ख्रिस्ती संत : ‘संत’ हा शब्द इंग्रजीतील ‘सेंट’ या शब्दाचा मराठी पर्याय म्हणून वापरला आहे. सेंट हा इंग्रजी शब्द sanctus (लॅटिन), haegios (ग्रीक) आणि qadosh (हिब्रू) या शब्दांशी संबंधित आहे. हे लॅटिन, ग्रीक व हिब्रू शब्द व्यक्तीप्रमाणेच समुदाय व वस्तू ह्यांनाही विशेषण म्हणून लावले जातात आणि तेव्हा त्यांचा अर्थ ‘परमेश्वरासाठी पवित्र केलेले’ असा होतो. एखाद्या व्यक्तीला उद्देशून हे शब्द वापरल्यास त्या व्यक्तीच्या नैतिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या उच्च पातळीचे ते द्योतक ठरतात.
ख्रिस्ती संताचे पावित्र्य, याचा अर्थ, येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराच्या सेवेस स्वतःला वाहून घेणे, असा मानण्यात येतो. येशूच्या बारा शिष्यांपैकी (अपॉसल्स) ज्याने त्याला शेवटी पकडून दिले, त्या जूडसला (यहुदाला) सोडून, उरलेले अकरा शिष्य हे ख्रिस्ती चर्चचे पहिले संत होत. यांशिवाय सेंट पॉल आणि बार्नाबस हे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याचे अनुयायी झाले. सर्व ख्रिस्ती पंथांत आद्य संत म्हणून या तेरा व्यक्तींना मान दिला जातो.
सेंट पॉलने समकालीन सर्व ख्रिस्ती व्यक्तींना ‘ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या व मानवाच्या सेवेला वाहून घेणारे’, म्हणून संत असे संबोधिले. यामागे त्याचा उद्देश ख्रिस्ताच्या अनुयायांनी संताला शोभेल असे वागावे, हा होता. अर्थातच आरंभी संत ही संज्ञा समुदायाला उद्देशून वापरण्यास सुरुवात झाली. नंतर ज्या व्यक्तींना येशू ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासासाठी छळ सोसावा लागला आणि हौतात्म्य पतकरावे लागले तसेच ज्यांचे चारित्र्य संपूर्णपणे पवित्र असल्याचा अनुयायांना अनुभव आला, अशा व्यक्तींना अनुलक्षूनही, बहुधा त्यांच्या मृत्यूनंतर, ख्रिस्ती चर्चने ही संज्ञा त्यांना विधिपूर्वक बहाल करण्यास सुरुवात केली.
येशूचे पवित्र जीवन व विशुद्ध चारित्र्य, त्याचा शांत स्वभाव, इतर मानवांविषयीची त्याची कळकळ, छळ सोसण्याची त्याची आत्यंतिक सहनशक्ती, आध्यात्मिक विश्वासासाठी मृत्यू स्वीकारण्याची त्याची तयारी यांचा आदर्श समोर ठेवून, त्या कसोटीला उतरणाऱ्या व्यक्तींनाच संतांच्या मालिकेत स्थान देण्याची दक्षता चर्चने घेतल्याचे आढळते. तथापि अनेक वर्षांनंतर यांतील काही संतांच्या नावांबाबत सबळ कारणांनी उलट पुरावाही उघडकीला आल्यामुळे संताच्या मालिकेतून अशा व्यक्तींची नावे काढून टाकल्याचीही उदाहरणे आहेत.
रोमन बादशहा कॉन्स्टंटीन ह्याने ३१३ मध्ये एका वटहुकुमान्वये ख्रिस्ती जनांचा छळ थांबविला व ख्रिस्ती धर्माला महत्त्वाचे स्थान दिले. परंतु या नव्या घटनेमुळे चर्चच्या आध्यात्मिक जीवनात निराळ्या प्रकारची संकटे निर्माण झाल्याचा दावा काही धर्मोपदेशकांनी केला. राजकीय सत्ता आणि महत्त्वाकांक्षा ह्यांमुळे आध्यात्मिक जीवनाची पातळी खालावेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ख्रिस्ती धर्मतत्वे, धर्माचरण इत्यादींचे सनातनी भूमिकेतून पालन करणाऱ्या व्यक्तींनाही चर्चच्या संमतीने संत म्हणून चौथ्या शतकापासून ओळखण्यात येऊ लागले. त्यांना ‘कन्फेसर’ म्हटले जाई. कन्फेसरचे जीवन म्हणजे एक प्रकारचे हौतात्म्यच मानण्यात येई.
संतपदासाठी स्थानिक चर्चची अथवा जागतिक चर्चची मान्यता असावी लागते. संबंधित व्यक्तीचे नैतिक आणि आध्यात्मिक जीवन ख्रिस्ती परंपरेला धरून आदर्शभूत असणे व त्याचा इतरांवर प्रभाव पडणे आवश्यक असते. अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी होते. अशी मान्यता मिळाल्याचा जाहीरनामा (ईडिक्ट) चर्चचा सर्वश्रेष्ठ धर्मोपदेशक पोप किंवा आर्चबिशप काढतो व त्यात त्या व्यक्तीचे गुणवर्णन (सायटेशन) करण्यात येते. हे सर्व ठराविक धार्मिक विधींनी जगाच्या निदर्शनास आणण्यात येते. यास ‘कॅननायझेशन’ म्हणतात.
धर्मसुधारणेनंतर (सोळावे शतक) रोमन कॅथलिक पंथ आणि प्रॉटेस्टंट परंपरेतील फक्त अँग्लिकन चर्च यांच्यातच संतपद बहाल करण्याची पद्धत चालू राहिली. इतर ख्रिस्ती पंथांत संतपरंपरा विहित नसल्यामुळे त्यांत पारंपारिक संतांच्या तोडीचे कर्तृत्व असणाऱ्या काही थोर व्यक्ती जरी होऊन गेल्या, तरी त्यांचा अंतर्भाव संतमालिकेत झाला नाही. पारंपारिक संतांचे स्मृतिदिन पाळले जातात.
सर्व ख्रिस्ती संतांची विस्तृत माहिती सी. पी. एस्. क्लार्कच्या एव्हरीमन्स बुक ऑफ सेंट्स या ग्रंथात दिलेली आहे. त्यातील निवडक संतांची यादी खाली दिली आहे
संताचे नाव (* = हौतात्म्य प्राप्त झाले) |
निधन काल (इ. स.) |
स्मृतिदिन |
संत जेम्स (द ग्रेटर)* |
४३ |
२५ जुलै |
संत पॉल* |
सु. ६७ |
२५ जानेवारी |
संत क्लेमंट ऑफ रोम * |
सु. ९७ |
२३ नोव्हेंबर |
संत मथायस |
पहिले शतक |
२४ फेब्रुवारी |
संत मार्क |
पहिले शतक |
२५ एप्रिल |
संत जेम्स* |
पहिले शतक |
१ मे |
संत फिलिप* |
पहिले शतक |
१ मे |
संत बार्नाबस |
पहिले शतक |
११ जून |
संत पीटर* |
पहिले शतक |
२९ जून |
संत बार्थोलोम्यू* |
पहिले शतक |
२४ ऑगस्ट |
संत मॅथ्यू |
पहिले शतक |
२१ सप्टेंबर |
संत ल्यूक |
पहिले शतक |
१८ ऑक्टोबर |
संत सायमन* |
पहिले शतक |
२८ ऑक्टोबर |
संत जूडस |
पहिले शतक |
२८ ऑक्टोबर |
संत अँड्रू* |
पहिले शतक |
३० नोव्हेंबर |
संत टॉमस* |
पहिले शतक |
२१ डिसेंबर |
संत स्टीव्हेन* |
पहिले शतक |
२६ डिसेंबर |
संत जॉन द डिव्हाइन |
पहिले शतक |
२७ डिसेंबर |
संत मेरी मॅग्दालिन |
पहिले शतक |
२२ जुलै |
संत इग्नेशस* |
सु. १०७ |
३१ जानेवारी |
संत पॉलिकार्प* |
सु. १५५ |
२६ जानेवारी |
संत सिसिलिया* |
सु. १८० |
२२ नोव्हेंबर |
संत फेबियन* |
सु. २५० |
२० जानेवारी |
संत क्रिस्टोफर |
सु. २५० |
२५ जुलै |
संत ॲगाथा* |
२५१ |
५ फेब्रुवारी |
संत सिप्रियन* |
२५८ |
१६ सप्टेंबर |
संत प्रित्सा* |
२६५ |
१८ जानेवारी |
संत व्हॅलेंटाइन* |
२७० |
१४ फेब्रुवारी |
संत क्रिस्पिन* |
२८५ |
२५ ऑक्टोबर |
संत सिबॅश्चन* |
३०३ |
२० जानेवारी |
संत अग्नेस* |
३०३ |
२१ जानेवारी |
संत जॉर्ज* |
सु. ३०३ |
२३ एप्रिल |
संत व्हिन्सेंट* |
३०४ |
२२ जानेवारी |
संत पँग् क्रस* |
३०४ |
१२ मे |
संत ऑल्बन* |
३०४ |
२२ जून |
संत कॅथरिन* |
सु. ३०७ |
२५ नोव्हेंबर |
संत ल्यूशन* |
सु. ३१२ |
८ जानेवारी |
संत ब्लेझिअस* |
३१६ |
३ फेब्रुवारी |
संत हेलीना |
सु. ३२७ |
२१ मे |
संत अँटोनी |
सु. ३५६ |
१७ जानेवारी |
संत हिलारी |
सु. ३६८ |
१३ जानेवारी |
संताचे नाव (* = हौतात्म्य प्राप्त झाले) |
निधन काल (इ. स.) |
स्मृतिदिन |
संत ॲथानेशिअस |
३७३ |
२ मे |
संत बॅझिल |
३७९ |
१४ जून |
संत मोनिका |
३८८ |
४ मे |
संत अँब्रोझ |
३९७ |
४ एप्रिल |
संत निकोलस |
चौथे शतक |
६ डिसेंबर |
संत जॉन क्रिसॉस्टम |
४०७ |
२७ जानेवारी |
संत जेरोम |
४२० |
३० सप्टेंबर |
संत ऑगस्टीन |
४३० |
२८ ऑगस्ट |
संत उर्सुला* |
सु. ४५१ |
२१ ऑक्टोबर |
संत सिमिअन स्टायलटीस |
४५९ |
५ जानेवारी |
संत पॅट्रिक |
सु. ४६१ |
१७ मार्च |
संत बेनेडिक्ट |
५४७ |
२१ मार्च |
संत कोलंबा |
५९७ |
९ जून |
संत ऑगस्टीन |
६०४ |
२६ मे |
संत एड |
६६४ |
७ जानेवारी |
संत जाइल्झ |
सातवे शतक |
१ सप्टेंबर |
संत बॉनिफेस* |
७५५ |
५ जून |
संत डन्स्टन |
९८८ |
१९ मे |
संत बर्नार्ड |
११५३ |
२० ऑगस्ट |
संत डॉमिनिक |
१२२१ |
४ ऑगस्ट |
संत फ्रान्सिस ऑफ असिसी |
१२२६ |
४ ऑक्टोबर |
संत टॉमस अक्वाय्नस |
१२७४ |
७ मार्च |
संत कॅथरिन ऑफ स्येना |
१३८० |
३० एप्रिल |
संत जोन ऑफ आर्क* |
१४३१ |
३० मे |
संत फ्रान्सिस झेव्हिअर |
१५५२ |
२ डिसेंबर |
संत इग्नेशिअस ऑफ लॉयोला |
१५५६ |
३१ जुलै |
संत टेरेसा |
१५८२ |
१५ ऑक्टोबर |
संत फ्रान्सिस द सॅलेस |
१६२२ |
२९ जानेवारी |
संत व्हिन्सेंट द पॉल |
१६६० |
२७ सप्टेंबर |
संदर्भ : Clarke, C. P. S. Everyman’s Book of Saints, New York.
आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)
“