कृष्ण पदार्थ: सर्वच्या सर्व आपाती प्रारण (पडणारी तरंगरूपी ऊर्जा) शोषून घेणारा आदर्श व काल्पनिक पदार्थ. याचा परावर्तनांक (परावर्तित प्रारण व आपाती प्रारण यांचे गुणोत्तर) शून्य असून शोषणांक (शोषण केलेले प्रारण व आपाती प्रारण यांचे गुणोत्तर) एक असतो. असा पदार्थ तापविला असता तो श्टेफान-बोल्टस् यांच्या नियमानुसार संपूर्ण प्रारण (कृष्ण पदार्थ प्रारण) उत्सर्जित करतो. या प्रारणातील ऊर्जेचे वर्णपटीय वितरण वीन यांच्या नियमावरून किंवा अधिक अचूकरीत्या प्लांक यांच्या सूत्रावरून मिळते.
अपारदर्शक पदार्थाने वेष्टिलेल्या व अतिशय लहान द्वार असलेल्या विवराचे गुणधर्म जवळजवळ कृष्ण पदार्थाप्रमाणे असतात. प्रयोगशाळेत आतून काळा केलेला व अतिशय लहान छिद्र असलेला धातूचा पोकळ पदार्थ कृष्ण पदार्थ म्हणून वापरतात.
पहा : उष्णता प्रारण.
शिरोडकर, सु. स.