केंटकी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पूर्व-दक्षिण-मध्य विभागातील एक राज्य. ३६ ३०′ उ. ते ३९ ९′ उ. आणि ८२ प. ते ८९ प. क्षेत्रफळ १,०५,०२७ चौ. किमी. लोकसंख्या ३२,१९,३११ (१९७०). याच्या दक्षिणेस टेनेसी, पश्चिमेस मिसिसिपी नदीपलीकडे मिसूरी, उत्तरेस ओहायओ नदीपलीकडे इलिनॉय, इंडियाना व ओहायओ आणि पूर्वेस पश्चिम व्हर्जिनिया व व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. फ्रँकफर्ट ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : राज्याचा भूप्रदेश सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे उतरत गेलेला आढळतो. पूर्वेकडच्या तृतीयांश भागात कंबर्लंड पर्वताच्या खड्या रांगा व चिंचोळ्या दऱ्या असून त्यांतील नद्या उत्तर सीमेच्या ओहायओला मिळतात. राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील कंबर्लंड घाटातूनच नवे वसाहती लोक मिळून येऊन या राज्यात व वायव्य मुलुखाकडे स्थायिक झाले. कंबर्लंड पर्वत पश्चिमेकडे झिजत जाऊन सपाट प्रदेशात मिळून गेले आहेत. सरासरी १५५ मी. ते १,२८५ मी. पर्यंत उंचीचा हा पर्वतप्रदेश बराचसा कठीण लाकडाच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. बाकीच्या राज्यभूमीचे नदीमैदान आणि पठार असे दोन विभाग पडतात. ओहायओ नदीच्या काठाकाठाने कोठे कोठे अरुंद असणारा सपाट प्रदेश, या नदीला पॅड्युकापाशी कंबर्लंड व टेनेसी या नद्या मिळतात, तेथे विस्तृत झाला आहे. टेनेसीवरच्या केंटकी व कंबर्लंडवरच्या बार्कली या धरणांनी तयार झालेली दोन सरोवरे राज्यात सर्वांत मोठी आहेत. राज्याच्या नैर्ऋत्य भागात झाडीने झाकलेल्या लहान लहान टेकड्यांतून कोळशांच्या खाणी आहेत, तशाच आग्नेयीस कंबर्लंड विभागातही आहेत. मैदानी प्रदेशाची उंची ८० ते १५५ मी. पेक्षा जास्त नाही. दक्षिण व मध्य केंटकी हा दक्षिणेकडून टेनेसी राज्यातून आलेल्या पठाराचा भाग असून त्याचा गाभा चुनखडीचा आहे. तो पाण्याने पोखरल्यामुळे त्यात अनेक भूमिगत गुहा, विवरे व घळी आहेत. ओहायओ नदी येथे त्याच्या काही भागांतून वाहते, तेथे त्याच्यावर मोठ्या दरडी आहेत. हा पठारी प्रदेश बव्हंशी नीलतृणाच्या समृद्ध कुरणांनी झाकलेला आणि जातिवंत घोडे व गुरे यांच्या पोषणास उपयुक्त आहे. टेनेसी, कंबर्लंड, ग्रीन, केंटकी व लिकिंग या सर्व नद्या ओहायओमार्गे मिसिसिपीला मिळतात. या राज्यात पूर्वी तोडून टाकलेल्या अरण्यांची जमीन सकस आहे, त्याचप्रमाणे चुनखडीवरच्या थराची मातीही सुपीक आहे. केंटकीचा कोळसा उत्पादनात देशात तिसरा क्रमांक आहे. शिवाय खाणीतून पेट्रोलियम, ज्वलनवायू, चुनखडी, शाडू, सिलिका वाळू ही खनिजेही निघतात. राज्याची हवा सर्वसाधारणपणे सौम्य आहे. उन्हाळा काहीसा कडक, तर हिवाळ्यात, कधीकधी पर्वतभागांत खूप हिमवृष्टी होते. पश्चिमेच्या सखल विभागात अधिक उष्णता व आर्द्रता आढळते. येथे तपमान किमान १·७ से. व कमाल २५·८ से. असून सरासरी पाऊस १०५ सेंमी. पडतो. वनांनी सु. अर्धा राज्यप्रदेश व्यापलेला असून त्यात हेमलॉक, पॉप्लर, सिकॅमोर, ओक, एल्म, पाइन, हिकरी बीच, ॲश, वॉलनट, सीडार या जातींचे वृक्ष व विविध तद्देशीय झुडुपे व वेली आढळतात. राखीव वनविभागात अस्वल, हरिण असे प्राणी संरक्षित असून ऑपॉस्सम, रॅकून, स्कंक, विंक्क अशी लहान जनावरे, नानाविध पक्षी अनेक जातींचे सर्प राज्यात आढळतात. नद्यांतून खाद्योपयोगी माशांची पैदास व भूमिगत गुहांत बिनडोळ्यांचे मासे सापडतात.

इतिहास व राज्यव्यवस्था: शॉनी, मिंगो, इरोक्काय आणि डेलावेअर या आदिवासी रेड इंडियन जमातींनी राखीव मृगयावन मानलेल्या या भागात प्रथम फ्रेंच साहसप्रवासी ल साल हा १६६९ मध्ये नदीमार्गे आला असावा. त्याच्यानंतर डॉ. टॉमस वॉकर १७५० मध्ये कंबर्लंड घाटातून शोध काढीत आला. १७०३ पासून डॅन्येल बून व इतर काहीजणांनी वसाहती चालू केल्या. इंडियनांशी त्यांना सतत झगडा चालू ठेवावा लागला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांनी इंडियनांना वसाहत वाल्यांविरुद्ध चिथावून हल्ले करवले पण त्यांना शौर्याने तोंड देत वसाहती लोक टिकून राहिले. स्वातंत्र्ययुद्धातली शेवटची लढाई लिकिंग येथे १७८२ मध्ये झाली. तेथे इंडियन जरी विजयी झाले, तरी युद्ध संपून वसाहती स्वतंत्र झाल्या. १७८४ पासून शेजारच्या व्हर्जिनियाशी केंटकीचे तंटे चालू होते. त्यांचा अखेर शेवट होऊन १७९२ मध्ये केंटकी हे ॲलेगेनी पर्वताच्या पश्चिमेचे पहिले राज्य म्हणून अमेरिकन स्वतंत्र संस्थानांत दाखल झाले. १८१२ मध्ये ब्रिटनविरोधी लढाईत केंटकीने हिरिरीने भाग घेतला. देशाच्या दक्षिण भागातले स्पॅनिश वर्चस्व संपल्यावर ओहायओ-मिसिसिपी मार्गे त्या भागाशी सुरळीत व्यापार सुरू झाला. गुलाम पाळून तंबाखू पिकवणाऱ्या मळेवाल्यांचा हा जमाना होता. यादवी युद्धात जरी उत्तरेच्या संघराज्याशी केंटकी एकनिष्ठ राहिले, तरी नागरिकांत मात्र दोन तट पडून बरेच लोक बंडखोर दक्षिणेच्याही बाजूने लढले. या युद्धातल्या कित्येक लढाया या राज्यात झाल्या. १८६२ मध्ये उत्तरेच्या सेनेने राज्याचा ताबा मिळविला. यादवी नंतरही गुलामगिरी रद्द करण्याबाबत या राज्यात खूप मतभेद झाले. १८७० पासून कोळसा मोठ्या प्रमाणावर सापडू लागल्यावर ॲलंड येथे पोलाद उद्योग सुरू झाला. पहिल्या महायुद्धाच्यावेळी नव्या भरतीच्या सैनिकांना कँप नॉक्स येथे शिकवून तयार करण्यास सुरुवात झाली. १९३६ मध्ये त्या ठाण्याला फोर्ट नॉक्स हे नाव देण्यात येऊन देशाचा सुवर्णसंचय तेथे ठेवण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रणगाडे सैनिक आणि यंत्रचलित सेनादल यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही महायुद्धांत लढवय्ये व युद्धसामग्री या राज्याने भरपूर प्रमाणात पुरवली. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धोपयोगी मालाच्या कारखान्यांची पुनर्रचना होऊन ते नित्योपयोगी माल बनवू लागले. कृषी उद्योगात तंबाखूखेरीज इतरही विविध पिके निघू लागली.

 केंटकीची कार्यकारी सत्ता १८९१ च्या घटनेनुसार ४ वर्षांसाठी निवडून दिलेला राज्यपाल व ८ खातेप्रमुख यांच्याकडे असते. विधिमंडळे ४ वर्षांसाठी निवडलेले ३८ सीनेटर व २ वर्षांसाठी निवडलेले १०० प्रतिनिधी यांची असतात. सर्वश्रेष्ठ न्यायालयावर ८ वर्षांसाठी निवडलेले ७ न्यायाधीश असतात. शिवाय येथे विविध न्यायालये आहेत. राष्ट्रीय संसदेवर २ सीनेटर व ७ प्रतिनिधी राज्यातर्फे निवडून दिले जातात.

आर्थिक व सामाजिक स्थिती: राज्याच्या ४/५ भूमीवर ८२,००,००० हे. इतकी शेतजमीन असून तिच्यावरील पिकांपैकी तंबाखूचे उत्पादन देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. सिगार व सिगारेट उत्पादनातही राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. येथे मुख्यतः बर्ली जातीच्या तंबाखूखेरीज मका, सोयाबीन, गहू आणि गवत चारा यांचेही उत्पादन भरपूर असून त्यावर पोसलेली दुभती जनावरे, कोंबड्या, गुरे व डुकरे यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात लाकूडतोडीवर नियंत्रण आहे. त्यामुळे कापीव लाकूड मर्यादित प्रमाणात उपलब्ध होते. कारखानदारी मुख्यतः मद्यार्क, पेये, खाद्य पदार्थ, ओढण्याची तंबाखू, बांधकामाची व इतर यंत्रसामग्री, रसायने, धातूंचे घडीव यंत्रभाग, विजेची उपकरणे, तयार कपडे, फर्निचर या मालाची आहे. वाहतुकीला ओहायओ व केंटकी-टेनेसी-कंबर्लंड या उपनद्या मिळून २,२४० किमी. नदीजलमार्ग उपयोगी पडतात. लोहमार्ग ५,६४५ किमी., रस्ते १,११,३८४ किमी. (पैकी सु. ८० टक्के पक्के), बहुतेक सर्व प्रमुख शहरांना विमानतळ, १५४ नभोवाणी व २२ दूरचित्रवाणी केंद्रे, १३,६४,१०० दूरध्वनियंत्रे, २७ दैनिके व १४० च्या वर साप्ताहिके येथे १९७० मध्ये होती. राज्यात ख्रिस्ती धर्माचे मुख्य पंथ बॅप्टिस्ट, मेथडिस्ट, प्रेसबिटेरियन व रोमन कॅथलिक असून लोकवस्ती ४५ टक्के शहरी व ५५ टक्के ग्रामीण होती. राज्यात निग्रोंचे प्रमाण सु. ७ टक्के आहे. प्रमुख शहरे लूइसव्हिल, लेक्झिंग्टन व कव्हिंग्टन ही बव्हंशी औद्योगिक व व्यापारी केंद्रे आहेत. ७ ते १६ वर्षे वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे असून शाळांतून विद्यार्थी (१९७० मध्ये) ७,०३,७१२ व शिक्षक २८,४१२ होते. राज्यात ७ विद्यापीठे, ४६ महाविद्यालये, व इतर अनेक विशेष शिक्षणसंस्था असून १२५ सार्वजनिक वाचनालये, १०० फिरती ग्रंथालये व ५ वस्तुसंग्रहालये आहेत. १८५७ सालीच शिक्षण क्षेत्रातील वर्णभेद नष्ट करण्याचा मान केंटकी राज्याने मिळविला. या राज्यांतील प्रेक्षणीय गोष्टी म्हणजे चर्चिल डाउन्स येथील ‘केंटकी डर्बी’ व घोड्यांच्या इतर शर्यती, मॅमथ केव्ह नावाची विस्तीर्ण गुहा, कंबर्लंड धबधब्याचे चांदण्यातले इंद्रधनू व निसर्ग रम्य पर्वतप्रदेश, अब्राहम लिंकनचा जन्म येथे झाला  ती झोपडी या होत. केंटकीला ‘नीलतृणाचे राज्य’ म्हणतात.

ओक, शा. नि.