केंड्‌ल, एडवर्ड कॅल्व्हिन : (८ मार्च १८८६–४ मे १९७२). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. केंड्ल व त्यांचे सहकारी फिलिप एस्. हेंच आणि स्वित्झर्लंडचे टाडेयस राइशस्टाइन या तिघांना मिळून १९५० चे शरीरक्रियाविज्ञान आणि वैद्यक या विषयांचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. ‘अधिवृक्क ग्रंथीच्या (मूत्रपिंडाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथींच्या) बाह्यकातील (बाहेरील कवचासारख्या भागातील) अंतःस्रावांचा शोध, त्यांची रासायनिक संरचना (रेणूतील अणूंची रचना) व जैव परिणाम’ या संशोधनाकरिता हे पारितोषिक त्यांना मिळाले.

त्यांचा जन्म कनेक्टिकटमधील साउथ नॉरवॉक या गावी झाला. १९०८ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची बी. एस्. आणि १९१० मध्ये त्याच विद्यापीठाची पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. त्यांनी १९११–१९१४ पर्यंत न्यूयॉर्क येथील सेंट ल्यूक रुग्णालयात काम केले. त्याच सुमारास त्यांनी अवटू ग्रंथीवरील (श्वासनालाच्या पुढच्या व दोन्ही बाजूंस असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीवरील) संशोधनास प्रारंभ केला. १९१६ मध्ये मेयो क्लिनिकमध्ये काम करीत असताना त्यांनी थायरॉक्सिन हे औषधिद्रव्य अलग करण्यात यश मिळविले. नंतर मेयो क्लिनिकच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली. १९२१–१९५१ या काळात ते मिनेसोटा विद्यापीठाच्या शरीरक्रिया–रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक होते. १९५२ नंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठाच्या जेम्स फॉरेस्टॉल संशोधन केंद्रातील रसायनशास्त्र विभागात, तसेच इतर पाच विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.

अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातून मिळणाऱ्या एकूण २८ प्रकारांच्या अंतःसावांचा केंड्ल यांनी १९३० मध्ये शोध लावला. त्यांपैकी चार प्रकारच्या अंतःस्त्रावांचा प्राणिशरीरावर परिणाम होतो असे आढळून आले. ह्या चारांपैकी ‘ई’ ह्या प्रकारच्या पदार्थास पुढे ⇨कॉर्टिसोन  हे नाव मिळाले व ते एक प्रभावी औषध ठरले आहे. हायड्रोकॉर्टिसोनचा शोधही केंड्ल यांनीच लावला.

केंड्ल यांनी थायरॉक्सिन (१९२९) या विषयावर एक व्याप्तिलेख (मोनोग्राफ) व इतर विषयांवरील २०० निबंध व समीक्षणे निरनिराळ्या शास्त्रीय नियतकालिकांतून लिहिली. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद म्हणून १९५० साली त्यांची निवड झाली. त्यांना सिनसिनटी, येल, वेस्टर्न रिझर्व विद्यापीठ (कोलंबिया) आणि नॅशनल विद्यापीठ (आयर्लंड) या विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट आणि अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशन सुवर्णपदक (१९६५) हे बहुमान मिळाले. ते प्रिन्स्टन येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो.