क्लार्किया : फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ⇨ ऑनेग्रेसी (शृंगाटक-शिंगाडा कुल) कुलातील एक वंश. यामध्ये सु. ३६ जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार उ. अमेरिकेतील प. भागात आहे. इतरत्र बागेत शोभेकरिता लावल्या जातात. अमेरिकेतील रॉकी पर्वत व त्या पलीकडचा प्रदेश याचे संशोधक लेविस यांचे सहकारी क्लार्क यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या वंशाला दिले आहे. या वनस्पती काटक, वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) व सुंदर ⇨ ओषधी असून लागवडीस सोप्या आहेत. गरम हलक्या जमिनीत, उन्हात किंवा काहीशा सावलीत त्या चांगल्या वाढतात. पाने साधी, एकाआड एक, बहुधा अखंड क्कचित दातेरी फुले नियमित, दिखाऊ, विविधरंगी, वरच्या पानाच्या बगलेत एकेकटी किंवा शेंड्यावर मंजरीत येतात. संवर्त नळीसारखा असून पाकळ्या चार, तळाशी अरुंद अखंड किंवा खंडित व खूप पसरट असतात. केसरदले आठ व त्यांपैकी निम्मी अविकसित, आखूड व इतरांशी एकाआड एक किंजल्क चार, मोठे व पसरट [→ फूल] बोंड लांबट, रेषाकृती व चौधारी. बागेत वाफ्यांमध्ये साधारण २० सेंमी. अंतरावर लावण्यात आणि फुलदाणीत ठेवण्यास या जाती चांगल्या असतात. लागवडीत असल्याने क्लार्कियाच्या जातींत बरीच सुधारणा झाली आहे.
जमदाडे, ज. वि.
“