श्लेगेल, आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन : (८ सप्टेंबर१७६७-१२ मे१८४५). जर्मन साहित्यिक. हॅनोव्हर येथे जन्म. त्याचे वडील प्रॉटेस्टंट धर्मगुरू होते. जर्मन नाटककार योहान एलीआस श्लेगेल हे त्याचे काका. हॅनोव्हरमध्ये शालेय शिक्षण घेऊन गटिंगन विदयापीठात त्याने१७८७ मध्ये प्रवेश घेतला, तेथे अभिजात भाषाशास्त्र व सौंदर्यशास्त्र ह्या विषयांचे अध्ययन केले. त्याने१७९१ मध्ये ॲमस्टरडॅममध्ये खासगी शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर१७९६ मध्ये तो येनाला ⇨फ्रीड्रिख फोन शिलरच्या  अल्पकालीन डाय होरेन नियतकालिकात लेखन करू लागला. आउगुस्ट आणि त्याचा धाकटा भाऊ ⇨फ्रीड्रिख फोन श्लेगेल ह्या दोघांनी आथेनेउम (१७९८-१८००) हे नियतकालिक काढून त्यातील लेखनाव्दारे जर्मनीत उदयाला येत असलेल्या ⇨ स्वच्छंदतावादीसंप्रदायाला भक्कम तात्त्विक पाया प्राप्त करून दिला.१७९८ मध्ये येना विदयापीठात आउगुस्ट प्राध्यापक झाला आणि लवकरच येना शहर हे स्वच्छंदतावादी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र बनले. तत्पूर्वी१७९६ मध्ये आउगुस्टचा विवाह कारोलिन मिखाएलस ह्या बुद्घिमान स्त्रीशी झाला, स्वच्छंदतावादी चळवळीत तिनेही महत्त्वाचा वाटा उचलला मात्र लवकरच१८०३ मध्ये तिने आउगुस्टपासून फारकत घेतली. त्यानंतर आउगुस्ट विख्यात फ्रेंच कादंबरीकार ⇨मादाम द स्ताल हिच्यासह जर्मनीतील विविध ठिकाणी, तसेच फ्रान्स, इटली आणि स्वीडन ह्या देशांच्या दौऱ्यावर गेला.१८१८ मध्ये तो बॉन विदयापीठात आला आणि अखेरपर्यंत साहित्याचा प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिला. तेथे त्याने संस्कृत साहित्याचे अध्यापन केले. संस्कृत गंथांच्या छपाईसाठी त्याने एक मुद्रणालय उभे केले आणि भगवद्‌गीता (१८२३) व रामायण (१८२९) यांच्या आवृत्त्या छापल्या. जर्मनीतील संस्कृतच्या अध्ययनाचा पाया त्याने घातला. Indische Bibkiothek (३ खंड,१८२०-३०) हे त्याच्या व्यासंगाची साक्ष देणारे नियतकालिक होय.

आउगुस्टवर जर्मन तत्त्वज्ञ ⇨योहान गोट्फ्रीट फोन हेर्डर ह्याचा प्रभाव होता. आपल्या ⇨शेक्सपिअरवरील निबंधात (१७७३) हेर्डरने शेक्सपिअरचा एक प्रतिभासंपन्न महापुरूष म्हणून गौरव केलेला होता. शेक्सपिअरच्या सर्व नाट्यकृती जर्मन भाषेत आणण्याची योजना श्लेगेलने आखली आणि स्वतः१७ नाटकांचा अनुवाद केला (१७९७-१८१०). शेक्सपिअरच्या उर्वरित नाटकांच्या अनुवादाचे काम जर्मन स्वच्छंदतावादी चळवळीतला एक प्रमुख साहित्यिक ⇨लूटव्हिख टीक आणि अन्य काहींनी पूर्ण केले. शेक्सपिअरच्या नाटकांतील वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाची पुनर्निर्मिती आपल्या जर्मन अनुवादांतून प्रभावीपणे करण्यात तो यशस्वी झाला. शेक्सपिअरच्या नाटकांचे श्लेगेलचे जर्मन भाषेतील अनुवाद हे प्रमाणभूत व आदर्श मानले जातात. स्पॅनिश नाटककार ⇨पेद्रो काल्देरॉन दे ला बार्का ह्याच्या नाटकांच्या अनुवादाचे कामही त्याने हाती घेतले होते पण ते अपूर्ण राहिले. ह्यांशिवाय प्राचीन ग्रीक नाटककार ⇨युरिपिडीझ ह्याच्या एका नाट्यकृतीवर आधारलेली आयन ही शोकात्मिकाही त्याने लिहिली. ती फारशी यशस्वी ठरली नाही तथापि विश्वसाहित्याच्या संकल्पनेची जडणघडण हे जर्मन स्वच्छंदतावादी चळवळीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होते आणि त्याचेच प्रत्यंतर आउगुस्टच्या ह्या सर्व प्रयत्नांतून येते.

श्लेगेलच्या कविता Gedichte (१८००) आणि Poetosche Werke (१८११) ह्या नावांनी प्रसिद्ध झाल्या तथापि त्यांचा फारसा प्रभाव साहित्यवर्तुळात पडला नाही.

व्हिएन्ना आणि बर्लिन येथे त्याने दिलेली कला-साहित्यावरील व्याख्याने मात्र गाजली आणि त्यांना यूरोपात कीर्ती प्राप्त झाली. त्याचे संकलित साहित्य बारा खंडांत प्रसिद्ध झाले आहे (१८४६-४७).

बॉन येथे त्याचे निधन झाले.

कुलकर्णी, अ. र.