खल्जी घराणे : खल्जी लोकांनी आपले वर्चस्व वाढवून दिल्ली येथे १२९०–१३२० ह्या काळात सत्ता प्रस्थापित केली. अफगाणिस्तानातील हे खल्जी मूळचे तुर्क असले, तरी हिंदुस्थानातील तुर्क त्यांना अफगाण समजत. मामलूक सुलतानांच्या पडत्या काळात खल्जी लोक बलवान झाले. फीरूझशाह खल्जी हा खल्जी घराण्याचा संस्थापक. या घराण्यात तीस वर्षांच्या काळात एकूण सहा राज्यकर्ते होऊन गेले. (१) जलालुद्दीन फीरूझशाह खल्जी (१२९०–१२९६), (२) रूक्नुद्दीन इब्राहीम (१२९६-तीन महिने), (३) अलाउद्दीन मुहम्मद खल्जी (१२९६–१३१६), (४) शिहाबुद्दीन उमर (१३१६-सहा महिने), (५) कुत्बुद्दीन मुबारकशाह (१३१६–१३२०) व (६) खुस्रवशाह (१३२०).
फीरूझ खल्जी हा १२९० मध्ये जलालुद्दीन असे नाव धारण करुन दिल्लीच्या सिंहासनावर बसला. दुसऱ्याच वर्षी कारा-माणिकपूरचा सुभेदार, बल्बनचा पुतण्या मलिक छाजू व ठग यांनी सुलतानाविरुद्ध बंड पुकारले. फीरूझने त्यांच्याविरुद्ध सैल धोरण अंगीकारले. याउलट सीदी मौला या धर्मगुरूने बंड केले, तेव्हा त्यास ठार मारले. १२९२ मध्ये झालेल्या मोगलांच्या स्वारीचा त्याने प्रतिकार केला परंतु ऐनवेळी त्याच्याशी तह करून तो मोकळा झाला. स्वभावाने तो थंड व दयाळू होता. याच्या कारकीर्दीत, त्याचा पुतण्या ⇨ अलाउद्दीन खल्जी याने माळव्यात स्वारी करून बरीच लूट मिळविली. सुलतानाने त्यास कारा येथे सुभेदार नेमले. अलाउद्दीनने १२९४ मध्ये दक्षिणेत देवगिरीचा राजा रामचंद्रदेव यादव याविरुद्ध स्वारी करून त्याचा पराभव केला. या यशानंतर राज्यलोभामुळे अलाउद्दीनाने १२९६ मध्ये कारा-माणिकपूर येथे स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. खल्जी घराण्यात अलाउद्दीन हा कर्तबगार राज्यकर्ता व पराक्रमी योद्धा होता. दक्षिणेत इस्लामचा विजयी ध्वज फडकविणारा हा पहिलाच सुलतान होय. राज्याचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्याने अनेक कडक उपाय योजले. अलाउद्दीनाच्या वृद्धापकाळात त्याने दक्षिणेत नेमलेल्या मलिक काफूरच्या हातात सर्व सत्ता गेली. अलाउद्दीनाच्या मरणानंतर दरबारात यादवी माजली. काफूरने अलाउद्दीनाचा सर्वांत धाकटा मुलगा, शिहाबुद्दीन उमर यास गादीवर बसवून, तो स्वतः त्याचा संरक्षक बनला परंतु पुढे काफूरचा खून झाला. त्यानंतर अलाउद्दीनाचा दुसरा मुलगा मुबारकशाह हा धाकट्या भावास दूर करून राज्यावर बसला. हा व्यसनी व क्रूर होता. ह्याच्या कारकीर्दीत राज्यात अनेक ठिकाणी बंडे झाली. राजपुताना, मारवाड, देवगिरी इ. राज्ये स्वतंत्र झाली. १३१७ मध्ये मुबारक स्वतः देवगिरीवर मोठ्या सैन्यानिशी चालून गेला. देवगिरीचे राज्य खल्जी साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले. मुबारकच्या खुस्रव नावाच्या सेनापतीने वरंगळ व माबार येथील राजांस पराभूत करुन, तो स्वतः राज्यावर बसला. मुसलमानांवर त्याचा राग होता. त्याने कुराण पायाखाली तुडविले. पण तो मूळचा अंत्यज असल्याने हिंदूंमध्येही प्रिय होऊ शकला नाही. लवकरच धियासुद्दीन तुघलक याने दिल्लीवर चाल करून खुस्रवखानास ठार केले. अशा रीतीने खल्जी घराण्याचा शेवट झाला.
खल्जी घराण्याच्या काळात हिंदुस्थानात मुसलमानांचा जेवढा साम्राज्यविस्तार झाला होता, तेवढा पूर्वी कधीही झाला नव्हता. सर्व उत्तर हिंदुस्थानात मुसलमानी सत्ता प्रस्थापित करून खल्जींनी आपल्या सत्तेचा प्रभाव कन्याकुमारीपर्यंत वाढविला होता. खल्जी दरबारात फार्सी व इतर परदेशी विद्वान येऊन रहात असत. ह्या काळात मुसलमानातील चिश्ती संप्रदायाचे निजामुद्दीन अवलिया, शेख फरीदुद्दीन, शकरगंज वगैरे संत होऊन गेले. सुप्रसिद्ध कवी अमीर खुसरौ हा खल्जी दरबारात होता. हा श्रेष्ठ गायक, संगीतज्ञ आणि इतिहासकार होता. झियाउद्दीन बरानीने खल्जींच्या कारकीर्दीचा इतिहास लिहिला आहे. खल्जी राज्यकर्ते संगीताचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बांधलेल्या वास्तूंमध्ये हिंदू-इस्लामी कलेचे मिश्रण दिसून येते. अलाउद्दीनाने दिल्ली येथे सीरी हे उपनगर वसविले. राजस्थानात चितोडच्या किल्ल्याजवळ गंभीरी नदीवर एक पूलही बांधला होता. सध्या अवशिष्ट असलेल्या कमानींवरुन त्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीची भव्यता लक्षात येते.
संदर्भ : Lal, K. S. History of the Khaljis A. D. 1290-1320, Bombay, 1967.
गोखले, कमल