के-टू: मौंट गॉडविन ऑस्टिन. मौंट एव्हरेस्टखालोखाल जगातील सर्वोच्च शिखर. उंची ८,६११ मी. ३५० ५३’ उ. व ७६० ३१’ पू. या ठिकाणी जम्मू व काश्मीर राज्याच्या उत्तर सरहद्दीवरील (सध्या पाकव्याप्त) काराकोरम पर्वतात हे श्रीनगरच्या उत्तरेस सु. २६० किमी. वर आहे. भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे १८५६ साली याची उंची भूगणितीय पद्धतीने मोजली गेली. काराकोरमच्या मोजमापातील हे दुसरे म्हणून के-टू हे नाव याला पडले.
गॉडविन ऑस्टिन याने केलेल्या सर्वेक्षणकार्यासाठी त्याचे नावही त्याला देतात. स्थानिक नावे मात्र चोगोरी, दापसांग ही आहेत. ठिकठिकाणी छावणी टाकण्याइतका सपाट भाग नसलेल्या, पिरॅमिडसदृश या शिखरावर चढून जाणे अशक्य मानले जाई. १८९२ पासून के-टू च्या चढाईचे प्रयत्न चालू होते. १९०९ साली ड्यूक ऑफ द आव्रूत्सी ६,९०३ मी. पर्यंत जाऊ शकला. त्याने के-टू चा चांगलाच अभ्यास केला होता. त्याच्या स्मरणार्थ आग्नेयीकडील एका सुळक्याला त्याचेच नाव मिळाले आहे. त्याच्याच मार्गाने पुढे अनेक गिर्यारोहकांनी प्रयत्न केले. १९३८ सालच्या अमेरिकन गिर्यारोहकांनी ७,६२० मी. पर्यंत मजल मारली होती. शेवटी १९५४ साली इटलीचे काँपानोनी व लासेडेली यांनी के-टू सर केले.
शाह, र. रू.
“