गॅब्रो : पातालिक अल्पसिकत (खोल जागी बनलेल्या व सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) व भरडकणी अग्‍निज खडकांच्या गटाचे व खडकाचे नाव. हा खडक जड असून करडा किंवा काळसर दिसतो. कॅल्शियम अधिक असणारे प्लॅजिओक्लेज (लॅब्रॅडोराइट ते ॲनॉर्थाइट) फेल्स्पार व एकनताक्ष पायरोक्सीन (ऑजाइट) ही गॅब्रोची आवश्यक खनिजे असून बहुधा यात ऑलिव्हीन असते. शिवाय ॲपेटाइट, मॅग्‍नेटाइट, कृष्णाभ्रक, हॉर्नब्‍लेंड, इल्मेनाइट, क्रोमाइट किंवा स्पिनेल ही यातील गौण खनिजे होत. यात सिलिका ४५–५५ टक्के असून कॅल्शियम मॅग्‍नेशियम यांची  ऑक्साइडे बऱ्याच प्रमाणात असतात. याचे रासायनिक संघटन बेसाल्ट किंवा डोलेराइट यांच्यासारखे असते. याचे वयन (पोत) बहुधा ग्रॅनाइटाप्रमाणे समकणी असते. तसेच समावृत (एका खनिजाचे लहान स्फटिक दुसऱ्याच्या मोठ्या स्फटिकात अनियमीतपणे विखुरलेले असलेले) व सर्पचित्रित (पात्यासारखे प्लॅजिओक्लेजाचे स्फटिक सापेक्षतः मोठ्या पायरोक्सीन स्फटिकात पूर्णपणे सामावलेले असलेले) वयनही असते. कडांना समांतर किंवा गुरुत्वाकर्षणीय पट्टही ग्रॅब्रोत आढळतात. यांशिवाय कधीकधी त्यांच्यात विक्रियेने निर्माण होणाऱ्या धारा, गोलीय रचना व मंडलित रचना यासूक्ष्मदर्शकीय संरचनाही आढळतात.

अंतर्वेशने (घुसलेल्या), शिलापट्ट, स्तर, भित्ती, चादरी, स्कंध इ. रूपांत गॅब्रो स्वतंत्रपणे आढळतो. मात्र तो ग्रॅनाइटाइतका विपुल नाही. बदलांमुळे गॅब्रोपासून डायोराइट तयार होतो. कमी तापमानात व जास्त दाबाला हळूहळू थंड होणाऱ्या शिलारसाचे भूपृष्ठाखालीच स्फटिकीभवन होऊन गॅब्रो तयार झाले असावेत म्हणून ते भरडकणी असतात. हा शिलारस भूपृष्ठावर येऊन घनीभूत झाल्यास बेसाल्ट तयार होतात.

खनिजांवरून गॅब्रोचे विविध प्रकार पडतात. त्याच्यातील पायरोक्सीन समचतुर्भुजी म्हणजे हायपर्स्थीन असल्यास त्याला नोराइट म्हणतात. खडक जवळजवळ  संपूर्ण लॅब्रॅडोराइट फेल्स्पाराचा असल्यास त्याला ⇨ॲनॉर्थोसाइट  म्हणतात. पाच टक्क्यांहून जास्त नेफेलीन किंवा क्वार्ट्‌झ असणाऱ्या गॅब्रोला नेफेलिन क्वॉर्ट्‌झ गॅब्रो म्हणतात. थेरॅलाइट म्हणजे पाच टक्क्यांपेक्षा जास्त फेल्स्पॅथॉइड असलेला गॅब्रो होय. ऑलिव्हीन विपुल असणाऱ्या गॅब्रोला ट्रॉक्टोलाइट आणि त्यात लॅब्रॅडोराइटाऐवजी ॲनॉर्थाइट असल्यास यूक्राइट म्हणतात. हे चार प्रकार क्वचित आढळतात. गॅब्रोमध्ये पायरोक्सीन विपुल झाल्यास पायरोक्सीनाइट आणि पायरोक्सीन व ऑलिव्हीन हे प्रमुख घटक असल्यास पेरिडोटाइट तयार होतो, कृष्णाभ्रक, हॉर्नब्‍लेंड, इल्मेनाइट अथवा मॅग्‍नेटाइट ही गौण खनिजे विपुल झाल्यासही त्यांनुसार गॅब्रोचे प्रकार पाडतात.

गॅब्रोच्या अंतर्वेशनांजवळ कधीकधी निकेल, क्रोमियम, प्लॅटिनम किंवा क्वचित लोह यांची धातुके (कच्च्या स्वरूपातील धातू) आढळतात. खडी, बांधकामाचे दगड, ठराविक आकारमानाचे दगड यांच्याकरिता बऱ्याचदा गॅब्रो काढतात. याला काळा ग्रॅनाइटही म्हणतात. मऊ अर्थाच्या लॅटिन शब्दावरून गॅब्रो नाव पडले आहे.

पहा : अग्‍निजखडक.

ठाकूर, अ. ना.