क्रिमियाचे युद्ध : (१८५४–५६). मध्यपूर्वेतील प्रश्नांवर क्रिमिया ह्या ठिकाणी रशियाविरुद्ध ब्रिटन, फ्रान्स, सार्डिनिया आणि तुर्कस्तान ह्या ठिकाणी रशियाविरुद्ध ब्रिटन, फ्रान्स, सार्डिनिया आणि तुर्कस्तान ह्यांमध्ये झालेले युद्ध. ऑस्ट्रिया ह्यावेळी तटस्थ होता, तरी त्याचे धोरण रशियाविरोधीच होते. ह्या युद्धाची कारणे अनेक आहेत तथापि त्या सर्वांच्या मुळाशी रशियाची तुर्कस्तानाविषयीची आक्रमक वृत्ती हे सबळ कारण होय. ह्यावेळी पॅलेस्टाइनमधील ख्रिस्ती चर्चच्या संरक्षणाच्या हक्कांबद्दल ग्रीक चर्च व लॅटिन चर्च ह्यांत तेढ होती. रशियाकडे ग्रीक चर्चचे आणि फ्रान्सकडे लॅटिन चर्चचे नेतृत्व होते. १८५२ च्या एका तहाने देवस्थानाबद्दलचे हक्क फ्रान्सला मिळाले. त्यावर रशियाने क्यूच्यूक कायनार्जा येथील १७७४ च्या तहानुसार ह्या अधिकारांची मागणी केली. ह्यावेळी तुर्कस्तानने ब्रिटिश वकील रेडक्लिफ ह्याच्या सल्ल्याने ही मागणी धुडकावून लावली. ह्यामागे ब्रिटिशांचा हेतू रशियाच्या बाल्कन टापूतील कारवाया थांबविणे, हा होता. ह्याच सुमारास तिसरा नेपोलियन आपले स्थान स्थिर करण्यासाठी प्रयत्नशील होता. म्हणून त्याने कॅथलिकांचा पाठिंबा मिळविण्याची खटपट सुरू केली. या क्षुल्लक वादावरून क्रिमियाचे युद्ध पेटले. अर्थात युद्धाची खरी करणे राजकीय वर्चस्व, आर्थिक पेचप्रसंग, व्यापार व मोक्याची स्थाने आपल्या ताब्यात ठेवणे हीच होती.
रशियाने जुलै १८५३ मध्ये वालेकिया व मॉल्डेव्हिया ह्या तुर्की मांडलिक राज्यांवर स्वारी केली. सामोपचाराने रशिया थांबत नाही, असे पाहून तुर्कस्तानने युद्ध जाहीर केले. यापूर्वीच इंग्लंड-फ्रान्सने युद्ध जाहीर केले होते. रशियाने वालेकिया आणि मॉल्डेव्हिया येथून सैन्य काढून घेतले, तरी मित्रराष्ट्रांनी रशियाच्या भावी विस्ताराला पायबंद घालण्याच्या दृष्टीने क्रिमियातील सेव्हॅस्टोपोल १८५५ मध्ये काबीज केले. पॅरिसच्या ३० मार्च १८५६ च्या तहाने हे युद्ध विधिवत संपले. तहानुसार बेसारेबिया रशियाने मॉल्डेव्हियाला दिला. मॉल्डेव्हिया व वालेकियाला तुर्की साम्राज्यांतर्गत स्वायत्तता देण्यात आली. तुर्कस्तानच्या अंतर्गत राजकारणात इतरांचा हस्तक्षेप नसावा हे सर्वानुमते मान्य करण्यात आले आणि डॅन्यूब नदी, काळा समुद्र व दार्दानेल्सची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांना खुली करण्यात आली. मात्र युद्धनौकांस बंदी घालण्यात आली. तेथील वाहतूकव्यवस्था आंतरराष्ट्रीय आयोगाकडे सोपविण्यात आली. सार्डिनियाला युरोपीय राजकारणात स्थान मिळाले. त्यामुळे इटलीचे एकीकरण सुलभ झाले.
हे युद्ध म्हणजे एक राजकीय प्रमोद म्हणण्याची प्रथा नंतर पडली परंतु पॅरिसच्या तहावरून हे निदर्शनास येते, की विजेत्याच्या मुत्सद्देगिरीस पूर्ण यश मिळाले. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या युद्धांच्या सुमारास रणभूमीवर वार्ताहर पाठवून तेथील बातम्या प्रसृत करण्याची पद्धत पडली. त्यामुळे लंडन टाइम्समधील बातमी वाचून फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही अनेक स्वयंसेवकांसह क्रिमियाला गेली व तेथील रुग्णांची सेवा करून तिने रुग्णसेवेचा नवा आदर्श घालून दिला.
संदर्भ : Pemberton, W. B. Battles of the Crimean War, London, 1962.
देशपांडे, अरविंद