कृष्णराजसागर: कर्नाटक राज्यातील सुप्रसिद्ध धरण. हे कावेरी नदीवर, म्हैसूर शहराच्या वायव्येस १६ किमी. आहे. ४२·५ मी. उंच आणि २६२ मी. लांबीचा बांध घालून सु. १२८ चौ. किमी. क्षेत्रफळाचे हे धरण १९११–३१ या काळात पूर्ण झाले.

कृष्णराजसागर धरण
कृष्णराजसागर धरण

कृष्णराजसागरमधून सु. २,२५,००० हे. जमिनीला तसेच शिवसमुद्रम् येथील जलविद्युत् प्रकल्पाला आणि जगप्रसिद्ध वृंदावन बागेला पाणीपुरवठा होतो. धरणाच्या भिंतीला लागूनच खालच्या बाजूला ही बाग असून तिच्यातील कारंजी, रात्री त्यांवर सोडलेला रंगीबेरंगी विद्युद्दीपप्रकाश व बागेची मनोहर रचना यांची शोभा मनोरम दिसते.

शाह, र. रू.