गायत्री (मंत्र): गायत्री छंदातील एक मंत्र. उपनयन संस्कारात ब्रह्मचर्याची दीक्षा दिल्यावर ज्या मंत्राचा ब्रह्मचाऱ्यास आचार्याकडून उपदेश होतो, तो मंत्र ‘गायत्री मंत्र’ होय. हा मंत्र संध्यावंदन करताना नित्य जपायचा असतो. ऋग्वेदात गायत्री छंदातील पुष्कळ मंत्र किंवा ऋचा आहेत. या मंत्राची देवता म्हणजे वर्ण्यविषय ‘सविता’ देव आहे. गायत्री मंत्र हा सविता देवाच्या प्रार्थनेचा मंत्र आहे. म्हणून त्यास ‘सावित्री’ म्हणतात. त्याचा कर्ता म्हणजे ऋषी विश्वामित्र. तो मंत्र असा,
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्।।
(ऋ. ३·६२·१०)
अर्थ : सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.
या गायत्री मंत्राचा जप पापनाशाकरताही करावयास सांगितला आहे. ‘गायत्री पुरश्चरण’ नामक तीन वर्षांचे तप धर्मशास्त्रात सांगितले आहे. या तपात या गायत्रीचा जप प्रतिदिन दीर्घकाल तीन वर्षे करावयाचा असतो. त्याच्या योगाने महापातकाचा नाश, विद्येचे तेज, वाचेची सिद्धी इ. फले प्राप्त होतात, असे सांगितले आहे. या मंत्राचा गूढ विशेष तात्त्विक अर्थ, जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणात सांगितला आहे.
पहा : उपनयन, संध्यावंदन.
संदर्भ : पणशीकर, वासुदेवशास्त्री, संपा. मनुस्मृति, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९०२.
जोशी, लक्ष्मणशास्त्री