एसाकी, लिओ : (१२ मार्च १९२५ —  ). जपानी भौतिकविज्ञ व सुरंग अथवा एसाकी द्विप्रस्थाचे [→ अर्धसंवाहक] संशोधक. त्यांचा जन्म ओसाका (जपान) येथे व शिक्षण टोकिओ विद्यापीठात झाले. या विद्यापीठातून त्यांनी १९४७ मध्ये एम. एस. व १९५९ मध्ये अर्धसंवाहकातील (धातू व विद्युत् निरोधक यांच्यामध्ये ज्यांची रोधकता आहे अशा पदार्थातील) सुरंग परिणामासंबंधीच्या संशोधनाबद्दल पीएच. डी. या पदव्या मिळविल्या. पीएच. डी.च्या प्रबंधाचे काम करीत असतानाच त्यांनी सॉनी कॉर्पोरेशन या उद्योगसंस्थेत नोकरी धरली (१९५६). १९६० मध्ये ते अमेरिकेतील इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स (आय बी एम) या सुप्रसिद्ध उद्योगसंस्थेच्या टी. जे. वॉटसन रिसर्च सेंटरमध्ये संशोधन कार्यात सामील झाले.

 

एसाकींनी शोधून काढलेल्या एसाकी द्विप्रस्थाचा संदेशवहन, संगणक (गणित कृत्ये करणारे यंत्र) आणि इतर इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींमध्ये उपयोग होतो. एसाकी यांना त्यांच्या शोधाबद्दल निशिमा मेमोरियल ॲवॉर्ड, आसाही प्रेस ॲवॉर्ड, टोयो रेयॉन फाउंडेशन ॲवॉर्ड, जॅपनीज ॲकॅडेमी ॲवॉर्ड ही जपानी पारितोषिके व इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ एंजिनियर्स या संस्थेचे मॉरिस एन्. लिबमान मेमोरियल प्राइझ व फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे बॅलन्टाइन ॲवॉर्ड ही अमेरिकन पारितोषिके मिळाली आहेत.

शिरोडकर, सु. स.