क्रिस्तपुराण : इंग्रज धर्मोपदेशक ⇨फादर स्टीफन्स (टॉमस स्टीव्हन्स) ह्याचा ख्रिस्ती पुराणग्रंथ. १६१६ मध्ये तो प्रथम प्रसिद्ध झाला. त्यानंतर १६४९ आणि १६५४ मध्ये ह्या ग्रंथाच्या आणखी आवृत्त्या निघाल्या. त्याची मूळ मुद्रित प्रत मात्र आज कोठेही उपलब्ध नाही. एकूण ओवीसंख्या १०,९६२. बायबलच्या जुन्या करारातील ज्यूंच्या हकिकतीवर आधारित ‘पैले पुराण’ (अवस्वर किंवा अध्याय ३६, ओवीसंख्या ४,१८१) आणि नव्या करारातील क्रिस्तचरित्राधारित ‘दुसरे पुराण’ (अवस्वर ५९, ओवीसंख्या ६,७८१) असे ह्याचे दोन भाग आहेत. गोव्यातील उच्चवर्णीय हिंदूंचे ख्रिस्तीकरण होताच त्यांच्या नित्यपठणातील ग्रंथांवर बंदी असल्याने त्यांचे प्रतिपुस्तक म्हणून क्रिस्त पुराणाची रचना स्टीफन्सने केली. प्राचीन मरठी भक्तिकाव्याचा विशेषतः तथाकथित ज्ञानदेवकृत योगवासिष्ठाचा व विष्णुदासनामाकृत महाभारताचा-क्रिस्तपुराणावर विशेष ठसा आहे. बायबली कथा चौकटीवर खास मराठमोळा वेलविस्तार जन्माने इंग्रज असलेल्या एका कवीने करावा, हे विशेष लक्षणीय. करुणोदात्त क्रिस्तचरित्र, आदम-ईव्ह आख्यान, माता मेरीची वात्सल्यभक्ती, मॅग्दनेल मेरीची गुरुभक्ती, हेरोदीचे कौर्य, दाविदाचा रणावेश, सॉलोमनची गजान्तलक्ष्मी, बाप्तिस्ताचे हौतात्म्य, क्रिस्ताच्या उपदेशकथा इ. भाग रसाळ शैलीत लिहिले गेले आहेत. उपोद्‌घात मराठी भाषेचा गौरव ह्या कवीने केला आहे. तत्संबंधीच्या काही ओव्या अशा –

जैसी हरळांमाजि रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा ।

तैसी भासांमाजि चोखाळ । भासा मराठी ।।

जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी l कि परिमळांमाजि कस्तुरी ।

तैसी भासांमाजि साजिरी l मराठिया।।

पखिआंमधें मयोरु । व्रुखिआंमधें कल्पतरू ।

भासांमधें मानु थोरु । मराठियेसि।।

विसाव्या शतकाच्या आरंभी जोसेफ साल्ढाना ह्यांनी मंगळूर येथे क्रिस्तपुराणाची एक आवृत्ती रोमन लिपीत काढील (१९०७). अलीकडच्या काळात शांताराम बंडेलू ह्यांनी ह्या ग्रंथाची देवनागरी लिपीतील एक प्रत संपादिली आहे (१९५६).

मालशे, स. गं.