संदेशवहन : दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान तारांव्दारे किंवा बिनतारी उपकरणांव्दारे ध्वनी, विद्युत् चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगांमार्फत माहिती, ज्ञान अथवा जाणीव प्रेषित वा स्थलांतरित करण्याच्या क्रियेला मुख्यत्वे विज्ञानात संदेशवहन म्हणतात. दूरसंदेशवहन हा याचा पर्यायी शब्द असला, तरी अशा दोन स्थानांमधील अंतर दीर्घ असल्यास तो वापरणे उचित ठरते. स्थूलपणे संदेशवहनात माहिती एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे, एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे अथवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविली जाते. सर्वसामान्य भाषेत सांगायचे झाल्यास संदेशवहन ही घटनांची शृंखला आहे आणि संदेश हा या शृंखलेतील अर्थपूर्ण दुवा असतो. या लेखात मानवातील संदेशवहनाची माहिती आली आहे. प्राण्यांमध्ये होणाऱ्या संदेश-वहनाची माहिती मराठी विश्वकोशा तील ‘प्राण्यांमधील संदेशवहन’ या नोंदीत देण्यात आलेली आहे.

संदेश हे एखादया संस्कृतीमधील सांकेतिक, प्रतीकात्मक किंवा प्राति-निधिक असे अर्थपूर्ण आकृतिबंध असतात. मानवी जीवन, सामाजिक वर्तन व संस्कृती यांमधील संदेशवहनाचे कार्य सर्वाधिक गुंतागुंतीचे व आगळेवेगळे असते. हात, मेंदू , डोळे, कान व तोंड ही मानवी संदेशवहनाची व बौद्धीक कार्याची प्रमुख जैव साधने आहेत.

माहितीचे इतरांबरोबर वाटेकरी होणे आणि बोलून, लिहून किंवा इतर पद्धतींनी रंजन करणे व करविणे म्हणजे संदेशवहन होय. व्यक्तिगत संदेशवहन हे सर्वांत महत्त्वपूर्ण अनुरंजन असते. जेव्हा मोठया समूहाला संदेश पाठविले जातात तेव्हा सामूहिक संदेशवहन (जनसंचारण) होते. का संदेशवहनाचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. पुस्तके हे सामूहिक संदेशवहनाचे सर्वांत जुने, तर दूरचित्रवाणी हे एक सर्वांत नवीन साधन आहे. यांशिवाय वर्तमानपत्रे, मासिके व अन्य नियतकालिके तसेच रेडिओ, चित्रपट, नाटक, लोककला ही सामूहिक संदेशवहनाची इतर काही साधने आहेत. यांव्दारे माहिती अनेकजणांपर्यंत पाठविता येते. भूकंप, पूर, निवडणुकीचे निकाल किंवा इतर महत्त्वपूर्ण घटनांच्या बातम्या सामूहिक संदेशवहनामुळे काही मिनिटांत असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारे घरीदारी, शाळेत, महाविदयालयात, कार्यालयात, व्यवसाय व उदयोगधंदयात, तसेच जागतिक घडामोडींत अनेक मार्गांनी संदेशवहनाचा उपयोग केला जातो. थोडक्यात व्यक्तिगत संदेशवहनाविना माणूस कदाचित दीर्घकाळ तग धरू शकणार नाही आणि सामूहिक संदेशवहनाशिवाय आधुनिक समाजाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकेल.

आधुनिक गतिमान संदेशवहन पुढे येण्याआधी देशांतर्गत बातम्यांचा प्रसारही संथ गतीने होत असे. यात बातमी कळण्यास उशीर झाल्याने काही कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. १८१२ साली तारायंत्रविदया वा दूरध्वनी असते, तर त्या वर्षी ब्रिटन व अमेरिका यांच्यात युद्ध झालेच नसते. अमेरिकेच्या जलवाहतुकीत ब्रिटन हस्तक्षेप करते हे या युद्धामागील एक कारण होते आणि म्हणून अमेरिकेने १८ जून १८१२ रोजी ब्रिटनविरूद्ध युद्ध घोषित केले. याच्या दोनच दिवस आधी ब्रिटनने आपण अमेरिकेच्या जलवाहतुकीत हस्तक्षेप करणार नाही, असे घोषित केले होते. जहाजामार्फत ही बातमी अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेत पोहोचायला जास्त वेळ लागला आणि तोपर्यंत युद्ध सुरूही झाले होते. १८५५ सालची न्यू ऑर्लीअन्सची लढाई जर गतिमान संदेशवहन असते, तर टळू शकली असती. कारण शांतता करार होऊनही तो लवकर न समजल्यामुळे ही लढाई झाली आणि तिच्यात ३१५ लोक मृत्युमुखी पडले व सु. १,२९० जण जखमी झाले.

गतिमान संदेशवहनाचे वाईट परिणामही होऊ शकतात. कारण त्यातील संदेश काळजीपूर्वक उलगडण्यात चूक झाली, तर अनर्थ होऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिका व तिच्या दोस्त राष्ट्रांनी जपानला रेडिओव्दारे पुढील संदेश पाठविला होता : “ जपान शरण न आल्यास जपानी लोकांना ‘ताबडतोब होणाऱ्या भीषण अशा विनाशाला’ सामोरे जावे लागेल “. जपानी अधिकाऱ्यांचा याला उत्तर देण्याचा इरादा होता. मात्र त्यांना विचार करायला अधिक वेळ हवा होता. म्हणून त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. याऐवजी त्यांनी दिलेल्या उत्तरातील एका शब्दाचा अर्थ ते या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतील असा होत होता. याऐवजी त्यांनी दुसऱ्या शब्दांत उत्तर दिले असते, तर कदाचित अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकण्याचे टाळले असते. या दुर्घटनेत १ लाख ३२ हजार स्त्री-पुरूष व मुले बळी पडली वा नाहीशी झाली. अशा प्रकारे संदेशवहनातील अपयश (किंवा त्रूटी) हे या भीषण घटनेमागील एक कारण असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

संदेशवहनामुळे जग जवळ आले किंवा लहान झाले असे पुष्कळदा म्हटले जाते.जेव्हा यूरोपातील संदेश पोहोचायला अनेक आठवडे लागत असत तेव्हा जग फारच मोठे वाटत असे, आता रेडिओमार्फत आपल्याला माणसाचा आवाज जगात कोठेही सेकंदाच्या अल्प भागात पोहोचू शकतो. एखादी व्यक्ती याच वेगाने जगात कोठेही असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधू शकते. संदेशवहन उपगहांमुळे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम जगभर दाखविता येतात. नोबेल पारितोषिकांचे वितरण, आंतरराष्ट्रीय करारांवर सह्या करण्याचे कार्यक्रम, राजकारणी व इतर मंडळींच्या वार्ताहर परिषदा यांसारख्या दुसऱ्या खंडांत होणाऱ्या घटना प्रेक्षक आपल्या घरात बसून पाहू शकतो. महत्त्वाच्या घटनांचे अहवाल, दैनिके, नियतकालिके, संदर्भगंथ इत्यादींची माहिती रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट यांसारख्या माध्यमांमुळे घरबसल्या मिळू शकते.

संदेशवहनाचा इतिहास : इतिहासपूर्व काल : प्रत्यक्ष शब्दांचा विकास होण्याच्या फार पूर्वी माणूस परस्परांतील संदेशवहनासाठी ध्वनी, हावभाव व हातवारे यांचा वापर करीत असावा. पुष्कळांच्या मते निसर्गातील ध्वनीच्या (उदा., प्राण्यांचे भुंकणे, वाऱ्याचा भणाणणारा आवाज, समुद्राची गाज) अनुकरणातून भाषा पुढे आली असावी. नवाश्मयुगातील मोठया सामाजिक बदलांतून आजच्यासारखी भाषा पुढे आली असावी. निसर्गाचे निरीक्षण, खास व्यवसाय, स्थिर जीवन प्रणाली यांतून शब्दसंग्रह वाढत गेला. मानवी संस्कृतीतील घटकांना अनुसरून भाषा अनुरूप होत गेली. युद्घे व साम्राज्य विस्तार यांतून नंतरच्या काळात भाषेचा प्रसार झाला. उदा., रोमन साम्राज्यातील लॅटिन भाषेचा प्रसार.

भाषेबरोबरच ड्रमसारख्या वादयांचे आवाज, आग (विस्तव), धूर यांचा सांकेतिक पद्धतीने वापर करूनही आपापसात संदेश पाठवीत, कारण हे संकेत आधीच ठरवून नक्की केलेले असत. गीक नाटककार एस्किलस यांच्यानुसार ट्रॉयच्या पाडावाची बातमी मायसेनी (गीस) येथील राजवाडयात असलेल्या राणीला इ. स. पू. १०४८ साली पाठविली गेली व त्याकरिता बाराहून अधिक पर्वतशिखरांवरील आगींची मालिका वापरण्यात आली होती.


लिखित भाषेची सुरूवात चित्रे व आकृत्या काढण्याने झाली असावी उदा., गुहांमधील, तसेच आफ्रिका व आर्क्टिक येथील खडकांवर चितारलेली व कोरून काढलेली चित्रे व खाणाखुणा पुराणाश्मयुगीन आहेत. लेखनासाठी चित्रलिपीचा वापर सर्वप्रथम सुमेरियन लोकांनी इ. स. पू. सु. ३५०० मध्ये केला. परिचित वस्तूंसाठी उपयुक्त ठरलेली चित्रलिपी नवीन वस्तू व असाधारण कल्पना यांसाठी गैरसोयीची ठरली. हळूहळू प्रत्येक चिन्ह हे वस्तूचे वा कल्पनेचे प्रतीक न मानता ते ध्वनीचे प्रतीक म्हणून वापरण्यात येऊ लागले. यामुळे बोलीभाषेतील कोणताही शब्द लिहिणे शक्य झाले. अशा प्रकारे खुणा व ध्वनी यांच्यातील दरी सुमेरियन लोकांनी भरून काढली. त्यांना भारतीय, ईजिप्शियन व सेमाइट लोकांची या कामी मदत झाली.

संदेशवहनातील सर्वांत महत्त्वाच्या शोधांमध्ये बोली भाषेनंतर लेखनाचा कम लागतो. निरोप घेऊन जाणाऱ्या जासूदाच्या स्मरणशक्तीवर न विसंबता दूरवरच्या लोकांबरोबर संदेशांची देवाणघेवाण करणे लेखनामुळे शक्य झाले. शिवाय अशी माहिती नंतर वापरण्यासाठी राखून ठेवणेही शक्य झाले. इ. स. पू. सु. ५०० मध्ये बॅबिलन येथे मृत्तिकेच्या दंडगोलावर पाचरीसारखी चिन्हे उमटवून ð क्यूनिफॉर्म लिपी त लेखन करीत. वस्तूंचे निदर्शन करण्याच्या पद्धतीनंतर लिखित भाषेत सांकेतिक अर्थ वा आशय व्यक्त होऊ लागला. लेखनाच्या शोधाने इतिहासपूर्व काळ संपला व लिखित इतिहासाचे युग सुरू झाले.

प्राचीन काळ : या काळात दूरवर संदेश पाठविण्यासाठी मुख्यत: लेखनाचा उपयोग करीत. श्रीमंत व व्यापारी व्यावसायिक संदेशवाहक नोकरीला ठेवीत. ते पायी, घोडयावरून वा जहाजातून प्रवास करून संदेश पोहोचवीत. सेनाधिकारी संदेशवहनासाठी प्रशिक्षित कबुतरे वापरीत. प्राचीन रोमन लोक दैनिक घटना हाताने कागदावर लिहीत, याला ‘ॲक्टा डायअर्ना ’ हे नाव होते. याच्या अनेक प्रती ते रोज काढीत व त्या लोकांना वाचायला उपलब्ध करून दिल्या जात.

मध्ययुग : इ. स. सु. ४०० ते १४०० या काळात थोडेच लोक लेखन-वाचन करू शकत. हे बहुतेक लोक चर्चशी निगडित असल्याने संदेशवहनावर क्रिश्चन धर्माचा मोठा प्रभाव पडला. परिणामी बहुतेक लेखन व पुस्तके धार्मिक विषयांवरील असत. लेखन करणारे बहुधा धर्मगुरू असत. ते शब्दश: लेखन करून पुस्तकांच्या प्रती तयार करीत.

यूरोपात व इटलीत व्यापारी संघ सुरू झाल्यावर नंतर खाजगी टपाल सेवा सुरू झाली. १४६४ साली फ्रान्समध्ये सरकारी टपाल सेवा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार सुलभ होण्यासाठी पहिल्या एलिझाबेथ राणीने ब्रिटिश पोस्ट ऑफिस स्थापन केले. अर्थात या मध्ययुगानंतरच्या घटना आहेत.

छपाईचा प्रारंभ : इ. स. सु. १३०० पासून १६०० पर्यंतच्या काळात मोठया प्रमाणावर बौद्धीक कामे झाल्याने याला प्रबोधन काळ म्हणतात. या काळातील बौद्धीक जागृतीमुळे हाताने नक्कल करून काढलेली पुस्तके सर्व वाचकांना मिळत नसत. पौर्वात्य देशांत हलते टंक (खिळे), शाई, कागद, हाताने चालवावयाचे दाबयंत्र या गोष्टी बऱ्याच आधीपासून माहीत होत्या. इ. स. सु. १००० सालापासून आशियात हलत्या टंकांनी छपाई होत असे. म्हणजे यूरोपात माहीत नसलेली ही मुद्रणकला तेथे पंधराव्या शतकात आली व तिचा प्रसार झाला. जर्मनीत ð योहान गूटेनबेर्क यांनी अनेक शोध एकत्रितपणे वापरून नवीन मुद्रण पद्धती तयार केली. त्यांनी रंगद्रव्य, रंगलेप व इतर द्रव्यांपासून छपाईची शाईही बनविली. त्यांनी यूरोपातील पहिला छापखाना मेंझ (जर्मनी) येथे उभारला.

छपाई हे लगेचच सामूहिक संदेशवहनाचे सर्वांत महत्त्वाचे साधन झाले. मात्र छपाई ही सैतानाकडून आलेली अमंगळ (काळी) जादू मानून पुष्कळ लोकांना तिची भीती वाटत असे. कारण पुस्तके इतकी झटपट कशी तयार होतात आणि सर्व प्रती एकसारख्या कशा असतात, हे त्यांना कळत नसे. लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सुरूवातीला ⇨ बायबल व इतर धार्मिक पुस्तके छापण्यावर भर देण्यात आला. यामुळे अनेकांना ती वाचायला उपलब्ध झाली. यामुळे रोमन कॅथलिक चर्चच्या विशिष्ट धर्मकार्याविषयी काहींच्या मनात शंका येऊ लागल्या. अशा रीतीने रोमन कॅथलिक चर्चमध्ये सुधारणा करण्याच्या चळवळीतून प्रॉटेस्टंट चर्चची स्थापना झाली. या काळात छपाईचा यूरोपात व इतरत्र झपाटयाने प्रसार झाला.

सोळावे व सतरावे शतक : व्यवसायांतही मुद्रणकला वापरली जाऊ लागली. छापील व्यापारी बातमीपत्रांना ‘कोरंट’ म्हणत. त्यांत बहुतेक बातम्या व्यापाराविषयीच्या असत. उदा., कोणते जहाज बंदराला लागले आहे, त्यात कोणता माल आहे इत्यादी. शिवाय त्यांत जाहिरातीही असत. नेदर्लंड्स, इंग्लंड इ. व्यापारी देशांत ती निघत. व्हेनिसमध्ये छापील प्रासंगिक बातमीपत्रे ‘ गेझेट्टा ’ या छोट्या नाण्याला विकत मिळत. लंडनमध्ये ‘ऑक्सफर्ड गॅझेट’ हे असे पहिले इंगजी बातमीपत्र १६६५ साली निघाले. यांमध्ये नंतर इतरही बातम्या येऊ लागल्याने वर्तमानपत्राचा जन्म झाला. फँकफुर्टर झीटंग (१६५५) हे पाश्र्चात्त्य जगतातील सर्वांत जुने बातमीपत्र होय. ‘डेली कोरंट’ हे पहिले इंगजी दैनिक १७०२ साली निघाले. सतराव्या शतकात छपाईचा प्रसार चालूच राहिला. पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादींमुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत माहिती पोहोचू लागली. पत्रांव्दारेही लोक माहितीची देवाण-घेवाण करीत व अनेक देशांत टपाल सेवा सुरू झाली. मात्र तरीही संदेशवहनाची गती प्राचीन काळाप्रमाणे संथच होती. बातम्यांचा प्रवास हा माणसाच्या पायी, घोडयांवरून अथवा जहाजातून होणाऱ्या प्रवासाच्या गतीप्रमाणे सावकाश होई.

एकोणिसाव्या शतकाचा प्रारंभ : या काळात अनेक शोध लागून संदेशवहनात कांती घडून आली. १८११ साली जर्मन मुद्रक फीड्रिख कोएनिग यांनी छपाई यंत्र चालविण्यासाठी वाफेचे एंजिन वापरून छपाईचा वेग शेकडो-पट वाढविला. वाफेच्या एंजिनावर चालणारे जहाज व चालक यंत्र (लोको-मोटिव्ह) या शोधांमुळे माणसांचा व बातम्यांचाही प्रवास अधिक जलदपणे होऊ लागला. मात्र संदेशवहनाची गती विद्युत् तारायंत्राच्या शोधानंतर खऱ्या अर्थाने जलद झाली. कारण तारायंत्रविदयेमुळे तारांमार्फत संदेश काही सेकंदांत धाडता येऊ लागला. या काळात डेन्मार्क, जर्मनी, ग्रेट ब्रिटन व इतर देशांतील संशोधकांनी विविध तारायंत्रे बनविली. अखंडपणे विजेच्या पुरवठयचा अभाव आणि वापरायला अवघड हे यंत्रांमधील दोष होते.

अमेरिकेतील चित्रकार व संशोधक सॅम्युएल एफ्. बी. मोर्स यांनी विद्युत् तारायंत्रावरील संशोधन १८३०-४० दरम्यान केले. ते व त्यांचे भागीदार ॲल्फेड व्हेल यांनी साधे तारायंत्र बनविले आणि १८३७ साली त्याचे एकस्व घेतले. यामध्ये विद्युत् घटमाला व विद्युत् चुंबक यांव्दारे सतत विद्युत् प्रवाह निर्माण होत असे. यांतून टिंब व रेघ (कड्ऽ कट्) यांच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठविला जाई. या सांकेतिक भाषेला मोर्स संकेतावली म्हणतात. याव्दारे २४ मे १८४४ रोजी ‘व्हॉट हॅथ गॉड रॉट’ हा पहिला संदेश वॉशिंग्टनहून बॉल्टिमोरला पाठविला. अशा प्रकारे बातमी विजेच्या वेगाने पाठविणे शक्य झाले. या तंत्रविदयेचा वर्तमानपत्रांसाठी लगेचच वापर होऊ लागला. या तंत्रात फक्त तारांमधून संदेश पाठविता येतो. अटलांटिकपार जाणारी अशी पहिली सफल केबल १८६६ मध्ये टाकण्यात आली. यामुळे संदेश काही मिनिटांतच अटलांटिकपार पोहोचू शकत असे. [→ तारयंत्रविदया].


दृश्य प्रतिमा मुद्रित करणाऱ्या छायाचित्रण तंत्रामुळे संदेशवहनाला आणखी साहाय्य झाले. अनेक अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच वैज्ञानिकांच्या प्रयत्नांमधून छायाचित्रणाचा विकास झाला. फ्रेंच भौतिकीविद झोझेप निसेफॉर न्येप्स यांनी पहिले कायमचे छायाचित्र तयार केले (१८२६). फ्रेंच चित्रकार ल्वी झाक मांदे दागेअर यांनी १८३०-४० दरम्यान दागेअरोटाइप हा छायाचित्रणाचा नवा सुधारित प्रकार विकसित केला. याच सुमारास ब्रिटिश संशोधक विल्यम हेन्री फॉक्स टॉलबट यांनी धातूच्या पट्टीऐवजी कागदी ऋण प्रत (निगेटिव्ह) वापरली. ही लवचिक ऋण प्रत वापरण्याची कल्पना छायाचित्रणाची गुरूकिल्लीच ठरली. [→ छायाचित्रण].

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध : या काळात टंकलेखन यंत्र, दूरध्वनी, फोनोगाफ, चलच्चित्रपट तंत्र वगैरे शोधांमुळे संदेशवहनात अनेक सुधारणा झाल्या. छपाईमुळे लिखित संदेशवहनाचे प्रमाणीकरण झाले. यातून १८६६ साली टंकलेखन यंत्र पुढे आले [→ टंकलेखन यंत्र]. तारायंत्र वापरात आल्यावर आवाज तारेमार्फत धाडण्याची शक्यता पुढे आली. एकाच तारेवरून अनेक वेगवेगळे संकेत पाठविण्याचा प्रश्र्न सोडविताना दूरध्वनीचा शोध लागला. यामुळे सांकेतिक संदेश व आवाज दूरवर पाठविता येऊ लागला. २ जून १८७५ रोजी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी तारेव्दारे ध्वनिप्रेषण प्रथम केले. ३ जून १८७५ रोजी टॉमस ए. वॉटसन यांनी बेल यांच्या मार्गदर्शना-खाली प्राथमिक स्वरूपाचा पहिला दूरध्वनी तयार केला. १० मार्च १८७६ रोजी बेल यांनी ‘ मिस्टर वॉटसन कम हिअर, आय वाँट यू ’ हा ऐतिहासिक दूरध्वनी केला. १८९० पर्यंत बेल यांची दूरध्वनी पद्धत अमेरिकेत व यूरोप मध्ये विस्तृत-पणे वापरली जाऊ लागली. १८९२ पर्यंत स्थानिक दूरध्वनी केंद्रे स्थापली गेली. त्याआधी तबकडी प्रकारच्या दूरध्वनी प्रणालीचे एकस्व ए. बी. स्ट्रॉगे यांनी घेतले होते (१८८९). [→ दूरध्वनिविदया].

टॉमस आल्वा एडिसन या अमेरिकन संशोधकांनी चालविता येईल असा पहिला फोनोगाफ १८७७ साली तयार केला. यावर वर्खाने आच्छादिलेल्या दंडगोलावर ध्वनिमुद्रण केले होते. जर्मनीतून अमेरिकेत आलेल्या एमिल बर्लिनर यांनी सु. १८८७ साली शोधलेल्या फोनोगाफमध्ये दंडगोलाऐवजी ध्वनिमुद्रिका वापरली होती. या तंत्रविद्येमुळे संदेश टिकवून ठेवता येऊ लागला व तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुद्रित रूपात पाठविणे शक्य झाले. अशा रीतीने संदेशवहनात काल व अंतर यांच्यावर मात करणे शक्य झाले.

हानिबाल डब्ल्यू. गुडविन या अमेरिकन क्रिस्ती आचार्यांनी १८८७ साली छायाचित्रणाची चिवट पण लवचिक फिल्म तयार केली. छायाचित्रण सामगीचे उत्पादक जॉर्ज ईस्टमन यांनी ही फिल्म १८८९ साली वापरात आणली. ईस्टमन फिल्म वापरून एडिसन व अन्य संशोधकांनी १८९०-१९०० दरम्यान चलच्चित्रपट प्रक्षेपणात यश मिळविले. चित्रांचे सचेतनीकरण व दृष्टिसातत्य यांमुळे चलच्चित्रण शक्य झाले. एडिसन यांनी १८९४ साली हे यंत्र बनविले. त्यात ध्वनी व चित्र यांतील दुवा जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

तारांमधून पाठविलेले संदेश तेवढाच काळ टिकत म्हणून दृक् व श्राव्य संकेतांचे मुद्रण व पुनरूत्पादन करण्याविषयीचे प्रयोग सुरू झाले. यातून कॅमेरा ऑब्स्क्यूरा व मॅजिक लँटर्न ही उपकरणे पुढे आली. १९२०-३० दरम्यान मुद्रित ध्वनी व हलती प्रतिमा यांत दुवा स्थापण्यात आला. फिल्मच्या कडेवर ध्वनिमुद्रणासाठी अरूंद प्रकाशकीय मार्ग ठेवण्यात आला. प्रक्षेपकात प्रकाशविद्युत् घटाच्या मदतीने ध्वनि-पुनरूत्पादन होऊ लागले. चुंबकीय पद्धतीने ध्वनिमुद्रण होऊ लागले. [→ चलच्चित्रपट तंत्र ध्वनिमुद्रण व पुनरूत्पादन].

इलेक्ट्रॉनीय युगाचा प्रारंभ : एकोणिसाव्या शतकाअखेरीस संदेशवहनात पुन्हा एकदा कांती घडून आली. त्या सुमारास दूरवरच्या संदेशवहनासाठी केवळ तारायंत्र व दूरध्वनी वापरीत. या दोन्ही बाबतींत संदेश तारांमार्फत पाठविले जात आणि ते खाजगी व मर्यादित असत. या सुमारास अवकाशातून संदेश पाठविण्यासाठी इलेक्ट्रॉनिकी ही विज्ञान व तंत्रविदया यांची शाखा वापरात आली. इलेक्ट्रॉनिकीमुळेच आधुनिक संदेशवहनातील रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाईल फोन (भ्रमण दूरध्वनी), व्हिडिओमार्फत संभाषण (कॉन्फरन्सिंग) इ. आश्चर्यकारक शोध लागले.

इलेक्ट्रॉनीय संदेशवहनाच्या विकासाला अनेक वैज्ञानिकांच्या कल्पना व प्रयोग कारणीभूत झाले आहेत. १८६४ साली ब्रिटिश भौतिकीविद जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी विद्युत् चुंबकीय तरंग अवकाशातून प्रकाशवेगाने प्रवास करतात, हा सिद्धांत मांडला. १८८२ च्या सुमारास जर्मन भौतिकीविद हाइन्रिख र्हट्झ यांनी केलेल्या प्रयोगांवरून अशा तरंगांचे अस्तित्व सिद्ध झाले व हे तरंग घन पदार्थातून जाऊ शकतात, हेही दिसून आले. १८९५ साली इटालियन संशोधक मार्केझे गूल्येल्मो मार्कोनी यांनी मॅक्सवेल, र्हट्झ व इतरांच्या संशोधनाचे अवकाशातून संदेश पाठविण्यासाठी एकत्रीकरण केले. याला मार्कोनी यांनी बिनतारी तारायंत्रविदया असे नाव दिले, तर यालाच सामान्यपणे रेडिओ (संदेशवहन) म्हणतात. यामुळे संदेशवहनाचे संदेशप्रेषण झाले व यावरून प्रेषण (ब्रॉडकास्टिंग) हा शब्द आला. मोर्स संकेतावली व रेडिओ तरंग लक्षात घेऊन मार्कोनी प्रयुक्तीव्दारे प्रथम मोर्स संकेत प्रेषित करण्यात आले (१८९५). १९०१ साली मार्कोनी उपकरणाने पॉल्‌ड्यू येथून नोव्हास्कोशा येथे गेलेला पहिला अटलांटिकपार संदेश ‘S’ (एस अक्षर) हा होता. याच वर्षी आलियक्सांदर पपॉव्ह या रशियन संशोधकांनीही असाच प्रयोग केला होता.

इ. स. १९०६ मध्ये रेजिनाल्ड ए. फेसंडेन या भौतिकीविदांनी बिनतारी तारायंत्राला तोंडासमोर धरून बोलण्याची माऊथपीस ही प्रयुक्ती जोडली. अशा रीतीने मानवी आवाज प्रेषित करणारे ते एक पहिले संशोधक ठरले. त्याच वर्षी नाताळच्या संध्येला रेडिओ चालविणाऱ्या अनेकांना फेसंडेन यांचे पहिले रेडिओ प्रेषण गहण करायला (ऐकायला) मिळाले. मोर्स संकेतावलीतील कड् ऽ कट् ऐवजी नाताळचे संगीत व बायबल वचने ऐकून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. रेडिओमुळे खाजगी वा गुप्त संभाषणात व्यत्यय येतो हा आक्षेप हळूहळू मागे पडत गेला आणि रेडिओवर जाहिराती प्रेषित करण्याचे प्रमाण वाढत गेले.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी ली डी फॉ रेस्ट व इतर विद्युत् अभियंत्यांनी विविध प्रकारच्या निर्वात नलिका नावाच्या प्रयुक्त्या तयार केल्या. या प्रयुक्त्या रेडिओ संकेत ओळखतात व त्यांचे विवर्धनही करतात. निर्वात नलिकांमुळेच आधुनिक रेडिओ यंत्रणेचा विकास होऊ शकला.१९०८ साली अनेक प्रायो-गिक रेडिओ केंद्रे सुरू झाली. त्यांपैकी पुष्कळ केंद्रे अभियांत्रिकीय प्रशाला व विदयापीठे यांच्याशी संलग्न होती. इतर अनेक देशांतही लवकरच अनेक रेडिओ केंद्रे अचानक पुढे आली. १९२२ साली न्यूयॉर्क शहरातील डब्ल्यूईएएफ या रेडिओ केंद्राने सदनिकांची (अपार्टमेंटची) विक्री करणाऱ्या एका कंपनीला शुल्क घेऊन आपली जाहिरात करायला परवानगी दिली. [→  रेडिओ प्रेषण].


आधुनिक संदेशवहनाचा विकास : अवकाशातून चित्र प्रेषित करण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकातही झाले होते. मात्र याची प्रत्यक्ष कार्यकारी प्रणाली १९२६ साली विकसित झाली. स्कॉटिश अभियंते जॉन लोगी बेअर्ड यांनी दूरचित्रवाणी प्रेषणाची शक्यता निदर्शनास आणली. १९३६ साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने (बीबीसीने) जगातील पहिले खुल्या मंडलातील प्रेषण सुरू केले. रेडिओ कार्पो रेशन अमेरिका (आता आरसीए) या संस्थेने १९३९ साली दूरचित्रवाणी प्रेषण नियमितपणे सुरू केले. जन्माने रशियन असलेले अमेरिकन भौतिकीविद व्ह्‌लड्यीम्यिर कझ्यमा इव्हॉऱ्यक्यिन यांनी परिपूर्ण रूप दिलेले सुधारित दूरचित्रवाणी कॅमेरे व इलेक्ट्रॉनीय चित्र-नलिका आरसीएने वापरल्या. १९४२ च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दूरचित्रवाणी कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आले होते. महायुद्धानंतर त्यांचे प्रेषण परत सुरू झाले. १९५२ च्या सुमारास अमेरिकेत व यूरोपमध्ये दूरचित्रवाणी केंद्रांची संख्या झपाटयाने वाढली. सर्व देशांमधील दूरचित्रवाणी जाळ्यांसाठीचा बहुतेक निधी शासनाकडून मिळत असे. [→ दूरचित्रवाणी ].

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व्हाल्डेमार पूलसन या डॅनिश अभियंत्यांनी पोलादी तारेवर ध्वनिमुद्रण करणारे यंत्र शोधले. मात्र त्याच्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले. १९३०-४० दरम्यान चुंबकीय फितीवर ध्वनिमुद्रण करणारे ध्वनिमुद्रक यंत्र बनविण्यात आले. अशी ध्वनिमुद्रित फीत उलटी नेऊन परत वाजविता येते म्हणजे तिच्यातून मुद्रित ध्वनीचे पुनरूत्पादन होते. फोनोगाफमध्ये असे करता येत नाही.

दृश्य फीत मुद्रक (व्हिडिओ टेप रेकॉर्डर) यंत्र १९५०- ६० दरम्यान विकसित झाले. यात चित्रे व ध्वनी चुंबकीय फितीवर मुद्रित होतात. सुरू-वातीला ही उपकरणे फक्त दूरचित्रवाणी केंद्रावरच वापरीत. मात्र १९७०- ८० दरम्यान कॅसेटच्या रूपातील दृश्य फीत मुद्रक पुढे आले. त्यामुळे असे मुद्रण स्वस्त होऊन घरात वापरता येऊ लागले. अशी कॅसेट दूरचित्रवाणी संचात घालून पाहता येते. नंतर अशा कॅसेटच्या जागी काँपॅक्ट डिस्क (सीडी) वापरात आल्या. यामुळे दीर्घ (मोठे) कार्यक्रम थोडक्या जागेत मुद्रित करणे शक्य झाले. परिणामी दूरचित्रवाणी कार्यक्रम मुद्रित करून ठेवून ते नंतर कधीही पाहणे शक्य झाले. १९८२ च्या सुमारास व्हिडिओ डिस्क (व्हीडी) पुढे आल्या. या तबकड्यांवर आधीच मुद्रित केलेली चित्रमालिका व ध्वनी खास प्रकारच्या पुनरूत्पादक साधनाने (चालकाने प्लेयरने) जोडलेल्या दूरचित्रवाणी संचावर प्रेषित करता येतात.

संदेशवहन उपगहांव्दारे १९६० साली जमिनीवरील केंद्रांदरम्यान प्रथम दूरचित्रवाणी संकेत टप्प्याटप्प्याने पाठविले गेले (रीले केले). त्याआधी हे संकेत फक्त केबलव्दारे किंवा संकेत प्रबलित करणाऱ्या रिले (अभिचालित्र) मनोऱ्यांव्दारे पाठविता येत असत. संदेशवहन उपगहांमुळे दूरचित्रवाणी संकेत सागरपार पाठविणे शक्य झाले. रेडिओ, दूरध्वनी व इतर संदेशवहनाचे प्रेषणही संदेशवहन उपग्रह प्रेषित करू शकतात. यातून जागतिक वर्तमान- पत्रे पुढे आली (उदा., १९६२ साली न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राची पृष्ठे पॅरिसला प्रेषित करण्यात आली). यामुळे जग जवळ आले व संदेशवहनाचा व्याप जगड्व्याळ झाला.

अनेक वृत्तपत्रे व इतर प्रकाशक यांनी १९७०-८० या दशकात संगणकीकृत संपादन व अक्षरजुळणी पद्धती वापरायला सुरूवात केली. लेखक व संपादक संगणकाला जोडलेल्या कळफलकाच्या साहाय्याने लेख सरळ टंकित करू शकतात. याच वेळी टंकित शब्द संगणकात साठविले जातात व ते संगणकाच्या दर्शक पडदयावर पाहताही येतात. हा संगणक प्रकाश – अक्षरजुळणी यंत्राला (फोटो कंपोझिशन मशीनला) जोडलेला असतो. कळफलकावरील कळीला स्पर्श करून यंत्राव्दारे लेख छायाचित्रीय पटलावर उमटतो.

अनेक उत्पादकांनी १९८२ च्या सुमारास भ्रमण दूरध्वनी (सेल्यूलर मोबाइल फोन) बाजारात आणले. या पद्धतीत शहराचे अनेक भाग करतात. या भागाला ‘ सेल ’ म्हणतात. या प्रत्येक भागात कमी शक्तीचा प्रेषक व ग्राही (ग्राहक) बसविलेला मनोरा उभारलेला असतो. दूरध्वनी (कॉल) एका भागातून दुसऱ्या भागात जातो तेव्हा तेथील मनोऱ्यावरून दूरध्वनी संगणक एका ग्राहीकडून व प्रेषकाकडून लगतच्या दुसऱ्या ग्राहीकडे पाठवितो. दूरध्वनीची अशीच वाटचाल पुढे चालू राहते. संभाषणात कोणताही व्यत्यय न येता हे कार्य पुढे चालू राहते.

अनेक उदयोग १९८८ च्या सुमारास अनुचित्र प्रेषण प्रक्रिया (फॅसिमल किंवा फॅक्स) वापरू लागले. यामुळे संदेशवहनाची गती वाढली. फॅक्स यंत्र दूरध्वनी तारांमार्फत दस्तऐवज, मजकूर, चित्रे, आकृत्या इत्यादींच्या प्रतिमा प्रेषित करते आणि स्वीकारते (गहण करते). याव्दारे चित्रे व मजकूर ही दोन्ही त्यांच्या प्रतींच्या (नकलांच्या) रूपात पुनरूत्पादित होऊ शकतात. [→ अनुचित्र – प्रेषण].

भावी काळातील संदेशवहन : यात कदाचित लेसर (तीव्र प्रका-शाच्या अरूंद शलाकांच्या रूपातील ऊर्जा) याच्या विविध प्रकारांचा उपयोग होऊ शकेल. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच तंतुप्रकाशकी (फायबर ऑप्टिक्स) या भौतिकीच्या शाखेमुळे विद्युत् आणि रेडिओ तरंगांऐवजी प्रकाश तरंगांच्या मदतीने अधिक संदेश, अधिक जलदपणे पाठविणे शक्य झाले आहे. तंतुप्रकाशकी संदेशवहनात लेसर शलाकेव्दारे दूरध्वनीवरील आवाजाचे किंवा दूरचित्रवाणीवरील चित्रांचे विद्युत् संकेत प्रकाशाच्या आवेगात (संवेगात) परिवर्तित होतात. अगदी बारीक, पारदर्शक प्रकाशतंतूच्या एका टोकातून लेसर लक्ष्याकडे पाठविले जातात. या प्रकारात सुस्पष्टता व तीव्रता कमी न होता प्रकाश अशा तंतूंमधून दीर्घ अंतरापर्यंत जाऊ शकतो. गहण करणाऱ्या ग्राही अगापाशी (टोकाशी) एका प्रयुक्तीच्या साहाय्याने लेसरचे मूळ ध्वनी व चित्रे यांच्यात परिवर्तन होते. प्रकाशतंतूंच्या केसाएवढया बारीक जुडग्यातून एकाच वेळी हजारो दूरध्वनी बोलावे (कॉल्स) व दूरचित्रवाणी कार्यक्रम जाऊ शकतात.[→ लेसर].

होलोग्राफी या त्रिमितीय स्वलेखन छायाचित्रण पद्धतीतही लेसर वापरतात. शलाका विभागणाऱ्या प्रयुक्तीने एका लेसर शलाकेच्या दोन शलाका होतात. यांपैकी एक शलाका छायाचित्र घ्यावयाच्या वस्तूवर पडते. मग आरशांमार्फत दोन्ही प्रकाशशलाका एकत्र येतात. तेथे त्या वस्तूंच्या आकाराशी तुल्य असा त्रिमितीय आकृतिबंध तयार होतो. अखेरीस अशा रीतीने होलोग्राफी अवकाशात तरंगत असलेल्या त्रिमितीय प्रतिमांचे चित्रपट, छायाचित्रे, दूरचित्रवाणी कार्यक्रम इ. तयार करण्यासाठी वापरता येते. जणूकाही ही खरोखरची दृश्ये असल्याप्रमाणे प्रेक्षक त्रिमितीय होलोग्राफीक प्रतिमांभोवती चालू , फिरू शकतील आणि प्रेक्षक हालत असताना त्यांना नवीन कोनातून प्रतिमा दिसतील. [→ होलोग्राफी].


संदेशवहनाचा अभ्यास : इतिहासकार, शिक्षणतज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, गणिती, मस्तिष्कवैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ इ. विविध क्षेत्रांतील व्यक्ती संदेशवहनाचा शोध घेतात व अभ्यास करतात. कॅनडाचे मार्शल मॅकलूहान हे सामूहिक मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी त्याविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. उदा., द गूटेनबेर्क गॅलॅक्सी (१९६२), अंडरस्टँडिंग मीडिया (१९६४) वगैरे. त्यांनी सामूहिक माध्यमांचे समाजावर होणारे परिणाम अभ्यासले आहेत. सामूहिक संदेशवहनाचे स्वरूप, प्रक्रिया व परिणाम यांच्या सैद्धांतिक विकासाला व संशोधनालाही मर्यादा नाहीत. प्रतीकात्मक निर्मिती तसेच व्यक्ती, गट व सामूहिक संदेशवहनासारख्या विविधांगी आविष्कारांसाठी सर्वमान्य असा एकच एकीकृत मार्ग उपलब्ध नाही.

सामाजिक मानसशास्त्रज्ञ हॅड्ली कँटि्नल व समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट के. मेर्टन यांनी जनतेवर रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषणांच्या होणाऱ्या परिणामांचे अध्ययन केले. समाजशास्त्रज्ञांना सामूहिक संदेशवहन हे सामाजिक एकी साधणारे वाटते. कामातील टोकाच्या विशेषीकरणाने व्यक्तींमधील परस्परसंबंध तुटक वा कमकुवत होऊन एकलकोंडा समूह तयार होऊ शकतो व त्यात मानसशास्त्रीय तुटकपणा येतो. समाजापासून तुटलेल्या अशा व्यक्तींना सामूहिक संदेशवहनातून मार्गदर्शन होऊ शकते.

संक्रांतिविज्ञान व अवगम सिद्धांत : सजीवांची तंत्रिका तंत्रे (मज्जा-संस्था) व यंत्रांच्या नियामक यंत्रणा यांच्यामार्फत अवगम (माहिती) कसा प्रेषित (संकमित) होतो, याचा अभ्यास संक्रांतिविज्ञानात (सायबरनेटिक्स-मध्ये) होतो. पुन:प्रदाय (फीडबॅक) हा संक्रांतिविज्ञानाचा महत्त्वाचा भाग आहे. जीव व प्रयुक्ती (उपकरण, साधन इ.) पुन:प्रदाय प्रक्रियेने स्वत:चे नियमन करतात. अमेरिकी गणिती ⇨ नोरबर्ट वीनर यांनी संक्रांतिविज्ञानाचा विकास केला आणि त्यांचे सायबरनेटीक्स हे पुस्तक १९४८ साली प्रसिद्घ झाले. याच्याशी निगडित असलेल्या ð अवगम सिद्धांत विषयक विज्ञा- नाचा विकासही याच सुमारास झाला आणि तो अमेरिकन गणिती क्लॉड ई. शेनॉन व वॉ रेन वीव्हर यांनी केला. संदेशवहनाचे नियमन करणाऱ्या नियमांशी अवगम सिद्धांत निगडित आहे. विशेषत: संदेशाच्या प्रेषणात हस्तक्षेप करणाऱ्या घटकांशी हा सिद्धांत निगडित आहे. या दोन्ही विज्ञानशाखांचे संगणकशास्त्राच्या विकासातील कार्य महत्त्वाचे आहे आणि संदेशवहनातील संगणकाचा वाढता वापर सुपरिचित आहे. [→ संक्रांतिविज्ञान].

पहा : अनुचित्र-प्रेषण अवगम सिद्धांत उपग्रह संदेशवहन केबल गंथ ग्रामोफोन चित्रपट छायाचित्रण तारायंत्रविदया दूरचित्रवाणी दूरध्वनिविदया दूरमापन दूरवर्ती नियंत्रण प्रणाली मुद्रण रेडिओ ग्राही रेडिओ प्रेषण रेडिओ संदेशवहन प्रणाली लेसर वृत्तपत्रविदया संक्रांतिविज्ञान सूक्ष्मतरंग.

संदर्भ : 1. Bittner, J. R. Fundamentals of Communication, Englewood Cliffs, N. J., 1988.

           2. Budd, R. W. Ruben, B. D. Eds. Beyond Media: New Approaches to Mass Communication, Brunswick, (N. J.), 1988.

           3. Comstock, G. Ed. Public Communication and Behaviour, Vol. 2, New York, 1989.

           4. Defleur, M. L. Ball- -Rokeach, S. Theories of Mass Communication, New Delhi, 1981.

           5. Katz, E. Lazarsfeld, P. F. Personal Influence: The Part Played by People in the Flow of Mass Communications,

                New York, 1964.

           6. Larson, C. U. Communication: Everyday  Encounters, 1981.

           7. Lowenthab, L. Literature and Mass Culture, Brunswick, (N. J.), 1984.

           8. MacLuham, M. The Gutenberg Galaxy: The Making of Typographic Man, Bergenfield, 1969.

ठाकूर, अ. ना.