ख्रिस्ती धर्मपंथ : येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वात व शिकवणीत ख्रिस्ती धर्म केंद्रित झाला आहे. ख्रिस्ती धर्मातील पंथोपपंथांचे पुढीलप्रमाणे तीन मुख्य विभाग आहेत : (१) रोमन कॅथलिक पंथ (चर्च), (२) मध्ययुगातील धर्मसुधारणांमुळे उदयास आलेली वेगवेगळी प्रॉटेस्टंट चर्चेस आणि (३) ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च. बायझंटिन संस्कारविधीशी संबद्ध असलेली सर्व चर्चेस ह्या तिसऱ्या विभागात समाविष्ट होतात.

ह्या तीन प्रमुख विभागांतील वेगवेगळ्या धर्मपंथांत (चर्चमध्ये) धार्मिक श्रद्धा व विधी ह्यांबाबतीत बरीच भिन्नता असली, तरी येशू ख्रिस्ताविषयी असलेले तीन महत्वाचे घटक ह्या सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक पुढीलप्रमाणे होत : (१) जीवन वृत्तांत : येशू ख्रिस्ताचे जीवन व कार्य ह्यांच्याशी संबद्ध असलेल्या घटनांचे संकलन करणारे शुभवर्तमान (गॉस्पेल), (२) धर्मसिद्धांत : येशू ख्रिस्त ही एक अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याच्या द्वारा मानवाला परमेश्वराशी योग्य संबंध प्रस्थापित करता येतो आणि (३) मानवी जीवन: परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्यांबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाबरहुकूम आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करत असते.

रोमन कॅथलिक चर्च व ]ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च ह्यांचे धर्मसिद्धांत व उपासनापद्धती ह्यांबाबतच्या बऱ्याच गोष्टींबद्दल एकमत आढळते परंतु ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमधील बऱ्याच मंडळ्या (कम्यूनियन) रोमच्या पोपची अधिसत्ता मान्य करत नाहीत. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च केंद्र कॉन्स्टँटिनोपल येथे आहे, तर रोमन कॅथलिक चर्चचे रोम येथे आहे. रोमन कॅथलिक चर्चचे बरेच धर्मसिद्धांत ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चला मान्य असले, तरी १०५४ मध्ये ते रोमन कॅथलिक चर्चमधून फुटून वेगळे झाल्यापासून, हे धर्मसिद्धांत ख्रिस्ती धर्माला आवश्यक आहेतच, असे ते मानत नाहीत. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. १२,२१,००,७७० (१९६१) आहे.

रोमन कॅथलिक चर्च : धर्मसिद्धांत व जीवनमार्ग निश्चित करणाऱ्या अधिकारपदाबद्दल प्रामुख्याने प्रॉटेस्टंट व ]रोमन कॅथलिक पंथ (चर्च) ह्यांच्यात मतभेद आहे. रोमन कॅथलिक पंथाच्या मते ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली चर्चमध्येच सर्वाधिकार केंद्रित झालेले आहेत. चर्चमुळे बायबलला प्रामाण्य प्राप्त झाले आहे, असे ते शिकवतात तर प्रॉटेस्टंट पंथाचे मत ह्याच्या अगदी उलट आहे. त्यांच्या मते ऐतिहासिक दृष्ट्या ख्रिस्ताखालोखाल बायबललाच सर्वोच्च अधिकार आहेत व चर्चचा अधिकार दुय्यम आहे. रोमन कॅथलिक पंथात वरील दृष्टिकोनामुळे रोमच्या चर्चला महत्वाचे स्थान मिळाले व पोपचे जाहीरनामे हे अंतिम निर्णायक ठरले. अखंड कुमारी व्रत, मेरीचे पावित्र्य, मेरीचे व ख्रिस्ती संतांचे प्रार्थनेतून चिंतन, प्रभुभोजनाची भाकरी व द्राक्षरस म्हणजे प्रत्यक्ष ख्रिस्ताचे शरीर व रक्त आहे असे मानणे इ. समजुती या दृष्टिकोनातूनच निर्माण झाल्या. उलटपक्षी  प्रॉटेस्टंट पंथाच्या दृष्टिकोनामुळे बायबलमधील वचनांचे भिन्न भिन्न व पुष्कळदा विरोधीही अर्थ पुढे आले व आपलाच अर्थ बरोबर आहे, असा दावा प्रत्येक प्रॉटेस्टंट पंथ करू लागला. रोमन कॅथलिक चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ५८,१०,००,००० (१९६१) आहे.

प्रॉटेस्टंट चर्चमधील पंथोपपंथ : प्रॉटेस्टंट चर्चमध्ये अनेक पंथोपपंथ उदयास आले. त्यांच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ३१,६२,८६,१०० (१९६१) आहे. त्यांपैकी पुढील पंथ विशेष महत्त्वाचे आहेत : (१) ल्यूथरन चर्च, (२) प्रेसिबिटेरियन चर्च, (३) मेथडिस्ट चर्च, (४) अँग्लिकन चर्च, (५) काँग्रिगेशनॅलिझम, (६) रिफॉर्मड चर्च आणि (७) बॅप्टिस्ट चर्च.

ल्यूथरन चर्च : धार्मिक क्रांती घडवून आणताना ]मार्टिन ल्यूथरने (१४८३ – १५४६) ज्या तत्त्वांचा पुरस्कार केला, ती तत्वे व त्या तत्वांनुसार असणारी धार्मिक श्रद्धा ह्या पंथात प्रमाण मानतात. पंथातील प्रत्येक चर्चचा कारभार त्या चर्चची संघटना स्वतंत्रपणे पहात असते. त्याबाबतीत तिला सर्वाधिकार असतात. ह्या पंथाचा ईश्वरविद्येबाबतचा मूलभूत धर्मसिद्धांत असा आहे, की येशू ख्रिस्ताने स्वतःचे बलिदान करून इतरांना प्राप्त करून दिलेल्या मुक्तीद्वारा आणि केवळ येशू ख्रिस्तावर नितांत विश्वास ठेवूनच मानव नीतिमान ठरतो (रोमकरांस पत्र ३ : २४). सर्व ]प्रॉटेस्टंट पंथांत जर्मनीमधील पंथ मोठा आहे. ल्यूथरन पंथाची आंतरराष्ट्रीय कार्यकारी समिती म्हणजे ‘ल्यूथरन वर्ल्ड फेडरेशन’ ही होय. ह्या चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ७,७९,४८,४६० (१९६१) आहे.

प्रेसबिटेरियन चर्च : चर्चच्या शासनाची एक विशिष्ट पद्धत अनुसरणारा हा पंथ आहे. यात न्यायालयातील अधिकारपदांसारखी अधिकारश्रेणी असते. दीक्षित व अदीक्षित सदस्यांचा यात समावेश असतो. कायदे करणे व ते अंमलात आणणे तसेच शिस्तभंगाबाबत कारवाई करणे इ. अधिकार सदस्यांना असतात. सर्व प्रेसबिटरांचा दर्जा समान असतो तथापि त्यांचे दोन वर्ग असतात : (१) दीक्षित धर्मगुरू (ऑर्डेन्ड मिनिस्टर्स) : शिकवणे, उपदेश करणे, प्रभुभोजन देणे ही त्यांची कामे होत व (२) शासक ज्येष्ठ (रूलिंग एल्डर्स) : चर्चच्या धर्मसभेने (काँग्रिगेशन) निवडून दिलेले हे चर्चचे सभासद असतात. चर्चचे शासन व व्यवस्थापन ह्यांच्याकडे असते. ह्या चर्चची एकूण चार अधिकारमंडळे (कोर्टस) असतात : (१) सेशन : हे मंडळ चर्चच्या सभासदांचे असते. त्यात दीक्षित धर्मगुरू व शासक ज्येष्ठ ह्यांचा समावेश असतो. धर्मगुरूंना धर्माधिकार प्रदान करण्याचा व न्यायनिवाडा करण्याचा अधिकार प्रेसबिटरींना असतो. तसेच सर्व धर्मसभांवरही त्यांची देखरेख असते. (३) धर्ममंडळ (सिनड): ठराविक प्रेसबिटरींमधील धर्मगुरू व शासक ज्येष्ठ ह्यांचा त्यात समावेश असतो. (४) महासभा (जनरल असेंब्ली) : ठराविक धर्मगुरू, शासक ज्येष्ठ व प्रतिनिधी ह्यांचा त्यात समावेश असतो. सर्व धर्मप्रांतांवर ह्यांची देखरेख असते.

प्राचीन चर्चच्या अपॉसल काळात अशा तऱ्हेची पद्धत अवलंबण्यात येत होती. धर्मसुधारणापूर्व काळातही काही गटांनी ही पद्धत अवलंबली होती. परंतु ]जॉन कॅल्व्हिन (१५०९ – ६४) ह्या फ्रेंच प्रॉटेस्टंट धर्मसुधारकाने फ्रान्स व स्वित्झर्लंडमध्ये धर्मसुधारणा काळात ह्या पद्धतीला आजचे स्वरूप प्राप्त करून दिले.

प्रेसबिटेरियन चर्चच्या तत्वज्ञानाचा प्रमाणग्रंथ बायबल होय. बायबल म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे वचन असून पवित्र आत्म्याने मानवाला त्याचा अर्थ विशद केला आहे, असे ते मानतात. त्याच्या खालोखाल ‘वेस्टमिन्स्टर कन्फेशन’ला ते महत्व देतात. १६४७ मध्ये त्यांनी वेस्टमिन्स्टर कन्फेशनचा अंगीकार केला. बाप्तिस्मा व प्रभुभोजन असे दोन विधी ते पाळतात व परमेश्वराच्या सार्वभौमत्वावर विशेष भर देतात. प्रॉटेस्टंट परंपरेतील पंथांमध्ये अनुयायांच्या संख्येच्या अनुयायांची जागतिक संख्या सु. ५,५०,००,००० (१९६१) आहे.


मेथडिस्ट चर्च : जॉन वेस्ली (१७०३ – ९१), चार्लस वेस्ली (१७०७ – ८८) व ऑक्सफर्डमधील इतर अनेक विद्यार्थ्यांनी मिळून १७२९ मध्ये ह्या पंथाची स्थापना केली. हे सर्व विद्यार्थी धार्मिक चर्चेसाठी एकत्र जमले होते. ख्रिस्ती धर्माला अभिप्रेत असलेली विहित कर्तव्ये व चर्चचे धार्मिक विधी ह्यांची त्यांना उत्तम जाणीव असल्यामुळे त्यांनी विविध कार्ये पद्धतशीरपणे पार पाडली. त्यांच्या शिस्तपूर्ण व अचूक कार्यपद्धतीला अनुलक्षून ‘मेथडिस्ट’ हे नामाभिधान त्यांच्या विद्यार्थी मित्रांनी त्यांना चेष्टेने बहाल केले. नंतर जॉन वेस्लीने ज्या धार्मिक संस्था स्थापन केल्या, त्यांनाही हेच नाव देण्यात आले.

पूर्वीचे ख्रिस्ती धर्मसिद्धांत, सहभागिता (फेलोशिप) व शिस्त ह्यांचे पुनरुज्जीवन म्हणजेच मेथडिस्ट पंथ, असे मानले जाते. केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळेच प्रत्येक मनुष्याला मुक्ती (साल्व्हेशन) मिळते, अशी मेथडिस्ट उपदेशकांची शिकवण आहे. पश्चात्ताप पावून परमेश्वराजवळ आपले पापनिवेदन (कन्फेशन) करण्याने नवजीवन प्राप्त होते, असा मेथडिस्ट धर्मसिद्धांत आहे. प्रॉटेस्टंट पंथांपैकी एक पंथ म्हणून १७८४ मध्ये मेथडिस्ट चर्चची स्थापना झाली. १९३९ मध्ये आजच्या स्वरूपात त्याची संघटना व पुनर्रचना करण्यात आली. या चर्चची सर्वसामान्य वार्षिक परिषद ही लोकशाही तत्त्वांनुसार सर्व धर्मगुरू व विशिष्ट परिसरातील प्रतिनिधी मिळून कार्य करते.

बाप्तिस्मा व प्रभुभोजन हे दोनच धार्मिक विधी येशू ख्रिस्ताने नेमून दिले आहेत, असे मेथडिस्ट मानतात. धर्माच्या वैयक्तिक अनुभवावर ते विशेष भर देतात व सर्व जग तारले जाईल वा सर्व जगाला मुक्ती मिळेल, अशी आशा ते बाळगतात. ख्रिस्ती धर्माने सांगितल्याप्रमाणे जीवन व्यतीत करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. मेथडिस्ट अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ४,१५,००,००० (१९६१) आहे.

अँग्लिकन चर्च : इंग्लंडमध्ये धर्मसुधारणेनंतर जी संसद (पार्लमेंट) स्थापन झाली, तिने १५२९ ते ३६ च्या दरम्यान केलेल्या विविध कायद्यातच अँग्लिकन चर्चचा अथवा ‘चर्च ऑफ इंग्लंड’ चा जन्म झाला. रोम येथील पोपच्या अधिकारक्षेत्रापासून वेगळे व स्वतंत्र असे इंग्लंडचे राष्ट्रीय चर्च म्हणून ते स्थापन झाले. चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रेरणेवर आधारलेल्या आणि एकच विश्वास व एकच कार्यपद्धती असलेल्या वेगवेगळ्या देशांतील अँग्लिकन चर्चेसचा मिळून एक ‘अँग्लिकन गट’ बनला आहे. इंग्लंडच्या चर्चचे धर्मसिद्धांत हे प्रामुख्याने युक्र ऑफ कॉमन प्रेअरवर म्हणजे ‘समान प्रार्थने’वर आधारित आहेत. ख्रिस्ती धर्माचे विभाजन होण्यापूर्वीचे ‘मतांगीकार’ (क्रीड्स) ह्या पुस्तकात आहेत तसेच ’३९ सिद्धांत’ (थर्टिनाइन आर्टिकल्स) मधील धर्मसिद्धांतही इंग्लंडच्या चर्चने स्वीकारले आहेत. ह्या ’३९ सिद्धांतां’चे विवरणही त्यांनी कॉमन प्रेअरच्या पुस्तकातील तत्त्वज्ञानाशी सुसंगत करून घेतले आहे. ख्रिस्ती चर्चच्या पहिल्या चार आमसभांमध्ये (जनरल कौन्सिल्स) झालेले ठराव व सुरुवातीचे बिशप व रोमन धर्मगुरू ह्यांनी लावलेला बायबालचा अर्थ ह्यांनाच ह्या पंथात प्रमाण मानण्यात येते. पोपची चर्चवरील सर्वंकष सत्ता तसेच ख्रिस्ती धर्मसिद्धांत आणि नीतिमूल्ये ह्यांबाबत नवीन तत्त्वे घोषित करण्याचा एकट्या पोपचा सर्वंकष अधिकार अँग्लिकन चर्चला मान्य नाही. तसेच रोमन कॅथलिकांची तत्त्वे व आचारनियमही हा पंथ स्वीकारत नाही. पंथात प्रार्थनाविधी प्रादेशिक भाषेत करतात. रोमन कॅथलिक पंथ व अँग्लिकन पंथ ह्यांच्यातील हे प्रमुख भेद आहेत. त्यामानाने ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च आणि अँग्लिकन चर्च यांत मतभेद कमी आहेत. तथापि अँग्लिकन गटातील चर्चेस प्रॉटेस्टंट गटातील चर्चेसपासून मात्र बरीच वेगळी आहेत. कारण अँग्लिकन पंथात त्यांच्या धर्मगुरूंना दीक्षा देण्यासाठी पहिल्या बारा अपॉसल्सच्या परंपरेतीलच बिशप असावा लागतो. दुसरे म्हणजे अँग्लिकन चर्चच्या प्रार्थनाविधीची रचना आणि स्वरूप हे धर्मसुधारणापूर्व काळातील प्रार्थनाविधीचे भाषांतर व त्याचीच सुधारलेली आवृत्ती ह्यांवर आधारित आहे. तिसरे म्हणजे कॅथलिक धर्मसिद्धांत आणि धर्मसुधारणेच्या आंदोलनानंतर बायबल व प्रवचन ह्यांवर देण्यात येणारा भर, ह्या दोहोंचेही मिश्रण अँग्लिकन पंथाच्या आध्यात्मिक भूमिकेत आढळते.

सतराव्या शतकापासून अँग्लिकन चर्चमध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक व चर्चविषयक दृष्टिकोन पुष्कळच व्यापक झाला. अठराव्या शतकात झालेल्या पुनरुज्जीवनाच्या (इव्हँजेलिकल रिव्हायव्हल) चळवळीमुळे धार्मिकतेची एक नवीन जाणीव आणि मनःपूर्वक धार्मिक सेवाकार्य करण्याची भावना उत्पन्न होऊन मिशनरी कार्याची त्यांच्यात वाढ झाली. धार्मिक शिक्षण आणि त्या काळातील सामाजिक व नैतिक दोष ह्यांबाबतच्या ख्रिस्ती जबाबदारीविषयीही सखोल जाणीव व्यक्तीत निर्माण झाली. जॉन वेस्ली आणि त्याचे अनुयायी ह्या कार्यात अग्रभागी होते. त्यांपैकी पुष्कळजण चर्च ऑफ इंग्लंडमधून बाहेर पडून मेथडिस्ट पंथात सामील झाले. अँग्लिकन चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. चार कोटी (१९६१) आहे.

काँग्रिगेशनॅलिझम : प्रॉटेस्टंट पंथाची चर्च व्यवस्थापना (पॉलिटी) व धर्मसिद्धांत ह्यांवरच हा पंथ आधारलेला आहे. चर्चच्या कारभारातील मूलभूत घटक म्हणजे स्थानिक चर्च होय, असे ह्या पंथाचे मत आहे व तेच त्याचे वैशिष्ट्यही आहे. केवळ धर्मसिद्धांत व श्रद्धा यांविषयीचीच परमेश्वराची इच्छा बायबलद्वारे कळते असे नाही, तर त्याद्वारे चर्चच्या व्यवस्थापनेविषयीची त्याची इच्छाही कळते, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. ह्या पंथाच्या संस्थापकांचा असा विश्वास होता, की अपॉसल्सच्या काळातील दैवी चर्चची जी व्यवस्थापना होती, तिचीच प्रतिमा ते निर्माण करीत आहेत.

स्थानिक चर्चच्या सभासदांना ‘ख्रिस्ती अनुयायी’ असे म्हणण्यात येते. ]ट्रिनिटीवर त्यांचा विश्वास आहे. बायबलला ते फार मान देतात. ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार आपले दैनंदिन वर्तन ठेवण्याच्या कराराने ते बांधले गेले आहेत. आपापले अधिकारी स्वतः नेमण्यास, नवीन व्यक्तींना चर्च व्यवस्थापनेत सभासदत्व देण्यास, चुकलेल्यांना शिस्त लावण्यास, स्वीकृत भाषेत आपला विश्वास प्रकट करण्यास व आपल्या कार्याची रूपरेखा आखण्यास स्थानिक चर्च संपूर्णपणे समर्थ असते, असा ह्या पंथाचा विश्वास आहे. पंथातील प्रत्येक स्थानिक चर्चला स्वायत्तता असते. स्थानिक प्रकरणांचा निकाल चर्चमधील सभासदांच्या मताधिक्यानुसार लावतात. येशू ख्रिस्त हाच प्रत्येक चर्चचा एकमेव अधिकारी मानण्यात येतो. येशू ख्रिस्त व चर्च ह्यांचा परस्परसंबंध येण्यासाठी बिशप किंवा प्रेसबिटर ह्यांच्यासारख्या मध्यस्थांची आवश्यकता आहे, असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे इतर प्रॉटेस्टंट पंथांत व रोमन कॅथलिक पंथात दिसून येणारी अधिकारश्रेणी ह्या पंथात आढळून येत नाही. परस्परांबद्दलची जबाबदारी व परस्परांच्या उपयोगी पडण्याची वृत्ती, ह्यांनीच केवळ ही चर्चेस एकत्रित बांधली गेली आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या संस्था, परिषदा आणि आमसभा स्थापन करून राष्ट्रीय यंत्रणा उभारण्याची काँग्रिगेशनल चर्चला मुभा आहे.

ह्या पंथाच्या धर्मसिद्धांतांचा उगम धार्मिक सुधारणेच्या आंदोलनात आहे. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८ – १६०६) पुष्कळशी कॅल्व्हिनिस्टिक सनातनी मंडळी अँग्लिकन चर्चमधून बाहेर पडली व १५६३ मध्ये त्यांनी हा पंथ स्थापन केला. चर्चमधील अधिकारश्रेणी व प्रार्थनाविधी यांचा त्यांनी निषेध केला. प्रार्थनापद्धती व व्यवस्थापना यांबाबतीत प्रस्थापित चर्च व रोमन कॅथलिक चर्च यांत काही फरक नाही, असे त्यांचे मत होते. ह्या पंथाच्या दृष्टिकोनाची तात्विक मांडणी प्रथमतः रॉबर्ट ब्राउनने (सु. १५५० – १६३३) केली. त्या दृष्टिकोनालाच नंतर ‘काँग्रिगेशनॅलिझम’ असे संबोधण्यात येऊ लागले. अनुयायांची जागतिक संख्या सु. ६० लक्ष (१९६१) आहे.


रिफॉर्मूड चर्च : ल्यूथरच्या पंथसंघटनेपेक्षा ⇨ हुल्ड्राइख त्स्व्हिंग्ली (१४८४ – १५३१) व जॉन कॅल्व्हिन यांची संघटना पसंत करणाऱ्या चर्चेसना ‘रिफॉर्मड चर्चेस’ म्हणण्यात येते. ह्यांतही त्स्व्हिंग्लीपेक्षा कॅल्व्हिन अधिक प्रभावी ठरलेला दिसतो. यूरोपमध्ये रिफॉर्मड चर्चेसना सर्वसाधारणपणे ‘कॅल्व्हिनिस्टिक चर्च’ असेच संबोधतात. कारण अनेक देशांत ल्यूथरन चर्चेसनाच प्रॉटेस्टंट चर्च म्हणतात. रिफॉर्मड चर्च व ल्यूथरन चर्च ह्यांच्यातील प्रमुख भेद प्रभुभोजनाच्या तत्वाबाबत आहे. प्रभुभोजनाच्या वेळी प्रार्थनापूर्वक भाकरी व द्राक्षरस घेण्यात येत असता, त्याचे रूपांतर प्रत्यक्ष ख्रिस्ताच्या शरीरात व रक्तात होते, असा काही पंथांचा विश्वास आहे तर ह्या भाकरीत व द्राक्षरसातच ख्रिस्ताच्या शरीराचे व रक्ताचे अस्तित्व आहे, असा इतर काही पंथांचा विश्वास आहे. रिफॉर्मड चर्चेस ह्या दोन्हीही विश्वासांना मान्यता देत नाहीत.

मिशनरी कार्य करण्यासाठी ज्या भौगोलिक सीमारेषा घालून दिल्या असतील, त्यांचे उल्लंघन न करणे तसेच मिशनरी कार्यात सहकार्य करून कार्यक्षमता निर्माण करणे, ह्या उद्देशाने जगातील सर्व रिफॉर्मड चर्चेसना एकत्रित आणणारी एक संघटना१८७५ मध्ये लंडन येथे स्थापण्यात आली. प्रेबिटेरियन मिशनरी पद्धतीच्या धर्तीवर ही संघटना उभारलेली असून, जवळजवळ १०० चर्चेस ह्या संघटनेची सभासद आहेत. अमेरिकेतील व यूरोपातील अनेक प्रॉटेस्टंट चर्चेस ल्यूथरन चर्चपेक्षा रिफॉर्मड चर्चमध्ये जाणेच अधिक पसंत करतात.

बॅप्टिस्ट चर्च : केवळ नव्या कराराच्या आधारावर ह्या चर्चेसची संघटना उभारली आहे. धार्मिक सुधारणेच्या काळापासून (सोळावे शतक) बॅप्टिस्ट पंथ हा स्वतंत्र पंथ म्हणून अस्तित्वात आहे. त्यांच्या मते खरा बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्तावरील विश्वासाची कबुली देणाऱ्या व्यक्तीला संपूर्णपणे पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देणे. ज्यांचा असा बाप्तिस्मा झाला आहे, म्हणजे ज्यांचा अशा तऱ्हेने पुनर्जन्म झाला आहे, त्याच व्यक्ती चर्चमध्ये येण्यास पात्र ठरतात. तथापि सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बाप्तिस्म्याच्या या पद्धतीवर विशेष भर देण्यात आला नाही. तसेच पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देण्याची पद्धतच सर्वांत चांगली आहे, असेही प्रतिपादण्यात येत नव्हते. एके काळी ह्या पंथाची ]अनाबॅप्टिस्ट पंथ अशी दुष्कीर्ती झाली होती परंतु प्रत्यक्षात मात्र अनाबॅप्टिस्ट पंथाशी त्याचा कधीच संबंध आला नव्हता. या पंथाच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. साडेपाच कोटी आहे (१९६१).

काही समान मूलभूत तत्त्वे : आतापर्यंत ख्रिस्ती धर्मातील काही ठळक पंथांचा स्थूलमानाने आढावा घेतला. किरकोळ भेदांवर आधारित असे लहानलहान पंथोपपंथ ख्रिस्ती धर्मात अनेक आहेत. त्या सर्वांचाच येथे निर्देश करणे शक्य नाही. ख्रिस्ती धर्मसिद्धांत व आचार पद्धती या बाबतींत जरी वेगवेगळ्या पंथांत भिन्नता दिसून येत असली, तरी धर्माच्या काही मूलभूत सिद्धांतांबाबत मात्र सर्वच पंथांत एकमत आहे. अपॉसल्सच्या मतांगीकारता ही तत्वे साकल्याने आली असून, ती पुढीलप्रमाणे आहेत :

प्रकटीकरण : (रिव्हीलेशन). परमेश्वराने स्वतःचे स्वरूप व स्वतःच्या इच्छा प्रकट केल्या आहेत आणि त्या बायबलमध्ये आढळतात.

ट्रिनिटी : परमेश्वर हा शाश्वत, अनाद्यनंत आणि चैतन्यरूप आहे. परमेश्वर एकच असून तो तीन समान व शाश्वत व्यक्तींच्या ठायी आहे. त्या तीन व्यक्ती पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या होत.

मानवी स्वरूप : मानवाला भौतिक व आध्यात्मिक अशी दोन्हीही रूपे असतात. त्याचा आत्मा अविनाशी असतो. मानवाने परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध पाप केले आहे, म्हणून परमेश्वराची पूर्ण सहभागिता त्याला मिळू शकत नाही.

येशू ख्रिस्ताचे स्वरूप : येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र. पवित्र ट्रिनिटीतील ही दुसरी शाश्वत व्यक्ती असून तिने मानवी देह धारण केला. ख्रिस्त ही दैवी व्यक्ती असून मानवी व दैवी ही दोन्ही स्वरूपे तिच्या ठायी एकरूप झाली आहेत. त्याने कुमारी मातेच्या पोटी घेतलेला जन्म, त्याच्या अनेक कार्यांतील दैवी चमत्कार, त्याचा लौकिक मृत्यू, पुनरुत्थान व स्वर्गारोहण ह्या घटना ऐतिहासिक दृष्टीने सत्य आहेत.

समेट : (रिकन्सिलिएशन). परमेश्वराचा व मानवाचा समेट घडवून आणणे, हा येशू ख्रिस्ताचा मानवदेह धारण करण्यामागील मुख्य उद्देश होता. त्याचे ते जीवनकार्य होते. ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान ह्यांद्वारे त्याने जे तारणाचे अथवा मुक्तीचे कार्य सिद्ध केले, त्याचा संबंध पवित्र आत्म्याच्या द्वारा मानवाशी येतो व मानवाचे पुनरुज्जीवन होऊन तो पवित्र होतो. परमेश्वर मानवावर जे प्रेम करतो, त्याच्या बदल्यात मानवाने आपल्या दुष्कृत्यांबाबत पश्चाताप पावून येशू ख्रिस्तावरचा आपला दृढविश्वास व्यक्त केला पाहिजे. परमेश्वराच्या दृष्टीने ख्रिस्ती अनुयायी निष्पाप ठरला, म्हणजे हा समेट पूर्ण होतो.

सहभागिता : (फेलोशिप). सहभागिता ही ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांना अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. चर्चच्या व्यवस्थापनेत ह्या सहभागितेचे दर्शन घडते. चर्चचे सभासद होण्यासाठी लहान मुलांना अथवा प्रौढ माणसांना बाप्तिस्मा देणे आवश्यक असते. बाप्तिस्मा घेताना प्रौढ व्यक्तींना ख्रिस्ती विश्वासाचा अंगीकार करावा लागतो. अशा ख्रिस्ती जनांची एकमेकांशी असणारी सहभागिता व त्यांची ख्रिस्ताशी होणारी सहभागिता ह्यांचा सर्वोच्च आविष्कार प्रभुभोजनात होतो.

देवाचे राज्य : (किंग्डम ऑफ गॉड). देवाच्या राज्याच्या विस्ताराची व त्याच्या अंतिम विजयाची आशा या तत्त्वात अभिप्रेत आहे. अलीकडे विविध ख्रिस्ती धर्मपंथांना आपली मूलभूत तत्वे एकच आहेत, ह्याची वाढती जाणीव होऊ लागली आहे व आपसांतील क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून सर्व पंथांत ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेतील अनेक चर्चेसनी हे ऐक्याचे काम करण्यासाठी ‘नॅशनल कौन्सिल ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट’ स्थापलेले आहे. ही सहकार्याची चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून येते. प्रॉटेस्टंट चर्चेस व ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चेस ह्यांनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ स्थापन केले आहे. भारतात दक्षिणेकडील अनेक ख्रिस्ती धर्मपंथ १९४७ मध्येच एकत्र आले आहेत व ह्या समूहाला त्यांनी ‘चर्चे ऑफ साउथ इंडिया’ असे नाव दिले आहे. उ. भारतातील युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया, अँग्लिकन चर्च, बॅप्टिस्ट चर्च, चर्च ऑफ ब्रेदरिन, डिसायपल्स ऑफ क्राइस्ट व मेथडिस्ट चर्च ही सहा वेगवेगळी चर्चेस ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ ह्या नावाने १९७० मध्येच एकत्र झाली आहेत.

संदर्भ : 1. Attwater, Donald, The Christian Churches of the East, 2 Vols., Milwaukee, 1961 – 62.

    2. Danielou, J. Marrou, H. The Christian Centuries : The First Six Hundred Years, New York, 1964.

    3. Hughes, Philip, A History of the Church, 3 Vols., London 1947.

    4. Neale, J. G. History of the Holy Eastern Church, 5 Vols., London, 1850.

    5. Schmemann, A. Historical Road of Eastren Orthodoxy, New York, 1963.

    6. Whale, J. S. The Protestant Tradition, Cambridge, 1955. 7. Zernov, N. Eastern Christianity, New York, 1961.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)