भारतीय कोल्हा

कोल्हा : हा स्तनिवर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलातील प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस  आहे. भारतात याच्या ऑरियस, इंडिकस   आणि नेरिया  या प्रजाती आढळतात. कोल्हा आग्नेय यूरोप, नैर्ऋत्य आशिया आणि उत्तर आफ्रिकेत प्रामुख्याने आढळतो. भारतीय कोल्हा पॅलेस्टाइन, अरबस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात आढळतो. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो.

भारतीय कोल्ह्याची उंची ३८–४३ सेंमी. डोक्यासकट शरीराची लांबी ६०–७५ सेंमी. शेपूट २०–२७ सेंमी. वजन ८–११ किग्रॅ. असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात.

कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले, तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असतो. हिमालयातील कोल्ह्यांचा रंग जास्त पिवळसर पण कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो.

कोल्ह्याला कोठलेही हवामान– दमट जंगले, मोकळी मैदाने, वाळवंट– मानवते. हिमालयात ३,६५० मी. उंचीवरसुद्धा तो सापडतो. १,२००–२,१५० मी. उंचीवरील गिरिस्थानांच्या आजूबाजूला देखील त्यांनी आपला जम बसविला आहे. मुख्यत: शहर व खेडेगावाच्या आसपास राहणे त्याला पसंत पडते. बागायतीत किंवा शेतजमिनीत बिळे करून किंवा दाट गवतात आणि पडक्या वास्तूत घर करून हे राहतात.

हा निशाचर असून भक्ष्य मिळविण्याकरिता रात्री बाहेर पडतो. शेळ्यामेंढ्यांची करडे वगैरे लहान सस्तन प्राण्यांवर तो हल्ला करतो. कोंबड्यांना याच्यापासून फार मोठा धोका असतो. तो जनावरांची मढीदेखील खातो. वाघ, सिंह यांच्या शिकारीतले उरलेले मांस हा खातो. सिंहाला आपल्या भक्ष्याजवळ तरस, गिधाडे वगैरे आलेली खपत नाहीत पण कोल्हा आलेला चालतो. उसाच्या पिकाचे कोल्ह्यामुळे बरेच नुकसान होते. ढगाळ थंड हवा असली तर कोल्हा दिवसादेखील बाहेर पडतो. उष्मा फार असल्यास पाणी पिण्यास तो दुपारी बाहेर पडतो. कोल्हे एक एकटे किंवा दोन-तीन एके ठिकाणी असतात. कोल्ह्यांच्या ओरडण्याला कोल्हेकुई म्हणतात. संध्याकाळी किंवा पहाटे बरेच कोल्हे एकदम ओरडतात. कोल्ह्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथीतून वाहणाऱ्या स्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प यतो.

मादीला फेब्रुवारी ते मार्च-एप्रिलमध्ये चार पिल्ले होतात. पिल्ले बाळगली तर चांगली माणसाळतात.

दातार, म. चिं.