केमाल आतातुर्क : (१२ मार्च १८८१–१० नोव्हेंबर १९३८). तुर्कस्तान प्रजासत्ताकाचा संस्थापक आणि पहिला अध्यक्ष, गाझी मुस्ताफा पाशा हे त्याचे मूळ नाव. सलॉनिक (ग्रीस–त्या वेळी हा भाग तुर्कस्तानच्या आधिपत्याखाली होता) येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील अली रिजा आणि आई झुबैदा यांची इच्छा केमालने मौलवीकरवी पारंपारिक शिक्षण घ्यावे अशी होतीपरंतु केमालचा ओढा लष्करी आणि आधुनिक शिक्षणाकडे होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने लष्करी विद्यालयात नाव नोंदविले. गणितातील प्रावीण्यामुळे त्यास केमाल (प्रावीण्यसिद्धी) हे नाव प्राप्त झाले. मॉनस्तिर येथील अकादमीतून तो पदवीधर झाला (१८९९). पुढे तो इस्तंबूल येथील लष्करी आणि स्टाफ महाविद्यालयांत गेला व कॅप्टन होऊन बाहेर पडला. त्याने विद्यार्थीदशेत रूसो, व्हॉल्तेअर, माँतेस्क्यू वगैरेंच्या साहित्याचा अभ्यास केला. त्या वेळी त्याचा तुर्की क्रांतिकारकांशीही निकटचा संबंध आला आणि ‘वतन’ह्या क्रांतिकारी संस्थेचा तो सभासद झाला. पुढे त्याने लष्करात नोकरी धरली. त्यास क्रांतिकारी लोकांच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. परंतु लवकरच त्याची सुटका करण्यात येऊन क्रांतिकारी चळवळीपासून त्याने दूर रहावे, या उद्देशाने त्याची दमास्कसला बदली करण्यात आली. दमास्कस येथे त्याचा तरुण तुर्क आंदोलनाशी संबंध आला आणि अन्वरपाशा, जमालपाशा, तलतपाशा वगैरे तरुण तुर्क नेत्यांशी परिचय झाला. साहजिकच त्याने तरुण तुर्काच्या युनियन प्रोग्रेस पार्टीचे काही कामही अंगीकरले.
दुसरा अब्दुल हमीद ह्या सुलतानाच्या अन्याय्य व भ्रष्ट राजवटीविरुद्ध १९०८ मध्ये तरुण तुर्कांनी उघडपणे चळवळ सुरू केली. त्यामुळे सुलतानाला संविधानात्मक शासनाची मागणी विचारार्थ घेणे भाग पडले. ह्यात केमालचा मोठा वाटा होता परंतु या वेळी अन्वरपाशा व केमालपाशा ह्यांत मतभेद निर्माण झाले आणि त्यांतूनच प्रतिक्रांती झाली. लष्कराने संबंधित राजकारणात सहभागी होऊ नये, ह्या धोरणानुसार काही दिवस तो राजकारणातून निवृत्त झाला. त्याने १९११ च्या इटली-तुर्कस्तान व १९१२-१३ च्या बाल्कन युद्धात, तसेच पहिल्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली. दार्दानेल्सच्या १९१६ च्या लढाईत त्याची मुत्सद्देगिरी व शौर्य उघडकीस आले. त्यामुळे त्यास सैन्यातील एका तुकडीचे विभाग-प्रमुखत्व मिळाले. पुढे १९१८ मध्ये पॅलेस्टाइनमधील सातव्या भूदल सेनेचे नेतृत्व त्यास मिळाले. दोस्त राष्ट्रांविरुद्ध माजलेल्या एका बंडाळीचा फायदा घेऊन त्याने एर्झरूम व सव्हास येथे १९१९ मध्ये परिषदा घेतल्या व नव्या तुर्की संघटनेची उद्दिष्टे स्पष्ट केली. ह्या वेळी त्यास ग्रीकांबरोबर लढण्याचा प्रसंग आला. जनरल इस्मेत इनोनूच्या साहाय्याने त्याने ग्रीकांचा पूर्ण पराभव केला. साहजिकच रक्षणकर्ता म्हणून त्याचे महत्त्व वाढले. या सुमारास प्रत्यक्षात सत्ता केमाल वगैरे लष्करी अधिकार्यांच्या ताब्यात होती. परंतु लोझॅन येथील शांततातहास केमालऐवजी सुलतानास बोलविण्यात आले, तेव्हा हा अपमान समजून केमालने १९२२ च्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय सभेद्वारे सुलतानशाही नष्ट केली व अब्दुल मजीदला तात्पुरते खलीफापद दिले. २४ जुलै १९२३ च्या लोझॅन तहाने तुर्कस्तानचे राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य मान्य केले. म्हणून केमालच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सभेने २९ ऑक्टोबर १९२३ रोजी तुर्कस्तानचे प्रजासत्ताक जाहीर केले आणि केमाल त्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला. पुढे १९२७, १९३१ आणि १९३५ मध्ये त्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून सार्वमतानुसार फेरनिवड झाली. ह्या मुदतीत त्याने सर्व सत्ता आपल्या हाती घेऊन एकामागून एक ठराव संमत करून तुर्कस्तानात आमूलाग्र बदल घडवून आणले. एकेकाळचा हा यूरोपचा शरपंजरी मानव (सिक मॅन ऑफ यूरोप) बलवान बनला.
त्याने आपल्या धोरणास विरोध होऊ नये, म्हणून पॉप्युलर पक्षाची स्थापना केली व त्याचेही अध्यक्षपद आपणाकडे घेतले, तसेच मंत्रिमंडळाचे नेतेपदही स्वीकारले. प्रथम त्याने खलीफापद नष्ट करून खलीफास पळवून लावलेइस्लाम धर्माऐवजी धर्मनिरपेक्ष राज्यपद्धती अंमलात आणली आणि हळूहळू धार्मिक संस्था, धर्मप्रचार करणारी विद्यालये, इस्लाम धर्माची बिरुदे धारण करणारी घराणी बेकायदेशीर ठरविली. जुन्या चालीरीती रद्द करून स्त्रियांची बुरखा पद्धत काढून टाकली. त्यांना त्याने स्वातंत्र्य व मतदानाचा हक्क दिला, बहुपत्नीकत्व नष्ट केले, सर्वांच्या पेहरावांत आमूलाग्र बदल केला आणि फेजऐवजी हॅटची सक्ती केली. एका कायद्यान्वये पूर्वीचे किताब नष्ट करून आडनावांची सक्ती केली. लोकांनी आतातुर्क-तुर्कपिता हे सार्थ नाव त्यास दिले. ह्या वेळी तुर्कस्तानात निरक्षर लोकांचे प्रमाण जास्त होते, म्हणून त्याने १६ ते ४० वयातील सर्व नागरिकांस शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणात रूढ असणाऱ्या किचकट अरबी मूळाक्षरांऐवजी लॅटिन मूळाक्षरांचा परिचय करून देऊन त्याने व्यक्तिशः खेड्यापाड्यांतून शिक्षणप्रसाराची मोहीम काढली. हे सर्व करण्यासाठी कुराणावर आधारलेला पूर्वीचा कायदा त्यास रद्द करावा लागला. त्याने स्विस दिवाणी कायदा, इटालियन दंडसंहिता आणि जर्मन वाणिज्यसंहिता इतादींचा अवलंब केला. इस्लाम धर्मात मूर्तिघडण नसतानाही त्याने मूर्ती घडविण्यास परवानगी दिली आणि अशा प्रकारे कलेस उत्तेजन दिले. ह्या त्याच्या आधुनिकीकरणामुळे इस्लामधर्मीय पुराणमतवाद्यांनी त्याविरुद्ध बंड केले. त्यात त्याचे काही निकटवर्तीही होते, पण राष्ट्रोन्नतीच्या आड येणाऱ्या सर्वांचा त्याने कठोरपणे बीमोड केला.
अंतर्गत सुधारणा करीत असता, देशातील इतर बाबींकडे त्याने दुर्लक्ष केले नाही. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीस उत्तेजन दिले व आधुनिक अवजारे परदेशातून मागविली. पंचवर्षीय योजना आखून त्यांद्वारे शेतीबरोबरच दळणवळण, आरोग्य इत्यादी बाबतींत त्याने सुधारणा केल्यादेशाच्या राजकीय स्थैर्यासाठी त्याने समझोत्याचे व शांततेचे परराष्ट्रीय धोरण अवलंबिले आणि अनेक देशांशी मैत्रीचे तह केलेराष्ट्रसंघात तुर्कस्तानला सभीसदत्व मिळवून दिले आणि लष्करी वृत्तीचा हा सेनापती शांततेचा पुरस्कार करून लागला.
खाजगी जीवनात केमाल अत्यंत निराश होता. लहानपणी त्याचे वडील वारले व पुढे १९२४ मध्ये, ऐन उमेदीत आई व नंतर अल्पावधीतच बहीण वारली. वैवाहिक जीवनात त्याचे लतिफा ह्या पत्नीशी फार दिवस पटले नाही, म्हणून त्याने घटस्फोट घेतला व अखेरपर्यंत तो एकटाच राहिला. त्यामुळे तो आपले मन वाचन, मद्यपान व दीर्घोद्योग ह्यांत गुंतवीत असे. ह्यामुळेच त्यास यकृताची व्याधी जडली आणि वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी इस्तंबूल येथे त्याला मृत्यूने गाठले. तो लोकहितैषी हुकूमशाह होता. त्याने आपल्या राष्ट्रासाठी आपले आयुष्य वेचले. तुर्कस्तानचा शिल्पकार म्हणून त्याचे नाव इतिहासात अमर झाले आहे.
संदर्भ : 1. Armstrong, H. C. Gray Wolf : The Life of Kemal Atatrurk, London, 1961.
2. Kinross, Lord, Ataturk, London, 1965.
3. Orga, Irfan Orga, Margarete, Ataturk, London, 1962.
४. सामंत, स. वि. केमालपाशा, पुणे, १९३५.
देशपांडे, सु. र.
“