क्लोराइट : (क्लोराइट स्पार, क्लोरिटॉइड). खनिज. स्फटिक एकनताक्ष प्रचिनाकार. छद्मषट्फलकीय वडीसारखे [→ स्फटिकविज्ञान]. स्फटिकांची ठेवण अभ्रकाच्या स्फटिकांसारखी असते, मात्र रेखीव स्फटिक क्वचित आढळतात. सामान्यपणे पर्णित पुंजांच्या किंवा पापुद्र्यांच्या ढिगाच्या व कधीकधी विखुरलेल्या सूक्ष्म किंवा मातीच्या रूपातही आढळते. पाटन : (001) उत्कृष्ट [→ पाटन]. याचे पत्रे नम्य (लवचिक) परंतु अप्रत्यास्थ असतात (स्थितिस्थापक नसतात). कठिनता २—२·५. वि. गु. २·६—२·९. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी, मोत्यासारखी ते मातीसारखी. रंग निरनिराळ्या हिरव्या छटा क्वचित पांढरा, पिवळा वा गुलाबी. कस पांढरा किंवा फिकट हिरवा. रा. सं. Mg3 (Si4O10) (OH)2 Mg3(OH)6. क्लोराइटांची विशाल समरूप मालाच आहे. तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आणवीय प्रतिष्ठापन (एका अणूच्या जागी दुसरा अणू येणे) होत असते. क्लोराइट सामान्य खनिज असून ते सर्वत्र आढळते. बहुधा ते द्वितीयक स्वरूपाचे (नंतरच्या क्रियांनी बनलेले) असते. ॲल्युमिनियम, फेरस लोह व मॅग्नेशियम या मूलद्रव्यांनी युक्त असणाऱ्या पायरोक्सिने, अँफिबोले, कृष्णाभ्रक, गार्नेट, आयडोक्रेज यांच्यासारख्या सिलिकेटांमध्ये वातावरणक्रियेने किंवा रूपांतरणाने बदल होऊन क्लोराइट तयार होते. काही सुभाजा (सहज भंगणारे रूपांतरित खडक) तर जवळजवळ पूर्णपणे क्लोराइटाच्या बनलेल्या असतात. पुष्कळ खडकांना आलेली हिरवट छटा क्लोराइटामुळे असते. जलतापीय (उच्च तापमानाच्या पाण्यातील) विद्रावांच्या द्वारेही काही क्लोराइट निक्षेपित झालेले (साचलेले) आहेत. खनिजाच्या रंगामुळे हिरवा या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून क्लोराइट नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.