मर्ढेकर, बाळ सीताराम : (१९०९−२० मार्च १९५६). अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक. जन्म सातारा जिल्ह्यातील मर्ढे ह्या गावचा. त्यांचे कुटुंब परंपरेने रामदासी पंथाचे होते. त्यांचे वडील आरंभी शिक्षक होते पुढे ते शिक्षणक्षेत्रातील एक अधिकारी झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खानदेशात धुळे येथे (१९२०−२४) घेतल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले.१९२९ साली आय्‌. सी. एस्‌. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले परंतु ह्यात त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील वाङ्‌मयीन चळवळींचा त्यांनी अभ्यास केला. टी. एस्‌. एलियट, जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वूल्फ ह्यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांचा, तसेच क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, हर्बर्ट रीड ह्यांसारख्या समीक्षकांचा त्यांच्या वाङ्‌मयीन अभिरूचीवर आणि आकलनावर परिणाम झाला. लंडनच्या ‘किंग्ज कॉलेजा’त शिकत असताना प्राध्यापक जेम्स सदरलंड ह्यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर पडला. १९३२ साली ते भारतात परतले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे सहसंपादक; धारवाड, मुंबई, अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयांतील प्राध्यापक अशा नोकऱ्‍या त्यांनी केल्या; परंतु त्यांत ते रमले नाहीत. १९३८ साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओत नोकरी पतकरली आणि अखेरपर्यंत ते त्या नोकरीत राहिले. त्यांनी पहिला विवाह होमाई नल्लासेठ ह्या त्यांच्याच पारशी विद्यार्थीनीशी केला होता; तथापि तो सुखाचा झाला नाही. पुढे अंजना सिंहाल ह्या पंजाबी युवतीशी त्यांनी दुसरा विवाह केला. मर्ढेकर निरिच्छ, अलिप्त व अबोल वृत्तीचे होते. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

बा. सी. मर्ढेकर

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : कविताशिशिरागम (१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१); कांदबऱ्‍या−रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८); नाटकनटश्रेष्ठ (१९४४); संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७); समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्य आणि साहित्य (१९५५). 

मर्ढेकरांच्या शिशिरागम ह्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांवर रविकिरण मंडळाची−विशेषतः त्यातील माधव जूलियन् ह्यांची−छाया दिसून येते. तथापि काही कविता आणि आणखी काही कविता ह्या दोन संग्रहांच्या शीर्षकांप्रमाणेच त्यांतील कविताही वेगळ्या आहेत. अनेक पूर्वसूरींचे संस्कार पचवून त्यांतून स्वतःच्या कवितेचे अस्सल रसायन त्यांनी तयार केले आहे. जोष, ठसठशीतपणा, पुरूषी थाट आणि निर्भीडपणा ही ह्या कवितेची काही वैशिष्ट्ये रामदांसाकडून आलेली आहेत. तर शब्दांची मोडतोड, प्रतिमांची जुळवाजुळव, धक्का देणाऱ्‍या दोन विभिन्न कल्पनांची सांगड घालणे, ह्या गोष्टी हॉपकिन्झ, टी. एस्‌. एलियट ह्यांसारख्या कवींशी त्यांचा जवळचा संबंध दर्शवणाऱ्‍या आहेत. तसेच मर्ढेकरांच्या कवितेतून प्रत्ययास येणारा गूढ खिन्नपणा बालकवींची आणि आंम्ल कवी कोलरिज ह्यांची आठवण करू देतो. अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारांचे मर्ढेकरांनी पुनरुज्जीवन केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे निश्चित नाते आहे. उपर्युक्त दोन रचनाप्रकारांचा मर्ढेकरांनी जो स्वीकार केला, त्यामागील कारणे केवळ तांत्रिक नव्हती. ओवी-अभंग लिहिणाऱ्‍या संतांच्या मनोभूमिकेशी मर्ढेकरांची स्वतःची भूमिकाही अनेक ठिकाणी जुळत असल्याने दिसून येते. संतकवितेतून प्रत्ययास येणारी ईश्वरनिष्ठा, संसारातील वैयर्थ्याबद्दलची खात्री, पारलौकिक स्पर्शाची ओढ आणि गूढ उदात्तता ही सर्व वैशिष्ट्ये यंत्रयुगातील आणि युद्धोत्तर जगातील भेदक वास्तवाचे दर्शन घडवून मानवी जीवनाच्या अर्थशून्यतेची प्रचीती देणाऱ्‍या मर्ढेकरांच्या कवितेतही आढळतात, मर्ढेकरी कवितेच्या ह्या व्यापक संदर्भात केवळ अनुषंगाने आलेली तथाकथित दुर्बोधता आणि अश्लीलता हा यःकश्चित होती. परंतु मर्ढेकर कवी म्हणून वादग्रस्त ठरले, ते ह्या दोन गुणांमुळेच.  

मर्ढेकरांची नवकविता ही केशवसुत ते कुसुमाग्रज ह्या विस्तीर्ण स्वच्छंदतावादी कवितेविरुद्ध जोरदार प्रतिक्रिया म्हणून पुढे आली; परंतु स्वच्छंदतावादापेक्षा वरचढ असे तत्त्वज्ञान तिच्यात नव्हते. त्यामुळे तिच्यातून नवीन जीवनदृष्टी मात्र निष्पन्न झाली नाही. 

कवितेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही मर्ढेकरांनी नवे प्रयोग केले. रात्रीचा दिवस ही जेम्स जॉइस आणि व्हर्जिनिया वूल्फ ह्यांच्या कादंबऱ्‍यां पासून प्रेरणा घेऊन लिहिलेली कादंबरी . ह्या कादंबरीकारांनी वापरलेले संज्ञाप्रवाहाचे तंत्र मर्ढेकरांनी ह्या कादंबरीत वापरलेले आहे. दिक्‌पाल ह्या एका सहसंपादकाच्या जीवनातील काही तासांच्या संज्ञाप्रवाहाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. मात्र ह्या प्रयोगापेक्षाही तिच्यातील काव्यात्मकता जास्त तीव्रतेने जाणवते. वरवर असंबद्ध वाटणाऱ्‍या घटना आणि व्यक्ती दुसऱ्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर कशा विचित्र तऱ्‍हेने एकत्र येतात ह्याचे अत्यंत अलिप्त चित्रण मर्ढेकरांनी तांबडी माती ह्या कादंबरीत केलेले आहे. पाणी ही कादंबरी तांबडी माती ह्या कादंबरीच्याच पट्टीतली. तथापि तीत प्रतिमांचा सातत्याने आणि प्रभावी उपयोग करण्याचे तंत्र त्यांनी वापरले आहे. मराठी कादंबरीत काही नवता आणण्याचा त्यांचा प्रयत्नं असूनही त्यांच्या कादंबऱ्‍या यशस्वी ठरल्या नाहीत त्यांचा गवगवाही झाला नाही.  

पश्चिमी ऑपेरांपासून स्फूर्ती घेऊन मर्ढेकरांनी आपल्या संगीतिका लिहिल्या. नटश्रेष्ठ हे त्यांचे एकुलते एक नाटक. एका विख्यात, परंतु गतप्रभ नटाने लिहिलेले नायक, तो स्वतः त्यात नायकाची भूमिका वठवतो, तरी साफ पडते, हे या नाटकाचे कथानक. मर्ढेकरांच्या संगीतिकांचे आणि ह्या नाटकाचे यश त्यांच्या कादंबऱ्‍यांपेक्षाही क्षीण आहे. 

समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य ह्यांसारख्या ललित कलांसारखीच साहित्य हीही एक ललितकला असल्यामुळे साहित्यनिर्मितीत साहित्यसमीक्षा ही सौंदर्याशास्त्राच्या आधारे व्हावयास पाहिजे; इंद्रियसंवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्त्व अशी त्यांची भूमिका होती. संवाद, विरोध व समतोल ही सुंदर घाट उत्पन्न करणारी तत्वे मर्ढेकरांनी मांडली. सौंदर्याभावनेचे स्वरूप आणि सौंदर्यात्मक विधानांचे स्वरूपही त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ललितकृती ह्या पदवीस पात्र ठरणाऱ्‍या साहित्यकृतीची सांस्कृतिक निष्पत्ती शून्य असते; आधुनिक कालात मानव साध्यसाधनांच्या चक्रात गुंतलेला असल्यामुळे कलेला फारसे महत्त्व नाही; सत्य, उपयोगिता इ. मूल्यांपेक्षा सौंदर्याचे मूल्य म्हणून स्वतंत्र स्थान आहे; सौंदर्यासंवेदना हाच सौंदर्यापिपासेचा शेवट असतो; इंद्रियांची संवेदनाशक्ती प्रखर ठेवून पूर्णतः निर्मळ मनाने कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला, तरच सौंदर्याचा खराखुरा अनुभव मिळणे शक्य असते. सौंदर्यास्वादातही आनंदापेक्षा अनुभवाच्या समृद्धतेवर भर देणे, प्रस्तुत काळात तरी अधिक जरूरीचे आणि उचित, अशी मर्ढेकरांची सौंदर्य आणि साहित्य ह्यांविषयी सर्वसाधारण भूमिका होती. ‘खेड्यातील रात्र’ ह्या बालकवींच्या कवितेचे स्वतःच्या भूमिकेशी सुसंगत असे विश्लेषण त्यांनी करून दाखविले होते. आज मर्ढेकरांच्या विचारांतील अनेक उणिवा वा चुका दाखविल्या जातात; परंतु त्यांचे मोल मात्र जरूर मानले जाते. सौंदर्यशास्त्रीय विचारांत कलेतील माध्यमाच्या विचारापासून कलेतील साधनाचे स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. 

मराठीतील खूपसे वाङ्‌मय हिणकस आहे असे मर्ढेकरांना वाटे आणि ते तसे का आहे, ह्याचे विवेचन त्यांनी वाङ्‌मयीन महात्मता ह्या ग्रंथात केले आहे. मराठी लेखकांत आत्मनिष्ठा नाही, हे त्यांच्या मते, ह्या हिणकसपणाचे मूळ कारण होय. लेखकाच्या आत्मनिष्ठेचे त्यांना अभिप्रेत असलेले स्वरूपही त्यांनी ह्या पुस्तकात स्पष्ट केले व आत्मनिष्ठेच्या अभावी निकृष्ट साहित्य कसे निपजते, हे त्यांनी मराठीतील तत्कालीन काही प्रसिद्ध साहित्यिकांची उदाहरणे घेऊन प्रतिपादिले. 

मर्ढेकरांच्या वाङ्‌मयीन कर्तृत्वाचे महत्व त्यांच्या मृत्यूनंतरही जाणवत राहिले. मर्ढेकरपूर्व व मर्ढेकरकालीन साहित्य एकोणिसाव्या शतकातच गुंतून पडलेले आहे. मर्ढेकरांनी त्याला विसाव्या शतकात आणून सोडले. केवळ इंग्रजी साहित्याच्या ओंजळीने पाणी प्यायल्यास मराठी साहित्याची गुणवत्ता आणखी खालावत जाईल, ही महत्त्वाची जाण त्यांनी साहित्यिकांत उत्पन्न केली. नवी अभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच; परंतु समीक्षाक्षेत्रात सूक्ष्म व भेदक विश्लेषणाची गरज आहे, हे पटवून दिले. साहित्याप्रमाणेच इतर कलांचाही योग्य आदर केला पाहिजे, ही भावना त्यांनी रूजविली. साहित्य आणि सौंदर्य ह्या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक १९५६ साली मिळाले. मर्ढेकरांचा प्रभाव मात्र एका वर्तुळापुरताच मर्यादित राहिला, एका अर्थी मर्ढेकर-युग निर्माण होऊनही नवसाहित्याला एकसंध चळवळीचे स्वरूप मात्र प्राप्त होऊ शकले नाही.   

संदर्भ :  १. कुलकर्णी, द. भि. मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनःस्थापना, नागपूर, १९८२.

२. देशपांडे, धों. वि. मर्ढेकरांची कविता, मुंबई, १९८४.

३. पाध्ये, प्रभाकर, मर्ढेकरांची सोंदर्यमीमांसा, मुंबई, १९७०.

४. भागवत, श्री. पु. संपा. सत्यकथा (मर्ढेकर विशेषांक), मुंबई, मे, १९५६. 

कुलकर्णी, अनिरुद्ध