क्रियाचित्रण : (ॲक्शन पेंटिंग), एक अत्याधुनिक चित्रशैली. अमेरिकेत अप्रतिरूप अभिव्यक्तिवादी प्रणालीच्या प्रभावातून ज्या विविध चित्रशैली उदयास आल्या, त्यांतील ही एक महत्त्वाची चित्रशैली होय. ‘ॲक्शन पेंटींग’ ही संज्ञा हॅरॉल्ड रोझेनबर्गने ⇨ जॅक्सन पॉलकच्या (१९१२-५६) शैलीसंबंधी १९५२ मध्ये प्रथम वापरली. विशिष्ट गतिमान भावस्थितीमध्ये सहजप्रेरणानुसार होणाऱ्या हाताच्या हालचालींनुसार कुंचला जसा फिरेल तसा फिरू द्यावयाचा, त्यावर कोणतेही नियंत्रण वा पूर्णनियोजन लादावयाचे नाही, अशा प्रवृत्तीमधून जी स्वयंस्फूर्त व आकस्मिक चित्रनिर्मिती होते, तिच्या संदर्भात ह्या संज्ञेचा वापर झाला. पॉलकच्या चित्रणपद्धतीमध्ये जमिनीवर सैल पसरलेल्या चित्रफलकावर रंग फेकणे, फासणे, ठिबकवणे, रंगाचे शिंतोडे उडवणे, तसेच काठ्या, सुऱ्या, थाप्या आदी साधनांनी तो ढवळणे, अशा प्रक्रियांचा समावेश असे.  चित्रफलकाच्या सर्व बाजूंनी फिरून तो रंग देत असे. अप्रतिरुप कलेप्रमाणेच क्रियाचित्रणही वस्तुनिदर्शक नाही. मात्र ते स्वयंचलनाकडे अधिक झुकलेले दिसते. तरीही आकार व संवादित्व यांविषयीच्या काही अर्धसुप्त जाणिवा रंगांच्या स्वैर वापरातही प्रेरक ठरत असाव्यात. क्रियाचित्रणाचे तंत्र आणि भूमिका यांची मुळे ⇨ अतिवास्तववादात शोधता येतात. मॅक्स अर्न्स्टने रंग ठिबकविण्याच्या तंत्राचा वापर प्रसंगी आपल्या चित्रांत केला आहे तर ब्रताँच्या स्वयंचलनासंबंधीच्या विवेचनात आणि चित्रणतंत्रात कुंचल्याच्या स्वैर व अनिर्बंध वापरावर भर दिला आहे. कलानिर्मितीत बुद्धीप्रामाण्यापेक्षा जोमयुक्त सहजप्रेरणांचे प्राधान्य येथेही अभिप्रेत आहे. हान्स  होफमान या जर्मन अभिव्यक्तिवादी चित्रकाराचाही प्रभाव या तंत्रावर आढळतो. पॉलकखेरीज व्हिलेम दे कूनिंग (१९०४– ), रॉबर्ट मदरवेल (१९१५– ), फ्रॅन्झ क्लाइन (१९१०–६२), जेम्स ब्रुक्स (१९०६– ), जॅक व्टोर्कोव्ह (१९००– ), फिलिप गुस्ताँ (१९१३– ), ॲलन डेव्ही (१९२०– ) इ. चित्रकारांनी या तंत्राचा वापर केलेला दिसून येतो. फ्रान्समध्ये कॅरेल ॲपेल (१९२१– ) व सूलाजेस (१९१९– ) यांच्या चित्रांतही क्रियाचित्रण तंत्राचा प्रभाव आढळतो. या पंथाच्या जॉर्जेस मॅथ्यू या चित्रकाराने पॅरिसच्या नाट्यगृहात चित्रनिर्मितीचा जाहीर कार्यक्रम केला होता. (चित्रपत्र ३५).

पहा : अभिव्यक्तिवाद (अप्रतिरूप अभिव्यक्तिवाद).

इनामदार, श्री. दे.

'व्हिला आर्‌' (१९१९) - पॉल क्ले.'डेथ अँड फायर' (१९४०) - पॉल क्ले.क्रियाचित्रण : ' ब्ल्यू पोल्स ' अंशदृश्य (१९६३) - जॅक्सन पॉलक