एलुरू : आंध्र प्रदेश राज्याच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे व पूर्वीच्या मद्रास इलाख्यातील कृष्णा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,२७,०४७ (१९७१). कृष्णा गोदावरी कालव्यांच्या संगमावर हे वसले आहे. शहराच्या उत्तरेस सु. १३ किमी. वर पेड्डावेंगी येथे प्राचीन वेंगी या चालुक्यांच्या राजधानीचे अवशेष आहेत. नागार्जुनाचे शिष्य आर्यदेव व दिङ्‍नागाचार्य यांचे प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ वेंगीलाच असल्याने येथे बरेच बौद्धावशेष सापडले आहेत. तेथील दगड घेऊनच नंतर इस्लामी आक्रमकांनी एलुरूचा किल्ला बांधला. ओरिसाच्या गजपती राजांकडून १५१५ मध्ये विजयानगरच्या कृष्णदेवरायाने घेतलेले हे नगर, नंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाही सुलतानाने जिंकले. राजमहेंद्रीच्या पाडावानंतर हे जिल्ह्याचे ठाणे झाले. काही काळ येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेची छावणी होती. कोलेरू तलावाभोवतालच्या दलदलीकाठच्या या शहराची हवा अतिउष्ण आहे. भोवतालच्या प्रदेशातील शेतमालाची ही बाजारपेठ असून येथे कातडी कमावण्याचे कारखाने, तांदूळ सडण्याच्या गिरण्या तसेच सिमेंट, कीटकनाशके, होजियरी, प्‍लॅस्टिक वस्तू, फर्निचर, सुगंधी द्रव्ये वगैरेंचे उद्योग आहेत. तंगेल्लमुडी उपनगरात सुप्रसिद्ध एलुरू गालिचे तयार होतात. दक्षिण रेल्वेवर व सडकेने विजयवाड्याच्या ईशान्येस सु. ५० किमी. वर एलुरू आहे.

ओक, शा. नि.