कोल्लॉदी, कार्लो : (२४ नोव्हेंबर १८२६–२६ ऑक्टोबर १८९०). इटालियन बालसाहित्यकार आणि पत्रकार. खरे नाव कार्लो लोरेनत्सीनी. जन्म फ्लॉरेन्स येथे. तस्कनीमधील कोल्लॉदी ह्या खेड्यात त्याच्या बालपणीचा बराचसा काळ गेल्यामुळे ‘कोल्लॉदी’ हे टोपणनाव घेऊन लेखन केले. II Lampione (१८४८) आणि La Scaramuccia (१८५३) ही नियतकालिके त्याने चालविली. तथापि त्याची कीर्ती मुख्यत: त्याच्या Le avventure di Pinocchio, storia di un burattino (१८८०, इं.भा. द स्टोरी ऑफ अ पपिट, १८९२) ह्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकावरच अधिष्ठित आहे. जिवंत मुलगा होऊ इच्छिणाऱ्या एका कळसूत्री बाहुल्याची ही गोष्ट. जगातील अनेक भाषांत ह्या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. वॉल्ट डिझ्नी ह्या विख्यात अमेरिकन चित्रनिर्मात्याने त्यावर Pinocchio (१९३९) हा चित्रपटही काढला आहे. कोल्लॉदीचे स्मारक म्हणून इटलीत दोन बालोद्याने उभारण्यात आली असून, त्यांत Pinocchio मधील दृश्ये भित्तिचित्रांकित केली आहेत. कोल्लॉदी फ्लॉरेन्समध्ये निधन पावला.
आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) शिरोडकर, द. स. (म.)