क्लीओपात्रा : (इ. स. पू. ६९ ?–इ. स. पू. ३०) ईजिप्तमधील टॉलेमी घराण्यातील बहुंसख्य राण्या व राजकन्या ह्यांनी धारण केलेले विशेषनाम. यांतील ऑलीटीझ (वेणुवादक) या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टॉलेमीची मुलगी इतिहासप्रसिद्ध आहे. ती वडिलांच्या मृत्यूनंतर इ. स. पू. ५१ मध्ये ईजिप्तच्या गादीवर आली. तिने आपल्या अनुक्रमे लहान भावांबरोबर परंपरेनुसार लग्न करून संयुक्तपणे राज्यकारभार केला. पहिल्या भावाबरोबर तिचे पटले नाही. तेव्हा अंतस्थ कलहामुळे तिला कारावास भोगावा लागला. दरम्यान ज्यूलियस सीझर ईजिप्तमध्ये आला होता. क्लीओपात्राच्या पहिल्याच भेटीत त्याचे तिच्यावर प्रेम जडले. इ.स.पू. ४७ मध्ये सीझर रोमला परतला आणि काही दिवसांनी क्लीओपात्रा त्याची रखेली म्हणून रोमला गेली. तेथील राजकीय झगड्यात सीझरचा खून झाल्यानंतर ती ईजिप्तला परत आली. पुढे क्लीओपात्राच्या हालचालींची चौकशी करण्याकरिता अँटोनी ईजिप्तला आला असता, क्लीओपात्राच्या प्रेमात पडला. त्याने इ. स. पू. ३६ मध्ये आपल्या ऑक्टेव्हिया या पत्नीस घटस्फोट देऊन क्लीओपात्राबरोबर विवाह केला. यामुळे ऑक्टेव्हियाचा भाऊ ऑक्टेव्हियन याच्याबरोबर त्याचे वैमनस्य निर्माण झाले आणि दोघांत लढाई होऊन तीत अँटोनीचा पूर्ण पराभव झाला. तेव्हा अँटोनीने आत्महत्या केली. क्लीओपात्राने ऑक्टेव्हियनचे मन वळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर हताश होऊन इ. स. पू. ३० मध्ये स्वतःला सर्पदंश करून घेऊन तिने आत्महत्या केली.
तिने एकूण तीन सनदशीर विवाह केले. अँटोनीपासून तिला दोन जुळी मुले व सीझरपासून एक मुलगा झाला. सीझरपासून झालेला टॉलेमी सीझेरियन, ईजिप्तच्या गादीवर आला.
क्लीओपात्रा लावण्यवती नव्हती, पण आकर्षक असल्याची बोलवा आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि दुसऱ्यावर छाप पाडण्याची विलक्षण हातोटी, यांमुळे तिने तत्कालीन रथी-महारथींना आपलेसे केले होते. ती दुर्दम्य महत्त्वाकांक्षी व बहुश्रुत होती. चित्रकला, मूर्तिकला, धर्मशास्त्र, राजनीती, तत्त्वज्ञान, धर्म आदी विविध विषयांवर ती तत्कालीन तज्ञांबरोबर वादविवाद करी. तिला अनेक भाषा अवगत होत्या. भाषाचातुर्य व अप्रतिम अभिनय यांमुळे तिची कोणाही व्यक्तीवर तत्काळ छाप पडे. ती हुशार, कुशल, मुत्सद्दी, क्रुर आणि प्रसंगी उदार व प्रेमळही होती. स्वार्थापुढे नीति-अनीतीची ती तमा बाळगीत नसे. तिला वैभव व पुरुष यांचा हव्यास आणि आसक्ती होती व आयुष्यात एकच ध्यास होता तो म्हणजे ईजिप्तचे साम्राज्य आणि सम्राज्ञीपद. तिच्या रोमांचकारी जीवनाविषयी अनेक मान्यवर लेखकांनी लिहिले आहे. त्यांत शेक्सपिअर, शॉ इ. प्रसिद्ध नाटककार आहेत.
संदर्भ : 1. Thomas, Henry Thomas, D. L. Living Biographies of Famous Women, London, 1959.
2. Volkmann, Hans, Cleopatra : A Study in Politics and Propaganda, London, 1953.
देशपांडे, सु. र.
“