ओझा, गौरीशंकर हीराचंद : (१८६३ — १९४०). एक भारतीय इतिहाससंशोधक व लेखक. राजस्थानातील पूर्वीच्या सिरोही संस्थानातील रोहेडा गावी जन्म. प्राथमिक शिक्षणानंतरचे त्यांचे शिक्षण मुंबईस झाले. तेथे त्यांनी संस्कृत व गुजराती भाषांचे ज्ञान मिळविले. पुढे आजारपणामुळे त्यांना इंटरच्या वर्गात असतानाच महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. वकिलीच्या अभ्यासाचा प्रयत्‍न त्यांनी अर्धवट सोडला. पुढे पुराणवस्तुसंशोधक डॉ. भगवानलाल इंद्रजींच्या सहवासात त्यांना प्राचीन लिप्या व नाणी यांच्या अभ्यासाचा छंद लागला. याच व्यासंगातून त्यांना उदयपूर (१८९२ – १९०८) व पुढे अजमीर येथील संग्रहालयांत अभिरक्षक म्हणून सरकारने नेमले. त्यांनी १८९४ मध्ये लिहिलेल्या भारतीय प्राचीन लिपिमाला या अपूर्व ग्रंथाबद्दल त्यांना १९२४ मध्ये मंगला प्रसाद पारितोषिक मिळाले. त्यांनी सोलंकियोंका प्राचीन इतिहास (१९०७), भारतवर्षके इतिहासकी प्राचीन सामग्री, टॉड चरित्र (१९०२), मध्यकालीन भारतीय संस्कृति (१९५१) इ. अनेक हिंदी पुस्तके लिहिली. राजपुताने का इतिहास (५ खंड, १९२५ — १९४१ या मालेत त्यांनी राजस्थानातील उदयपूर, जयपूर, बिकानेर, डुंगरपूर व सिरोही या संस्थानाचे इतिहास लिहिले. नागरी प्रचारिणी पत्रिकेचे संपादक (१९२०), भरतपूरच्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९२७) आणि भारतीय प्राच्य विद्यापरिषदेच्या बडोदे अधिवेशनात इतिहास विभागाचे शाखाध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता (१९३३). रायबहादुर (१९११) व महामहोपाध्याय (१९२८) या दोन पदव्याही त्यांना लाभल्या होत्या.

खोडवे, अच्युत