कुगर"

कूगर : मांसाहारी गणातील (कार्निव्होरा) मार्जार कुलातला (फेलिडी) सस्तन प्राणी. याला प्यूमा, माउंटन लायम (गिरिकेसरी पर्वतावरचा सिंह) अशीही नावे आहेत. सबंध दक्षिण व मध्य अमेरिका, उत्तर अमेरिकेचा अगदी दूरचा भाग आणि कॅनडा या प्रदेशांत हा प्राणी आढळतो.

 

पूर्ण वाढ झालेल्या कूगराची लांबी तीन मी.पर्यंत असते शेपटी ९० सेंमी. लांब असते वजन ९० किग्रॅ.पर्यंत असते नर मादीपेक्षा मोठा असतो. याचा रंग सिंहासारखा पिंगट असतो. कान आणि शेपटीचे टोक काळे असू शकते पोट पांढरे असते.

 

कूगर झाडावर चढण्यात पटाईत आहे. हा मांसाहारी असून हरणांसारख्या मोठ्या प्राणांची शिकार करतो, परंतु उंदरांसारखे लहान प्राणीही याला खायला चालतात. पाळीव जनावरांवरदेखील हा हल्ला करतो अगदी थोड्या वेळात १०–१२ मेंढ्या किंवा बकऱ्‍या तो सहज मारतो. याला एका वेळी खायला बरेच मांस लागते.

 

मादीची २-३ वर्षांनी एकदा वीण होते. गर्भावधी १३-१४ आठवड्यांचा असून मादी एका वेळी २-३ पिल्लांना जन्म देते. पिल्ले जन्माच्या वेळी आंधळी असून त्यांच्या अंगावर ठिपके व पट्टे आणि शेपटीवर वलये असतात, पण त्यांची जसजशी वाढ होत जाते तसतसे हे ठिपके, पट्टे आणि वलये नाहीशी होतात. मादी पिल्लांना ४–६ आठवड्यांनी पाजणे बंद करते, पण ती जवळजवळ प्रौढ होईपर्यंत आईबरोबरच असतात.

देशपांडे, ज. र.