंध आहे व ओरिसा प्रांतात कुठेही समजण्यास अडचण पडत नाही.

इ. स. १००० च्या आसपासच्या कोरीवलेखांत व चर्यागीतांत ओडिया भाषेचे जे नमुने मिळतात, त्यांवरून ही भाषा संश्लेषणात्मक असावी व तिचा विकास अन्य प्राकृत भाषांसारखाच झाला असावा असे दिसते. तथापि गेल्या पाचशे वर्षांच्या काळात तिचा विकास होऊन ती विश्लेषणात्मक बनली. सारळा दास, बलराम दास व जगन्नाथ दास यांसारख्या पंधराव्या व सोळाव्या शतकांतील कवींनी आपल्या महाकाव्यांत तिचा उपयोग केल्यामुळे तिची पृथगात्मता निश्चित झाली. त्यांची भाषा आजही आदर्श म्हणून लोकांपुढे आहे अर्थात शब्दसंग्रहाच्या बाबतीत आधुनिक ओडिया भाषेवर फार्सी, पोर्तुगीज, इंग्रजी व इतर यूरोपीय भाषांचाही परिणाम झाला आहे.

लिपी : अशोकाच्या कोरीवलेखांतील ब्राह्मी लिपीपासून ओडिया लिपी निघाली आहे. तिचा निर्देश ‘कलिंग लिपी’ असा केला जातो. कोरीवलेखांत सापडलेल्या ओडियाच्या सर्वांत जुन्या नमुन्यांवरून त्या लिपीला आद्य बंगाली म्हटले जाते. सध्याच्या लिपीत अक्षरांना वर जो गोल घाट आहे, तो त्यावेळी नव्हता. ओरिसाच्या जवळजवळ सर्व भागांत ताडपत्रावरील असंख्य हस्तलिखित ग्रंथ मिळतात. त्यांतील बरेच ग्रंथ ओरिसा संग्रहालय, उत्कल विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठ यांच्या ग्रंथालयांत जतन करून ठेवले आहेत. ताडपत्रावरील पोथ्यांत जी लिपी वापरली आहे, त्या लिपीला ‘करणी’ म्हणतात. मुद्रणकला सुरू झाल्यावर करणी लिपीतील बरीच जुनी वैशिष्ट्ये नाहीशी झाली [→ कलिंग लिपी].

उच्चारपद्धती : संस्कृतमधील बरीच रूपे ओडिया ध्वनिपद्धतीत राहिली असली, तरी द्राविडी भाषांच्या निकटच्या सात्रिध्यामुळे ओडिया भाषेची स्वतःची काही खास ध्वनिवैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. तीत अवयवांची विभागणी समप्रमाणात होते व स्वरांना प्राधान्य दिले जाते. अलीकडे शब्दांच्या अंत्य अवयवावर जोर देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. संस्कृतच्या तीन घर्षकांपैकी फक्त दंत्य ‘स’ च ओडियात राहिला आहे. ‘य’ आणि ‘व’ हे ध्वनीदेखील लुप्त झाले आहेत. ओडियात ‘ल’ चा उच्चार एका विशिष्ट तऱ्हेने होतो व संस्कृत ‘ऋ’ चा उच्चार ‘रू’ असा होतो. ओडियाच्या लेखनात आणि उच्चारात फारच थोडा फरक आहे.

रूपविचार आणि वाक्यरचना : शब्दसिद्धीच्या बाबतीत ओडियात बहुशः कमी अधिक प्रमाणात संस्कृतचे अनुकरण केले जाते. कधी कधी पूर्वप्रत्ययांऐवजी शब्दयोगी अव्ययाचा प्रयोग केला जातो. द्विवचन नाही आणि नामाप्रमाणे विशेषण चालवले जात नाही. बऱ्याच वेळा क्रियापदांचे धातुसाधित प्रत्यय लावून विशेषणे बनवली जातात. क्रियापद लिंगवाचक नसते. क्रियापदासंबंधी ओ. मॅलेट म्हणतात. ‘ओडिया क्रियापदे सोपी व पूर्ण आहेत. ओडियात अनेक काळांचा व्यापक व्यूह असला, तरी त्या सर्वांची मांडणी तर्कशुद्ध, नियमबद्ध आहे व धातुसाधित नामांची वर्तमान, भूत, भविष्य या काळांची सर्व रूपे ओडियात मिळतात’.

शब्दसंग्रह : ओडिया भाषेतील शब्द हे प्रामुख्याने संस्कृतपासून आले असून, द्राविडी, फार्सी, अरबी, पोर्तुगीज आणि इतर काही यूरोपीय भाषांमधूनही आलेले आहेत. यांशिवाय बरेच शब्द ‘देशज’ म्हणून ओळखले जातात. त्यांचे मूळ शोधून काढणे कठीण आहे. तथापि आता नष्ट झालेल्या किंवा वेगळ्या रूपात टोळीवाल्यांच्या भाषेच्या रूपाने शिल्लक राहिलेल्या प्राचीन भाषाकुलांतील भाषांमधून हे शब्द घेतले असावेत.

संदर्भ : 1. Beames, John, A Comparative Grammar of the Modern Aryan Languages of India, 3 Vols., London, 1872 – 79.

    2. Grierson, G. A. Linguistic Survey of India – Vol. V, Part II, Delhi, 1968.

    3. Miller, W. An English-Oriya Dictionary, Cuttack, 1873.

    4. Praharaj, Gopal Chandra, Purnachandra Bhasakosha.

    5. Sarma, Gopinath Nanda, Oriya Bhasatatva, 1927.

    6. Sutton, A. An Oriya Dictionary, 3 Vols., Cuttack, 1841.

    7. Tripathi, K. B. The Evolution of Oriya Language and Script.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर. द. स. (म.)