एल्बर्झ पर्वत : इराणचे पठार व कॅस्पियन समुद्र ह्यांना विभागणारी इराणमधील मोठी पर्वतश्रेणी. हिची सरासरी उंची २,७४३ मी. असून डेमॅव्हेंड हे सर्वांत उंच (५,४८६ मी.) शिखर आहे. एल्बर्झ रशियन सीमेजवळ २४ किमी. ते तेहरानच्या पूर्वेस १२१ किमी. पर्यंत रुंद आहे. तो अराकस नदीखोऱ्यापासून ईशान्य इराणमधील आला दा पर्वतश्रेणीपर्यंत १,०४१ किमी. लांब आहे. आर्मेनियन पर्वतश्रेणी आणि हिंदुकुश व पामीर ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पर्वतश्रेणींमध्ये एल्बर्झची गणना होते. आल्प्स व हिमालय पर्वतश्रेणींप्रमाणे एल्बर्झ मध्यतृतीय युगात टेथिस समुद्रतळावरील चुनखडीच्या मोठाल्या गाळथरांच्या संपीडन व वलीकरण क्रियांमुळे निर्माण झाला. एल्बर्झमध्ये अप्पर जुरासिक व क्रिटेशस चुनखडकांचे थर, लोअर जुरासिक पंकशैल व कोळशाचे पातळ थर, काळे परमॉकार्बोनिक चुनखडक, डेव्होनियन युगातील लाल वालुकाश्म, मायोसीन काळातील मृत्तिका व चुनखडक आणि ग्रॅनाइट ह्यांचे थर आढळतात. विविध काळांतील अग्‍निजन्य खडकही विपुलतेने आढळतात. इओसीन लाव्हारसाचे प्रवाह पश्चिमेकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर दिसतात. एल्बर्झमधील ३,६५० मी. पेक्षा उंच पर्वतरांगांचे स्वरुंप ठळकपणे आल्प्ससदृश आहे. यांपेक्षा कमी उंचीच्या पर्वतरांगांमध्ये कडे, पठारे व दऱ्या आढळतात. बहुतेक दऱ्या खोल व निरुंद असून त्या बव्हंशी खिंडींप्रमाणेच भासतात.

साफिद रुंद नदीचे खोरे आणि गडूक खिंड (२,२९८ मी.) ह्यांच्यामुळे एल्बर्झचे तीन भाग पडतात. पश्चिमेला कॅस्पियनकडे उतरत गेलेली तालिश पर्वतश्रेणी जास्तीत जास्त ३,००० मी. उंच, १९३ किमी. लांब व २४ –– ४० किमी. रुंद आहे. ३८५ किमी. लांबीचा मध्यभाग पश्चिमपूर्व पसरला आहे. याच भागात डेमॅव्हेंड हा मृत ज्वालामुखी आहे. केंडाव्हन खिंड (सु. ३,००० मी.) व चालूस रस्ता ह्यांच्या दोन्ही बाजूंस या भागातील सर्वांत उंच शिखरे आहेत. ४,८२१ मी. उंचीचे तख्त-इ-सुलेमान व डेमॅव्हेंड ही शिखरे नेहमी बर्फाच्छादित असतात व त्यांवरुंन हिमनद्या वाहतात. गडूक खिंडीच्या पूर्वेकडील भाग नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने ४८ किमी. पर्यंत रुंद व ४६५ किमी. लांब गेलेला आहे. या भागातील शाहकूह पर्वत मात्र ३,६५७ मी. उंच आहे.

एल्बर्झचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उत्तर व दक्षिण भागांत आढळणारा मोठा फरक हे होय. उत्तर भागात दक्षिण भागापेक्षा प्रचंड हिमवर्षाव व पर्जन्यवृष्टी होते. ह्यामुळे दोन्ही भागांतील वनस्पतींमध्येही कमालीची विषमता आढळते. २,४०० मी. पेक्षा कमी उंचीच्या उतारावर कॅस्पियनच्या किनारी प्रदेशापर्यंत दाट अरण्ये पसरलेली आहेत. घनदाट अरण्ये व त्यातच अधूनमधून शेतजमिनीचे पट्टे आढळतात. पायऱ्यापायऱ्यांची भातशेती येथे प्रामुख्याने चालते. ओक, बीच, मॅपल व इतर वृक्ष आणि अनेक फळबागा आहेत. उत्तरेकडील ही वनस्पती-विपुलता व दक्षिणेकडील भागात आढळणारा कोरडेपणा व रखरखीतपणा यांमधील विरोध फार जाणवतो. घरांच्या रचनेतही फरक दिसतो. बहुतेक इराणी खेड्यांतून दिसणाऱ्या मातीच्या विटांच्या घरांऐवजी उत्तरेकडील भागात दगडाची व लाकडाची घरे आढळतात. उन्हाळ्यात उंचावरील भागात, हिरव्यागार कुरणांवर चराईसाठी सखल भागातील भटक्या टोळ्या व खेडूत शेळ्या, मेंढ्या व गाईगुरे घेऊन जातात.

एल्बर्झमध्ये बिटुमिन कोळसा व कच्चे लोखंड हीच काय ती महत्त्वाची खनिजे आहेत. शामशाक व झिराब येथे दोन आधुनिक कोळसाखाणी आहेत. कॅस्पियन व अंतर्भाग ह्यांमध्ये पूर्वी खेचरांवरुंन मालवाहतूक होई. १९६० च्या सुमारास एल्बर्झमध्ये अनेक मोटाररस्ते झाले असून ट्रान्स-इराणियन लोहमार्ग गडूक खिंडीतून गेलेला आहे. केंडाव्हन खिंडीतून तेहरान-चालूस मार्ग आणि साफिद रुंद खोऱ्यातून काझ्वीनरेश्त हा मोटारमार्ग जातो. १९६० च्या सुमारास या भागात दोन धरणे बांधण्यात आलेली आहेत. एल्बर्झमधील लोक जुन्या पर्शियन वंशाचे असून त्यातच कुर्द, तुर्की व अरब भटक्या व स्थिर टोळ्यांची भर पडलेली आहे. झोरोस्ट्रिअनांचे आश्रयस्थान, डेलामाइट साम्राज्याचे मूलस्थान आणि दहशती इस्माइली असॅसिन टोळ्यांचे अभेद्य वसतिस्थान म्हणून एल्बर्झ पर्वताला इराणच्या इतिहासात महत्त्व आहे.

एल्बर्झमधील अनेक विस्तृत प्रदेश दुर्लंघ्य आहेत. एकोणिसाव्या शतकात या पर्वतातील अनेक भागांचे शोध लावण्यात येऊन व काहींचे नामकरण होऊनही आज गिर्यारोहक या पर्वतास क्वचितच भेट देतात.

गद्रे, वि. रा.