केवलसत्तावाद : (ॲब्सोल्यूटिझम). केवलसत्ता म्हणजे निरंकुश वा मुक्त सत्तापद्धती वा स्वयंसत्तापद्धती. सत्ताधीश कोणत्याही निसर्गाच्या वा नैतिक वा वैध नियमांनी बांधलेला नाही, असे आग्रहाने प्रतिपादन करणारा सिद्धांत म्हणजे केवलसत्तावाद. अशी अनिर्बंध सत्ता प्रत्यक्षात असणे अथवा तसा सत्ताधीशांचा दावा असणे, या दोन्ही पर्यायांचा केवलसत्तावादाच्या अर्थामध्ये अंतर्भाव होऊ शकतो. सतराव्या व अठराव्या शतकांतील अनिर्बंध राजकीय सत्तेचा सिद्धांत आणि हेगेलचा राज्य विषयक सिद्धांत यांच्या संदर्भात केवलसत्तावाद ही कल्पना उद्भवली.
राज्याने निसर्गनियम मानले पाहिजेत, ही तत्कालीन रूढ कल्पना मॅकिआव्हेलीने सोळाव्या शतकात प्रथम अमान्य केली त्यामुळे निसर्गाच्या आकलनात राज्यसत्तेचे आकलन अंतर्भूत न करता ते हॉब्जने अनिर्बंध, अमर्याद सार्वभौमत्वाचा पुरस्कार करून, असे सार्वभौमत्व राजेशाहीत असल्याचे सांगितले. रूसोने ते अमूर्त अशा सामान्य इच्छेत (जनरल विल) असते, असा सिद्धांत मांडला. हेगेलने केवलसत्ता म्हणजे राज्य तेच आध्यात्मिक शक्तीचे मूर्तिमंत विकसित रूप असे प्रतिपादिले. राज्य व समाज एकरूप मानले. राज्याला व्यक्ती कल्पून राज्याच्या सार्वभौम तत्त्वावर कोणत्याही मर्यादा असू शकत नाहीत हा विचार पुढे आला.
यूरोपात राष्ट्रवादाच्या उदयाच्या समयी राज्यसंस्था ही धर्मसंस्था किंवा इतर सामाजिक संस्था यांच्यापासून स्वतंत्र वा स्वायत्त बनल्यानंतर राज्यातील सर्व व्यक्ती व संस्था, रूढी आणि परंपरा यांवर राष्ट्र– राज्यांची अधिसत्ता प्रस्थापित झाली. राष्ट्र– राज्याचा अधिकार सर्वव्यापी, सर्वसमावेशक व सर्वश्रेष्ठ म्हणून सर्वंकष ठरला. राज्य हे निसर्ग, नीती वा वैध नियमांवर वा कायद्यावर अधिष्ठित आहे, हा विचार मागे पडला. कायदा हाच राज्यावर अवलंबून असतो, ही कल्पना पुढे आली. कायदा म्हणजे सार्वभौम राज्याचा आदेश. कायद्याच्या आशयावर त्याचे सामर्थ्य अवलंबून नाही कायदा करणाऱ्याच्या केवळ अधिकारामुळे वा सामर्थ्यामुळे ते ठरते, या प्रमेयावर केवलसत्तावाद आधारलेला आहे.
केवलसत्तावाद ही एक अमूर्त कल्पना आहे. प्रत्यक्ष जीवनात असे अनिर्बंध सार्वभौम राज्य सापडणे शक्य नाही. तथापि अधिकाधिक सत्ता प्राप्त करण्याची प्रवृत्ती राज्यात नेहमी आढळते आणि याच प्रवृत्तीची तर्कशुद्ध परणती या कल्पनेत झाली आहे. तिच्या योगाने प्रत्यक्षातील राज्यसत्ता कितपत सर्वंकष आहे, याचा अंदाज घेणे शक्य होते. सत्ता हा शब्दही अनेक अर्थांनी वापरला जातो. मानवी व्यवहारावर परिणाम करण्याचे आणि मानवी व्यवहार नियंत्रित करण्याचे सामर्थ्य, अशा अर्थांने तो शब्द वापरल्यास तो व्यवहार सर्वथा नियंत्रित करण्याची कल्पना केवसत्तावादात अभिप्रेत आहे असे म्हणता येईल. या नियंत्रणाखालील व्यक्तींना त्या नियंत्रणात अभिप्रेत व इष्ट असलेल्या वागण्याच्या रीतीहून वेगळ्या रीतीने वागण्याचा पर्याय मुळी खुलाच असत नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. स्वयंसत्ताधीश मानवी व्यवहारावर केवळ प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत नाही, तर त्याचे नियंत्रण करीत असतो. केवलसत्तावादाचा विचार करताना सत्ताधीशाच्या प्रत्यक्षहाती असलेली सत्ता आणि सत्ताधीशाचे किंवा प्रजेचे हक्क वा अधिकार सांगताना अभिप्रेत असलेली सत्ता यांच्यातील फरकही ध्यानात घेतला पाहिजे.
अनिर्बंध, अमर्याद सार्वभौम सत्ता एखाद्या व्यक्तीकरवीच गाजविली जाईल असे नाही. अनेक परस्परावलंबी व्यक्ती एकत्र मिळूनदेखील अशा प्रकारची सत्ता गाजवू शकतात. विशिष्ट सामाजिक परिस्थिती अशी सत्ता प्रस्थापित होण्यास साहाय्यभूत होते. सामाजिक अस्थैर्य व भविष्याविषयी अनिश्चिती जो जो अधिक तो तो केवलसत्तावादकडे राज्याचा कल झुकण्याचा संभव अधिक, अलीकडे फॅसिझम, नाझीवाद व साम्यवाद या विचारांपासून प्रेरणा घेतलेल्या राज्यांच्या बाबतीत ही कल्पना वापरली जाते. या राज्यांचा सर्व समाज आणि संस्था यांवर आपले संपूर्ण व सर्वव्यापी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो. असा दृष्टीकोन स्वीकारल्याने व्यक्तीला व्यक्ती म्हणून काहीच महत्त्व राहत नाही, नागरिकांच्या हक्कांना अर्थ उरत नाही, आंतरराष्ट्रीय सहकार्यालाही विशेष स्थान असत नाही.
अनिर्बंध, अमर्याद सत्तेविषयी एक अडचण म्हणजे तिचा प्रत्यक्षात वापर केल्यावाचून तिचे स्वरूप काय, हे स्पष्ट होत नाही ही होय. अनिर्बंध सत्ता स्वच्छंदपणे वापरणे कोणाही सत्ताधीशाला शक्य नाही. ज्यांच्यावर सत्ता गाजवायची त्यांच्या इच्छा, आशा व आकांक्षा यांचा विचार करणे आवश्यक ठरते त्याचप्रमाणे एखाद्या ध्येयवादानुसार वा विचारसरणीनुसार सत्ता गाजवायची, तर तिच्या मर्यादा मानाव्या लागतात. म्हणून केवलसत्तावाद ही केवळ अमूर्त कल्पना होय प्रत्यक्षात असे राज्य आढळत नाही.
आणखी असे, की कोणतीही राजकीय सत्ता ही सामुदायिक सत्ता असते. केवळ सत्तेतही सैन्य, पोलीस व राज्यकर्मचारी यांची शिस्तबद्ध संघटना असावीच लागते. संघटनेतील व्यक्तींच्या ठिकाणी शिस्तीचे पालन करण्याची मनोवृत्ती अथवा आज्ञाधारकता आवश्यक असावीच लागते. हुकूम शिस्तीने अंमलात आणला जाणे, यास संघटनेतील व्यक्तींच्या ठिकाणी निष्ठा असावी लागते. ही निष्ठा बिघडल्यास हुकूमशाही वा राजेशाही म्हणजे केवलसत्ता धोक्यात येते. संघटनेवरील निष्ठा हा सर्व प्रकारच्या राजकीय सत्तेचा प्राण आहे. निष्ठा ही सत्तासंघटनेतील घटक व्यक्तींच्या इच्छापूर्तीशी संबद्ध आहे.
संदर्भ : 1. Arendt, Hannah, Origins of Totalitarianism, London, 1951.
2. Cassinelli, C. W. Free Activities and Interpersonal Relations, Hague, 1966.
3. Wittfogel, K. A. Oriental Despotism : A Comparative Study of Total Power, Toronto, 1957.
पारीख, गोवर्धन
“