ख्रिस्ती धर्मातील पदाधिकारी : ख्रिस्ती धर्माच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे स्वरूप व महत्त्व नव्या करारातील ‘प्रेषितांची कृत्ये’ ह्या पुस्तकात दिलेल्या ऐतिहासिक वर्णनाच्या आधारे सांगता येईल.
येशू ख्रिस्ताच्या देहावसानानंतर उरलेल्या अकरा शिष्यांनी येशूने सोपवून दिलेले कार्य पुढे चालू ठेवण्याचे ठरविले. हे कार्य पुढील प्रकारचे होय : (१) देवाचे राज्य आले आहे, ह्या शुभवर्तमानाचा प्रचार करणे, (२) गरजू लोकांची सेवा करणे व (३) ख्रिस्ताच्या अनुयायांना योग्य ते धार्मिक शिक्षण देऊन तसेच एकमताने स्वीकारलेल्या संस्कारांचे व विधींचे पालन करून त्यांचा विश्वास (फेथ) दृढ करणे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या अनुयायांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतशी चर्चची संख्याही वाढत गेली. त्यामुळे प्रेषितांनी (अपॉसल्स) आपण स्वतः फक्त ‘ईश्वरी प्रार्थनेच्या व वचनाच्या सेवेत तत्पर रहावे’ व इतर सात प्रतिष्ठित माणसे निवडून त्यांच्यावर इतर सेवेचे काम सोपवावे असा निर्णय घेतला. पुढे चर्चच्या वाढत्या व्यापामुळे पदाधिकारी नेमून त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सुपूर्त करून त्यांच्या अधिकाराच्या कक्षा ठरविणे क्रमप्राप्त झाले. चर्चच्या ह्या सर्व एकत्रित कार्याला चर्चची ‘मिनिस्ट्री सर्व्हिस’ म्हणतात.
हे कार्य पार पाडण्यासाठी मोठ्या शहरातील चर्चमध्ये जी व्यवस्था आढळून येते, तिचेच प्रतिबिंब खेड्यातील लहान चर्चमधील व्यवस्थेतही आढळून येते. शहरातील चर्चच्या पुरोहितास (प्रीस्ट) जेवढे महत्व असते, तेवढेच खेड्यातील चर्चच्या पुरोहितास असते. ⇨ प्रॉटेस्टंट चर्चची यंत्रणा लोकशाही तत्त्वावर आधारलेली आहे. परंतु ⇨ रोमन कॅथलिक पंथ आणि अँग्लिकन चर्चची सत्ता प्रमुख धर्मगुरूच्या ठिकाणी केंद्रित झालेली असते. ह्या दोन परंपरांत आर्चबिशप किंवा बिशप आज्ञापत्रकाद्वारे पण धार्मिक विधिपूर्वक दीक्षा (ऑर्डिनेशन) देऊन चर्चचे दुय्यम प्रतीचे कार्यकर्ते (ऑफिसर्स) नेमतात व त्यांच्यावर ठराविक जबाबदाऱ्या सोपवितात. काहींना फक्त सामुदायिक उपासना चालविण्याची सनद दिली जाते त्यांना ‘कॅनन’ म्हणतात. कॅनन वेतनसेवी किंना मानसेवी असू शकतात. कॅथीड्रलच्या सर्वसाधारण कारभार चालविण्यासाठी बिशप, कॅननांचे एक मंडळ नेमतो. त्याचे अध्यक्षपद त्या कॅथीड्रलच्या ‘डीन’कडे असते. ह्या मंडळाला ‘चॅप्टर’ म्हणतात. खुद्द डीनची नेमणूक आर्चबिशप किंवा बिशप करतो. दहा मठवासी (मंक्स) एका डीनच्या अधिकाराखाली असतात. पर्यायाने डीन कॅथीड्रलवर सर्व प्रकारे देखरेख करतो. गरज पडल्यास धर्मप्रांताच्या एखाद्या भागाचा सर्वसाधारण कारभार पाहण्यासाठी पोप किंवा बिशप ‘रूरल डीन’ चीही नेमणूक करतात.
या व्यतिरिक्त, रोमन कॅथलिक आणि अँग्लिकन पंथांत (चर्चमध्ये) मठवासी आणि मठवासिनी (नन्स) ह्यांचा एक वेगळाच वर्ग (ऑर्डर) असतो. लौकिक जगापासून विभक्त व आजन्म अविवाहित राहून पवित्र शास्त्राचे अहोरात्र मनन करणे, प्रार्थना व अभ्यास यांत वेळ घालवणे व लोकोपयोगी कार्य करणे, ही त्यांची चर्चसेवा होय. ते ज्या मठात राहतात, त्याला ‘ॲबी’ व मठप्रमुखाला ‘ॲबट’ म्हणतात. कॉन्व्हेंटच्या प्रमुख मठवासिनीला ‘मदर सूपीरिअर’ म्हणतात व तिच्या देखरेखीखाली इतर धार्मिक संस्थाही असू शकतात.
ख्रिस्ती धर्माच्या परंपरेने चालत आलेल्या अनेक प्रथांत, तीन मुख्य पदाधिकारी आहेत : (१) बिशप-डायसेसचा प्रीस्ट व मुख्य (२) प्रेसबिटर-आचार्य वा स्थानिक प्रीस्ट व (३) डीकन-ज्येष्ठ (एल्डर).
ख्रिस्ती चर्चव्यवस्थेच्या प्रारंभीच्या काळात बिशप व प्रेसबिटर ह्यांचा हुद्दा समान मानण्यात येत असे. त्यांच्या पदग्रहणविधीच्या वेळी करण्यात येणाऱ्या प्रार्थनेवरून त्यांच्यावरील जबाबदारीची कल्पना येते. त्यांना चर्चचे ‘मिनिस्टर’ असे संबोधण्यात येत असे. ‘चर्चचे सेवाकार्य’ पार पाडण्याकरिता निवडलेला व विधिपूर्वक नेमलेला, असा मिनिस्टर ह्या पदाचा अर्थ आहे.
बिशपची नेमणूक करताना जी प्रार्थना करण्यात येते, तीत बिशपच्या कार्याचा उल्लेख करण्यात येतो. चर्चचे संवर्धन करणे, चर्चच्या संस्कारांचे पालन करणे, प्रभुभोजनाच्या विधीचे संपूर्ण नेतृत्व करणे आणि चर्चची शिस्त राखणे, ही बिशपची मुख्य कार्ये होत.
प्रेसबिटरच्या नेमणुकीच्या वेळी त्याच्या कार्याचा प्रार्थनेत उल्लेख करण्यात येतो. ज्या चर्चवर त्याची नेमणूक करण्यात येते, त्या चर्चच्या कारभारावर (गव्हर्न्मेंट ऑफ काँग्रगेशन) देखरेख करणे आणि मिळालेल्या सत्तेचा शुद्ध अंतःकरणाने वापर करणे, ही प्रेसबिटरची प्रमुख कार्ये होत.
तिसरा पदाधिकारी ‘डीकन’ हा असून, तो प्रेसबिटरचा वा बिशपचा साहाय्यक म्हणून ओळखला जातो. प्रभुभोजनाच्या वेळी भाकर व द्राक्षरस चर्चमध्ये आणणे, बिशपने किंवा प्रेसबिटरने त्यांवर केलेल्या धार्मिक विधीनंतर चर्चच्या सभासदांत त्यांची वाटणी करणे, ही कामे डीकनकडे असतात. एरवी आर्थिक व्यवस्था, पत्रव्यवहार वगैरे कामात तो बिशपचा किंवा प्रेसबिटरचा मदतनीस म्हणून काम करतो.
बिशप : बिशप हा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारा व सत्ता धारण करणारा पदाधिकारी आहे. बिशपांची एक परंपरा मानली जाते. येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट पीटर हा सर्वांत पहिला बिशप होय. त्याच्या नंतरच्या बिशपला धर्मोपदेशकाची दीक्षा देताना, सेंट पीटरने त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. त्या बिशपने तोच आशीर्वाद नंतरच्या बिशपांना आणि इतर नव्या बिशपांना दिला. अशा रीतीने सेंट पीटरने दिलेल्या पहिल्या आशीर्वादाची परंपरा आजपर्यंत चालत आली आहे. ह्याला ‘बिशपांची परंपरा’ (अपॉसलिक सक्सेशन) म्हणतात. रोमन कॅथलिक चर्च, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च व अँग्लिकन चर्च ह्या पंथांत ह्या ऐतिहासिक घटनेला विशेष महत्त्वाचे स्थान असून, इतर पदाधिकाऱ्यांपेक्षा बिशपचा हुद्दा श्रेष्ठ मानला जातो. बिशप हा फक्त एकाच चर्चचा मुख्य नसून, अनेक चर्चेस मिळून बनलेल्या धर्मप्रांताचाही तो प्रमुख असतो. बिशपच्या हुद्यावर धर्मोपदेशकाची नेमणूक करण्यापूर्वी त्याला विधिपूर्वक विभक्त करण्यात (सेंटिग अपार्ट) येते. धर्मोपदेशकांना दीक्षा देऊन त्यांना धर्मगुरू म्हणून काही विशेष हक्क व जबाबदाऱ्या देण्याचा बिशपला अधिकार असतो [→ बिशप].
ख्रिस्ती धर्माला ३८० च्या सुमारास रोमन साम्राज्याचा राष्ट्रधर्म म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे ख्रिस्ती चर्चव्यवस्था अधिक विस्तृत झाली. रोमन साम्राज्यातील मुख्य प्रांतांच्या बिशपांना ⇨ आर्चबिशप ही उपाधी देण्यात आली. काही महत्त्वपूर्ण शहरांच्या (रोम, कॉन्स्टँटिनोपल, अँटीयोक, जेरूसलेम, ॲलेक्झांड्रिया) बिशपांना ‘पेट्रिआर्क’ म्हटले जाऊ लागले आणि रोमच्या आर्चबिशपला ‘पोप’ ही विशेष सन्माननीय उपाधी देण्यात आली. ‘पोप’ ही विशेष सन्माननीय उपाधी देण्यात आली. ‘पोप’ हा शब्द ‘पापा’ म्हणजे पिता ह्या शब्दावरून आला [→ पोप].
चर्चच्या संघटनेनुसार देशाची वेगवेगळ्या धर्मप्रांतांत (डायोसेस) विभागणी करण्यात येते. प्रत्येक धर्मप्रांताचा प्रमुख बिशप असतो. अँग्लिकन परंपरेत काही ठराविक भागांच्या बिशपांना आर्चबिशप म्हणतात, तर चर्च ऑफ साउथ इंडिया आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडिया यांच्या मुख्य बिशपाला ‘मॉडरेटर’ म्हणतात व त्याची निवड दर तीन वा पाच वर्षांनी सर्व बिशप एकत्र येऊन करतात.
ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुख बिशपास पेट्रिआर्क म्हणतात. १०५९ मध्ये पोप दुसरा निकोलस ह्याने एक फर्मान काढून, तेथून पुढच्या पोपची निवड ‘कॉलेज ऑफ कार्डिनल्स’ यांच्याकडे सोपविली.
रोमन कॅथलिक चर्चमध्ये वरिष्ठ धर्मगुरूंचा जो एक वर्ग आहे, त्याला ‘कार्डिनल’ म्हणतात. कार्डिनल ह्या शब्दाचा अर्थ ‘ज्याच्यावर मूलभूत महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत’ असा असून, लॅटिन शब्द Cardo म्हणजे ‘बिजागरी’ ह्या शब्दापासून तो आला आहे. कार्डिनलांमधूनच पोपची निवड करण्यात येते. त्यांची ‘सेक्रेड कॉलेज ऑफ कार्डिनल्स’ म्हणून एक संघटना आहे. ह्या संघटनेत ६ बिशप, ५० इतर प्रीस्ट व १४ डीकन्स अशा एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ह्या संघटनेमार्फत पोपची निवड होते. उपरिनिर्दिष्ट संघटनेतील ७० पदाधिकारी पोपच्या सल्लागार मंडळाचे सभासद म्हणूनही काम पाहतात.
सुरुवातीला बिशपांच्या खालोखाल कार्डिनलांचा दर्जा असे परंतु सध्या कार्डिनलांचा दर्जा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यांचा पोषाख, लाल रंगाचा लांब झगा, त्यावर जांभळ्या रंगाचे प्रावरण आणि लाल रंगाची हॅट असा असतो.
आरंभी सर्वच बिशपांना पोप म्हणत असत. परंतु १०७६ मध्ये रोम येथे बिशप हिल्डेब्रँडच्या (सु. १०२० ते ८५) अध्यक्षतेखाली एक धर्मसभा भरली आणि तीत फक्त रोमच्या बिशपलाच ‘पोप’ असे संबोधून त्याला ‘जागतिक चर्चचे ऐहिक मस्तक’ (अर्थली हेड ऑफ द चर्च युनिव्हर्सल) म्हणून मानले जावे, असे ठरविण्यात आले.
प्रेसबिटर : (प्रीस्ट). आरंभी बिशप आणि प्रेसबिटर समान दर्जाचे समजले जात परंतु आता बिशपच्या खालोखाल प्रेसबिटर हा पदाधिकारी असतो. हा स्थानिक चर्चचा धर्मगुरू असतो. त्याचे मुख्य काम चर्चच्या सभासदांनी निवडलेल्या किंवा बिशपने नेमलेल्या कार्यकारी मंडळाच्या साहाय्याने चर्चची व्यवस्था पाहणे, हे होय. तसेच धार्मिक दीक्षाविधीद्वारे प्राप्त झालेल्या हक्कान्वये धार्मिक संस्कारांचे व विधींचे पालन करणे, हेही त्याचे प्रमुख काम होय. त्याला प्रथम योग्य ते धार्मिक शिक्षण देण्यात येते. त्याच्या निवडीबाबत काही नियम रूढ आहेत. त्यांनुसार धर्मोपदेशकाची निवड करून त्यास विधिपूर्वक विभक्त करण्यात येऊन धर्मोपदेशकाची दीक्षा देण्यात येते. काही प्रॉटेस्टंट पंथांत प्रेसबिटरला धर्मोपदेशक मानत नाहीत. चर्चचा आर्थिक कारभार सांभाळण्यासाठी व समाजसेवेची इतर कार्ये पार पाडण्यासाठी प्रेसबिटरची निवड करण्यात येते पण त्याला प्रभुभोजन देण्याचा अधिकार नसतो. तथापि तो प्रभुभोजनसमयी, डीकनप्रमाणे धर्मगुरूला मदत करू शकतो.
रोमन कॅथलिक पंथात प्रीस्टला चर्चमध्ये उपदेश (प्रवचन) करणे, बाप्तिस्मा देणे, आशीर्वाद देणे हे अधिकार आहेत. अँग्लिकन चर्चमध्ये तो प्रभुभोजनही देऊ शकतो.
डीकन :बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये नावाच्या सहाव्या पुस्तकात डीकनचा उल्लेख आहे. मूळ ग्रीक diakonos ह्या शब्दाचा अर्थ ‘मदतनीस’ किंवा ‘दूत’ असा आहे. प्रथम बिशप, नंतर प्रीस्ट (प्रेसबिटर) व शेवटी डीकन असा क्रम आहे. प्रीस्टच्या धर्मकार्यात त्याला साहाय्य करण्यासाठी डीकनची नेमणूक करण्यात येते किंवा चर्चच्या सभासदांकडून त्याची निवड करण्यात येते. प्रेसबिटेरियन पंथात त्याला ‘ज्येष्ठ’ म्हणतात. चर्चच्या आर्थिक व सर्वसाधारण कारभारात त्याची प्रामुख्याने मदत होते. प्रभुभोजन देण्याची त्याला सनद नसते परंतु प्रभुभोजनाच्या विधीत तो प्रीस्टला मदत करतो. स्त्रियांचीही ह्या पदावर नेमणूक किंवा निवड करता येते. त्यांना ‘डीकनेस’ म्हणतात.
धर्मप्रांताच्या काही भागांवर गरज पडल्यास देखरेख करण्यासाठी बिशप ‘आर्चडीकन’ ची नेमणूक करू शकतो. प्रभुभोजन देणे, आर्थिक व्यवस्था व सर्वसाधारण देखरेख यांचा त्याच्या जबाबदारीत समावेश होतो. तो वेतनसेवी असतो.
डिग्निटरीज : चर्चच्या संघटनेत जरी अनेक हुद्दे असले, तरी ज्यांना प्रभुभोजनाचे द्रव्य (एलिमेंट) पवित्र करून विभक्त करण्याची सनद असते, त्यांनाच चर्चचे खरे ‘डिग्निटरीज’ म्हणून ओळखण्यात येते. डिग्निटरीजना हे प्रभुभोजन उपासकांना नंतर वाटण्यास इतर पदाधिकारी मदत करू शकतात. ह्या दृष्टिकोनातून आर्चबिशप, बिशप आणि प्रेसबिटर हेच फक्त चर्च डिग्निटरीज म्हणून ओळखले जातात.
संदर्भ : 1. Ehrhardt, Arnold, Apostolic Succession in the First Two Centuries of the Church, London, 1953.
2. Jenkins, Claude Mackenzie, K. D. Ed. Episcopacy : Ancient and Modern, London, 1935.
3. Moberly, R. C. Ministerial Priesthood, London, 1897.
4. Telfer, William, The Office of a Bishop, London, 1962.
5. Turner, C. H. Cambridge Medieval History, Vol. I, London, 1964.
आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)
“