एस्किलस : (५२५ — ४५६ इ. स. पू.). ग्रीक नाटककार. जन्म इल्यूसिस येथे. डिमीटर ह्या ग्रीक देवतेचे हे प्रसिद्ध पूजास्थान. त्याचा पिता युफोरियन हा युपाट्रिडेस या अथेन्समधील जुन्या सरदारघराण्यातील एक धर्मोपदेशक होता. एस्किलसने मॅराथॉन, आर्टेमिसियॉन, सॅलामिस आणि प्लाटीया येथील लढायांत भाग घेतला होता. या लढायांतूनच ग्रीसला खरी लोकशाही प्राप्त करून घेता आली. एस्किलसने मॅराथॉनच्या युद्धात भाग घेतल्याचा उल्लेख त्याच्या थडग्यावरील समाधिलेखात आढळतो. आपल्या मृत्यूपूर्वी एस्किलसनेच ह्या समाधिलेखातील मजकूर लिहून ठेवला होता.
एस्किलसने सु. नव्वद नाटके लिहिली परंतु त्यांपैकी फक्त सातच आज उपलब्ध आहेत. सुप्लिसेस (इ. स. पू.सु. ४९०, इं. शी. सप्लायंट विमेन), पेर्से (इ. स. पू. ४७२, इं. शी. द पर्शियन्स), सेप्टेम (इ. स. पू. ४६७, इं. शी. सेव्हन अगेन्स्ट थीब्ज), प्रोमेथेउस तसेच ओरेस्टेइआ (इ. स. पू. ४५८). ओरेस्टेइआ ही एक नाट्यत्रयी असून त्यांत ॲगमेम्नॉन, केरोफे (इं. शी. लिबेशन बेअरर्स) आणि युमेनिडीझ या नाट्यकृतींचा समावेश होतो.
ॲगमेम्नॉनमध्ये ॲगमेम्नॉन हा ट्रॉयच्या युद्धावरून परत आल्यानंतर त्याची व्यभिचारी पत्नी क्लायटम्-नेस्ट्रा त्याचा खून करते, अशी कथा आलेली आहे.केरोफेमध्ये ॲगमेम्नॉनचा पुत्र ओरेस्टीझ हा आपल्या आईला ठार मारून पित्याच्या खुनाचा सूड कसा घेतो, हे दाखविले आहे आणि त्यानंतरचा कथाभागयुमेनिडीझमध्ये आला आहे. आईच्या खुनाबद्दल ओरेस्टीझला ॲरिऑपागसच्या न्यायासनासमोर खेचले जाते परंतु युमेनिडीझच्या हस्तक्षेपामुळे त्याची सुटका होते.
एस्किलसपूर्वीच्या ग्रीक रंगभूमीवर फक्त एकच पात्र आणि गायकवृंद (कोरस) असे. एस्किलसने दोन पात्रांची योजना करून खऱ्याखुऱ्या अर्थाने संवाद आणि नाट्यपूर्ण घटना रंगभूमीवर आणल्या. गायकवृंदातील गायकांची संख्या त्याने बरीच कमी केली आणि गाण्यापेक्षा संवादांना अधिक महत्त्व दिले. ग्रीक शोकात्मिकेचे आज आपणास परिचित असलेले स्वरूप मुख्यत: एस्किलसनेच तिला दिले आहे. नेपथ्य आणि रंगभूषा यांतही त्याने विकास घडवून आणला. ग्रीक रंगभूमीचा जनक, असे त्याला सार्थपणे संबोधण्यात येते. जीला येथे तो मरण पावला.
संदर्भ : Murray, Gilbert, Aeschylus – The Creator of Tragedy, Oxford, 1962.
हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)