केमेरोव्हो : रशियाच्या केमेरोव्हो ओब्लास्टचे मुख्य ठिकाण आणि कुझनेट्स्क कोळसाक्षेत्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ४,१५,००० (१९७३). हे टोम नदीकाठी, कुझनेट्स्की अलातौ पर्वतपायथ्याशी, मॉस्कोच्या ३,२०० किमी. पूर्वेस आहे. शहराच्या आसमंतात समृद्ध कोळसाखाणी असून केमेरोव्हो रशियातील महत्त्वाचे रसायन उद्योगकेंद्र समजले जाते. येथे खते, प्लॅस्टिक, रंग, औषधी वस्तू, लाकूड कापणे, खाण-उपकरणे, कृषिअवजारे यांचे उद्योग असून खाण, वैद्यक, रसायन, तंत्र इ. विषयांच्या शिक्षणसंस्था आहेत.
शाह, र. रू.