गार : गडगडाटी वादळाशी निगडित असलेल्या गर्जन्मेघातून (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणाऱ्या व तसे करताना भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण होऊन विद्युत् विसर्जन झाल्यामुळे गर्जना करणाऱ्या मेघातून) क्वचित प्रसंगी कठीण हिमखंडांची वृष्टी होते. या हिमखंडांना गारा म्हणतात. गारेला ‘करक:’, ‘उपल’, ‘वर्षोपल’ अशा संस्कृत संज्ञा आहेत. गारा विविध आकाराच्या असतात. त्या गोलाकृती, शंकूच्या आकाराच्या किंवा वेड्यावाकड्याही असतात. गारेचा छेद घेतला असता तीमध्ये एकाआड एक कठीण बर्फाचे पारदर्शक व हिमाचे अपारदर्शक स्तर असल्याचे आढळते. गारांचे आकारमानही विविध असते. गारा ३-४ मिमी. व्यासांच्या लहान आकारमानापासून तो थेट मोठ्या नारिंगाएवढ्याही असू शकतात. वजनाने एक किग्रॅ. हून थोड्या मोठ्या गारा आढळल्या आहेत. क्वचित प्रसंगी त्यांचा व्यास १२ सेंमी. पेक्षा अधिक असलेला आढळला आहे.
अतितीव्र गडगडाटी वादळ म्हणजेच गारांचे वादळ. गर्जन्मेघात जलांश फार मोठा असतो. या मेघांची उंची १०–१२ किमी. ते २० किमी. पर्यंत असल्यामुळे त्याच्या माथ्याकडील भागाचे तापमान पाण्याच्या गोठणबिंदूच्या (०० से. तापमानाच्या) बरेच खाली असते व माथा हिमकणांचा बनलेला असतो. मेघाच्या मधल्या भागाचे तापमान पाण्याच्या गोठणबिंदूहून खाली असते व तेथे मुख्यत्वे अतिशीत जलबिंदू (०० से. तापमानापेक्षा कमी तापमान असतानाही द्रवावस्थेत असलेल्या पाण्याचे बिंदू) व अल्पांशाने हिमकण असतात. मेघामध्ये असलेल्या हवेच्या जोरदार ऊर्ध्व प्रवाहामुळे हे जलबिंदू तरते ठेविले जातात. याच ऊर्ध्व प्रवाहामुळे मेघाच्या मधल्या भागात असलेल्या काही हिमकणांचे भोवतालच्या अतिशीत जलबिंदूंवर आघात होतात व जलबिंदूंसह त्यांचे संमीलन (एकत्रिकरण) होते. त्यामुळे हिमकणांचे आकारमान वाढत जाते व मोठी गार निर्माण होते. १० सेंमी. व्यासाची गार ढगातील हवेत तरती ठेवायला ५० मी./सेकंद यापेक्षाही अधिक वेगवान ऊर्ध्व प्रवाह आवश्यक असतात.
गारेमधील अपारदर्शक स्तर अतिशीत जलबिंदू गोठून हिमावरण निर्माण होण्याच्या वेळी त्यामध्ये अडकून पडलेल्या हवेच्या सूक्ष्म बुडबुड्यांमुळे निर्माण झालेले असतात. ही क्रिया घडण्यासाठी अतिशीत जलबिंदूंचे तापमान -५० से. पेक्षा कमी असावे लागते. यावरून अशी कल्पना मांडण्यात आली आहे की, ज्यावेळी गार ढगामध्ये -५० से. तापमान असलेल्या उंचीच्या वर-खाली हेलकावे घेत असेल त्याच वेळी तिच्यात एकाआड एक अपारदर्शक व पारदर्शक स्तर निर्माण होत असावेत आणि गारांचे वजन तोलून धरण्याइतपत ऊर्ध्व प्रवाह त्या ठिकाणी असावेत. यासंबंधी दुसरी एक परिकल्पना अशी आहे की, गारेतील पारदर्शक स्तर, अतिशीत जलावरणाच्या मंदपणे होणाऱ्या गोठणाचे द्योतक असावेत. तसेच, अपारदर्शक स्तर त्वरेने होणारे गोठण सुचवीत असावेत. अर्थात गोठणत्वरा हवेच्या एकक घनफळागणिक असणाऱ्या अतिशीत जलबिंदूंच्या संख्येवर अवलंबून असावी. अतिशीत जलबिंदूच्या गोठण्याच्या वेळी त्यातून वितळण्याची सुप्त उष्णता (तापमानात बदल न होता पदार्थाचे द्रवरूपातून घनरूपात अवस्थांतर होताना बाहेर पडणारी उष्णता) बाहेर पडते. या वितळण्याच्या सुप्त उष्णतेचे विकिरण (सर्वत्र प्रसार व विसर्जन) झाल्यावरच जलबिंदूचे गोठण होऊ शकते.
वर वर्णिलेल्या सामान्य स्वरूपाच्या गारांव्यतिरिक्त गारांचे आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रकार संभवतात. (१) मृदू गार : ही अपारदर्शक, संपीडनशील (आकुंचनशील) व ठिसूळ असते. (२) क्षुद्र गार : या प्रकारच्या गारेच्या गर्भात मृदू गार असते व तिच्यावर पारदर्शक कठीण बर्फाचे एकच विलेपन असते. या दोन्ही प्रकारच्या गारा काही अल्प मिमी. व्यासाच्याच असतात. गारेची घनता तिच्या घटनेवर अवलंबून असते व ती एक घ. सेंमी. ला ०·१ ते ०·९ ग्रॅ. इतकी असते. गारांनी प्रभावित झालेले क्षेत्र साधारणपणे ३५ किमी. लांब व ११/२ किमी. रुंद असते. १६ मार्च १९५४ रोजी पुणे येथे मध्यम तीव्रतेचे गारांचे वादळ झाले. त्याने प्रभावित झालेल्या ६० चौ. किमी. च्या क्षेत्रात सु. २ × १०१२ (म्हणजे वीस हजार कोटी) गारा पडल्याचा अंदाज केला गेला. मोठ्या आकाराच्या गारांना वातावरणातील खालच्या थरात उष्णार्द्र हवा, ३–५ किमी. च्या उंचीवर हिमरेषा (०० से. तापमान असलेली पातळी), ह्या हिमरेषेपासून १० ते १५ किमी. उंचीपर्यंत वाढणारे गर्जन्मेघ, जोरदार उदग्र प्रवाह, भरपूर प्रमाणात तरंगणारे पाण्याचे कण व ढगात बऱ्याच उंचीपर्यंत संक्षोभ (खळबळ) आवश्यक असतो.
साधारणपणे मध्यम अक्षांशाच्या खंडांतर्गत प्रदेशांत उन्हाळ्यात गारा वारंवार पडतात. उत्तर व मध्य भारतात नैर्ऋत्य मॉन्सूनच्या आगमनापूर्वी उन्हाळ्यात गारांची वादळे निर्माण होतात. नैर्ऋत्य मॉन्सूनचे वारे प्रस्थापित झाल्यानंतर गारांची वादळे उद्भवत नाहीत. आकृतीमध्ये भारतीय उपखंडात १९६० मध्ये संपणाऱ्या सु. शंभर वर्षांच्या कालखंडात झालेल्या गार-वादळांच्या दिवसांची वारंवारता दर्शविली आहे. सर्वांत अधिक गार-वादळे (वर्षातून दहा दिवस) हिमालयात होतात लगतच्या व दक्षिणावर्ती सपाट प्रदेशांकडे त्यांची संख्या कमी होते (दोन वर्षांतून एक दिवस) दक्षिण बंगाल, बिहार व पूर्व मध्य प्रदेशात गार-वादळे थोड्या अधिक प्रमाणात होतात (वर्षातून एक दिवस). भारतीय किनारपट्टीवर गारा बहुतेक पडत नाहीत. महाराष्ट्रात नैर्ऋत्य मॉन्सूनचे वारे सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात जी गडगडाटी वादळे होतात त्यांमध्ये क्वचित प्रसंगी गारा पडतात.
गारांच्या वर्षावामुळे इमारतींना (विशेषतः खिडक्यांच्या तावदानांना), पिकांना, फळबागांना, गुराढोरांना व प्रसंगी माणसांनाही अपाय संभवतो. दोन सेंमी. व्यासापेक्षा मोठ्या गारांमुळे विमानांना व घरांच्या कौलारू छपरांना धोका पोहोचतो. टिनाच्या पत्र्यांच्या छपरांना छिद्रे पाडून मोठ्या गारा आत शिरल्याच्याही काही नोंदी आहेत.
पहा : गडगडाटी वादळ पर्जन्य वर्षण.
संदर्भ : 1. India Meteorological Department, Weather and the Indian Farmer, Poona, 1962.
2. List, R. New Developments in Hail Research (article in Science), New York, 1960.
गोखले, मो. ना.
“