क्लाईड नदी : स्कॉटलंडच्या पश्चिम भागातील महत्त्वाची नदी. लांबी १७० किमी. क्वीन्सबरी डोंगरात उगम पावून उत्तरेकडे व ईशान्यकडे वाहत जाऊन ती आयरिश समुद्राला मिळते. क्लाईड्सडेल या वरच्या सुपीक खोऱ्यात फळबागा आणि समृद्ध शेती असून लोखंड व कोळसा यांच्या खाणी आहेत. लॅनार्कजवळच्या चार धबधब्यांवर पाणवीज उत्पन्न करतात. हॅमिल्टन, ग्लासगो, रेनफ्रू, क्लाईडबँक इ. जहाजबांधणी, कापड, रसायने, यंत्रे वगैरेंच्या विविध कारखान्यांच्या शहरांनी गजबजलेल्या भागातून गेल्यावर डंबार्टन येथे ती फर्थ ऑफ क्लाईड नावाची रुंद खाडी बनते. ग्लासगो या प्रमुख औद्योगिक केद्रांपर्यंत सागरगामी नौका येतात. खाडीवर स्कॉटलंडची ग्रिनकप्रभृती बंदरे आहेत. अटलांटिकमार्गे होणाऱ्या व्यापारास क्लाईड फार उपयुक्त आहे.
कुमठेकर, ज. ब.