केप हनिसकल : (लॅ. टेकोमा कॅपेंसिस कुल-बिग्नोनिएसी). मूळची दक्षिण आफ्रिकेतील पण हल्ली सर्वत्र शोभेकरिता बागेतून लावलेली झुडूपवजा वेल. पाने संमुख (समोरासमोर), संयुक्त व विषमदली दले ७–९, दंतुर, अंडाकृती. नारिंगी किंवा शेंदरी लाल फुलांच्या मंजऱ्या सप्टेंबर–ऑक्टोबरात फांद्यांच्या टोकांस येतात संवर्त पेल्यासारखा व संदले पाच पुष्पमुकुट खाली नळीसारखा पण टोकास पसरट व किंचित वाकडा पाकळ्या चार व त्यांपैकी एक मोठी केसरदले चार व दीर्घद्वयी एक वंध्य केसर खोलगट बिंबावर किंजपुट असून बोंड अनेकबीजी व तडकणारे असते [→ फूल].
व्यवस्थितपणे छाटणी करून ही वेल सरळ झुडपाप्रमाणे वाढविता येते किंवा घराच्या दर्शनी भिंतीवर चढवून घराचे सौंदर्य वाढविता येते. हलकी, सकस व चांगली निचऱ्याची जमीन या वेलीला मानवते भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. छाट कलमे लावून नवीन लागवड करतात. अनुकूल परिस्थितीत वर्षभर फुले येतात.
पहा : बिग्नोनिएसी.
देशपांडे, सुधाकर