एस्प्राँथेदा, होसेदे : (२५ मार्च १८०८—२३ मे १८४२). स्वच्छंदतावादी स्पॅनिश कवी आणि क्रांतिकारक. जन्म पश्चिम स्पेनमधील आलमेंद्रालेहो या शहरी. आल्बेर्तो लिस्ता ह्या स्पॅनिश विद्वानाकडे शिक्षण. वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच तो क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावरू लागला. परिणामत: त्याला स्पेनमधील ग्वादालाहारा येथे तुरूंगवास भोगावा लागला. तेथून पळाल्यानंतर जिब्राल्टर, लिस्बन, लंडन, पॅरिस आदी ठिकाणी त्याने वास्तव्य केले. लंडनला असताना बायरनच्या काव्याचा त्याच्यावर प्रभाव पडला. १८३३ मध्ये स्पेनला आल्यानंतर सैन्यात तो एक अधिकारी झाला. १८३५—३६ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या क्रांतिकारी उठावात त्याने सक्रिय भाग घेतला. १८४१ मध्ये हेग येथील स्पॅनिश वकिलातीचा तो सचिव झाला. १८४२ मध्ये तो स्पेनच्या संसदेचा सभासद झाला. तथापि त्याच वर्षी माद्रिद्र येथे त्याचे निधन झाले.

Canto a Teresa, El Estudianate de Salamanka (१८३५, इं. भा. द स्टूडंट ऑफ सालामांका, १९१९), Eldiablo mundo (१८४० – ४१, इं. भा. द वर्ल्ड डेव्हिल, १९४२), Cancion del pirata ह्या त्याच्या विशेष महत्त्वाच्या काव्यरचना. त्याच्या काव्यावर नैराश्याची आणि भ्रमनिरासाची गडद छाया आहे. देशभक्ती आणि स्वातंत्र्याकांक्षा त्याच्या काव्यातून उत्कटपणे आविष्कृत झालेल्या दिसतात. ‘स्पेनचा बायरन’ म्हणून तो ओळखला जातो.

कुलकर्णी, अ. र.