क्वाझीमोदो, साल्व्हातोरे: (२० ऑगस्ट १९०१ — १४ जून १९६८) इटालियन कवी. १९५९ चा नोबेल पारितोषिक विजेता. जन्म मॉडिका, सिसिली येथे. रोम येथे राहून अभियांत्रिकीची पदवी घेतली. तो फावल्या वेळात कविता लिहीत असे. पुढे तो इटालियन वाङ्मयाचा प्राध्यापक बनला. Acque eterre (१९३०,इं. शी. वॉटर्स अँड लँड्स) या त्याच्या पहिल्या कवितासंग्रहात त्याने खिन्न वातावरण निर्माण करण्यासाठी निसर्गघटकांचा उपयोग केलेला आहे. त्यानंतरच्या ‘Oboe Sommerso’(१९३२, इं. शी. द संकन ओबो) व ‘Odoredi Eucalyptus’(इं. शी. सेंट ऑफ युकॅलिप्टस) सारख्या काव्यकृतींत फ्रेंच प्रतीकवाद्यांचा त्याच्यावर पडलेला प्रभाव दिसून येतो. विचार व भावना यांचे नकळत घडून आलेले साहचर्य दाखविण्यासाठी शब्दांचा क्रम अनपेक्षित ठेवलेला आहे. या वेळेपर्यंत साल्व्हातोरे क्वाझीमोदोने सुसंस्कृत पण स्वतःची अशी दिलचस्प शैली कमावली होती.
वयाच्या सु. पस्तिसाव्या वर्षी त्याने ग्रीक व लॅटिन अभिजात साहित्य अनुवादण्यास सुरुवात केली. त्याचे सुपरिणाम त्याच्या कवितेतील शब्दकळेवर झाले. त्याच्या अनुवादावरून त्याला मुळातल्या साहित्याचे आकलन असून आधुनिकतेचे भानही होते, असे दिसून येते. १९४७ मध्ये त्याने Giorno dopo giorno (इं. शी. डे आफ्टर डे) प्रसिद्ध केले. विशुद्ध तांत्रिक परिपूर्णतेकडून क्वाझींमोदो सामाजिक वास्तवतेकडे वळला. नेपल्स येथे तो निधन पावला.
संदर्भ : Mandelbaum, Allen Trans. And Ed. Selected Writings of Salvatore Quasimodo, 1960.
आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) शिरोडकर, द. स. (म.)
“