ऐखव्हाल्ट, कार्ल एडुआर्ट फॉन : (४ जुलै १७९८ — १० नोव्हेंबर १८७६). रशियन भूवैज्ञानिक व डॉक्टर. त्यांचा जन्म मीटाऊ (येलगाव्हा) येथे झाला. १८२३ साली कझॅन येथे त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी मिळविली व तेथेच प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्यांनी व्हिल्ना येथे (१८२७) तुलनात्मक शारीर (निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरांच्या संरचनेचा तुलनात्मक अभ्यास करणारे विज्ञान) व प्राणिविज्ञान आणि सेंट पीटर्सबर्ग येथे (१८३८) खनिजविज्ञान, मानवी वैद्यक, प्राणिविज्ञान व पुराजीवविज्ञान (पूर्वीच्या भूवैज्ञानिक कालखंडांतील प्राणिजीवनाचा अभ्यास करणारे विज्ञान)या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी मध्य आशिया, कॉकेशस, पर्शिया, स्वित्झर्लंड व स्कँडिनेव्हिया या प्रदेशांचा प्रवास करून शास्त्रीय दृष्टिकोणातून आपले प्रवासवर्णन लिहिले. शिवाय रशियाचे पुराजीवविज्ञान, खनिज संपत्ती व प्रणिविज्ञान या विषयांवरील त्यांचे लिखाणही प्रसिद्ध झालेले आहे. ते सेंट पीटर्सबर्ग येथे मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.