क्लेरोडेंड्रॉन : बागेत लावण्यास लोकप्रिय ठरलेल्या अनेक फुलझाडांच्या जातींचा अंतर्भाव असलेल्या हा वंश द्विदलिकित वनस्पतींच्या ⇨ व्हर्बिनेसी  कुलात समाविष्ट आहे व त्याची अनेक लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. या वंशात सु. १०० जाती असून त्यांचा प्रसार अमेरिकेतील उष्ण भागात थोडा पण उष्ण कटिबंधातील इतर भागांत अधिक आहे. त्या बहुधा वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) असून काही वेलीही आहेत. पाने संमुख (समोरासमोर), साधी, अखंड किंवा दंतुर, क्कचित बरीच मोठी व शिरांच्या जाळीदार मांडणीमुळे आकर्षक फुले विविधरंगी, सच्छद, कक्षास्थ किंवा अग्रस्थ वल्लरीवर किंवा परिमंजरीवर येतात. संवर्त घंटाकृती किंवा नलिकाकृती पुष्पमुकुट युक्तनखर, अनियमित केसरदले दीर्घद्वयी, चार, बहुधा बहिरागत किंजपुटात चार कप्पे व प्रत्येकात एक बीजक असते [→ फूल]. फळ गोलसर, अश्मगर्भी (आठळीयुक्त), कधी शुष्क व चतुष्खंडी असून तडकल्यावर चार अष्ठिका होतात पण कधी १–३ अष्ठिकांचा ऱ्हास होतो. क्ले. टॉम्सोनीक्ले. स्प्लेंडेन्स या वेली भारतात बागेत लोकप्रिय आहेत पांढरा संवर्त व लाल पुष्पमुकुट हे पहिल्याचे वैशिष्ट्य तर गडद शेंदरी (हिंगुळी) रंगाची फुले दुसऱ्यात आढळतात. क्ले. फ्रेग्रॅन्स याला सुवासिक पांढरी-जांभळी फुले व दुर्गंधी पाने असतात. वनजाईच्या [ क्ले. इनर्मी → जाई ] कुंपणाचा बागांना संरक्षक म्हणून चांगला उपयोग होतो शिवाय त्याला पाहिजे तसे कापून विविध प्राण्यांचे आकार देता येतात. ते निसर्गतः बहुधा समुद्रकिनाऱ्यावर वाढणारे आहे. क्ले. ॲक्युलिएटस या काटेरी जातीचे कुंपणही चांगले होते. ⇨ भारंगी (क्ले. सेरॅटम ) जंगलात आढळते व आपल्या निळ्या-जांभळ्या फुलांनी लक्ष वेधून घेते. ती औषधी आहे. भंडिरा (क्ले. इनफॉर्चुनेटम ) सुद्धा जंगली व औषधी आहे. (चित्रपत्र ५३).

चौगले, द. सी.

क्लेरोडेंड्रॉन टॉम्सोनी : फुलोऱ्यासह फांदी