कृमि :अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या), कृश, हातपायादी अवयव नसलेल्या, मृदू शरीराच्या व लांबट आकाराच्या प्राण्यांना ‘कृमी’ असे म्हणतात. काही वेळा ही संज्ञा सरसकट सर्व कीटकांना स्थूल अर्थाने वापरतात.
कृमींपैकी कित्येक जाती परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या) आहेत. त्यांचे जीवनचक्र एक अथवा अधिक प्राण्यांच्या शरीरांत पूर्ण होते. निषेचित (फलित) अंड्यापासून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) तयार होतो. डिंभावस्थाही कित्येक कृमींच्या बाबतीत परजीवी असते. काही कृमिजातींमध्ये एकामागून एक अशा अनेक डिंभावस्थाही दिसतात. अर्ध किंवा पूर्ण विकसित कृमीपासून मनुष्यात रोगोत्पत्ती होऊ शकते.
कृमींच्या मुख्य तीन जाती आहेत,
(१) पृथुकृमी : (चिपट किंवा चपटे कृमी, प्लॅटिहेल्मिंथ) उदा.,यकृतातील ⇨ पर्णकृमी, ⇨ पट्टकृमी वगैरे.
(२) गोलकृमी : उदा., ⇨ जंत, अंकुशकृमी (तोंडात आकड्यासारखे भाग असलेले कृमी),
⇨ फायलेरिया (नारू व हत्ती रोग ज्यांपासून होतो ते कृमी) इत्यादी [→नारू हत्ती रोग].
(३) कंटकशुंड कृमी : (तोंडात काट्यासारखे आकडे असलेले कृमी). उदा.,⇨ ॲकँथोसेफाला. या जातीतील कृमींपासून मनुष्याला फारसा गंभीर स्वरूपाचा विकार होत नाही.
कृमींपैकी ज्यांच्यामुळे रोग उत्पन्न होतात, त्यांचे वर्णन त्या त्या शीर्षकाखाली दिले आहे.
ढमढेरे, वा. रा.
पशूंतील कृमी : मनुष्याप्रमाणेच प्राण्यांच्या आतड्यात चपटे व गोल कृमी विशेषकरून आढळतात. यांच्या विजाती पुष्कळ असून त्या सर्व बहुतेक पाळीव जनावरांत आढळतात. ते परजीवी असून प्राण्याच्या अन्ननलिकेतील खाद्यपदार्थ खातात व त्यामुळे प्राणी कृश होत जातो. त्याच्या वास्तव्यामुळे अन्ननलिकेत व्रण होतात व प्राण्यास इतर कृमिजन्य विकार संभवतात. गोल व चपट्या कृमींशिवाय यकृतात व जवळील पित्तनलिकेत पर्णकृमी सापडतात. या कृमींच्या जातींची व विजातींची नावे आणि वर्गीकरण लक्षणांवर आधारलेले आहे.
पट्टकृमी : या चपट्या कृमीच्या अकरा विजाती आहेत. मोनिशिया, एव्हिटेलिना व स्टायजेशिया या विजातींचे चपटे कृमी बकरी, मेंढी व गाईबैलांत नेहमी आढळतात व अर्धवट वाढलेल्या रूपात मध्यस्थ पोषकात (परजीवींच्या अपूर्ण अवस्था ज्या प्राण्यात पोसल्या जातात त्यात) मोठ्या आकाराचे पोकळ विभाग निर्माण करतात. इकिनोकॉकस विजातीचे कृमी अर्धवट वाढ झालेल्या स्थितीत लहान मोठ्या आकाराच्या द्रवयुक्त पिशव्यांमध्ये मेंढीच्या यकृतात व फुप्फुसात आढळतात तसेच ते बैल, गाई व बकऱ्या यांमध्येही आढळतात. कुत्र्यामध्ये डिपायलिडियम कनायनम या विजातीचे पट्टकृमी नेहमी आढळतात.
गोलकृमी: यात अनेक प्रकार असून ते स्वतंत्र राहतात किंवा परजीवी असतात. या प्रकारचे कृमी कुत्र्यांत, इतर प्राण्यांत तसेच कोंबड्यांतही आढळतात.
पर्णकृमी: या वर्गातील फॅसिओला हेपॅटिका कृमी मेंढ्या, गुरे व बकऱ्या यांच्या यकृतात व पित्तनलिकेमध्ये सापडतो. पॅरांफिस्टोमम सर्व्हाय हा गाईबैलांच्या रोमंथिकेत (रवंथ करणाऱ्या प्राण्यातील पोटाच्या पहिल्या कप्प्यात) विशेष आढळतो. यांशिवाय विशिष्ट जातींच्या कृमींमुळे निरनिराळ्या पशूंमध्ये होणाऱ्या रोगांची माहिती त्या त्या पशूंच्या नावांच्या नोंदींमध्ये दिली आहे.
पहा : जीवोपजीवन
गद्रे, य. त्र्यं.