कुवलयानंद, स्वामी : (३० ऑगस्ट १८८३–१८ एप्रिल १९६६). एक थोर शारीरिक शिक्षणतज्ञ व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. मध्यमवर्गीय कुटुंबात डभई (गुजरात) येथे जन्म. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि पुढील शिक्षण बडोदे येथे झाले. मॅट्रिकनंतर ते लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य चळवळीत सहभागी झाले. पुढे १९१० मध्ये त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बडोदे येथील माणिकराव यांच्याकडून मल्लविद्येचे व
माधवदास महाराज, मालसर यांच्याकडून योगविद्येचे शिक्षण घेतले. साहजिकच त्यांना मल्लविद्या, योग यांचा अभ्यास सर्वत्र व्हावा असे वाटू लागले. काही वर्षे बडोदे व अमळनेर या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचा व्यवसाय केला. उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. पुढे त्यांनी राष्ट्रीय शिक्षण कार्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने खानदेश शिक्षण मंडळात शिक्षकाचा पेशा पतकरला. अमळनेरला स्वतंत्र बाण्याचे राष्ट्रीय शिक्षण देणारे महाविद्यालय स्थापून त्याचे ते प्राचार्य झाले. त्यानंतर त्यांनी आपले सारे लक्ष शारीरिक शिक्षणाकडे केंद्रित केले. बलसंवर्धन, आरोग्यशिक्षण व व्याधिनिवारण या कामी योगशास्त्राचा सामान्य जनांस कसा उपयोग होईल, याविषयी ते पुढे प्रयोग करू लागले. त्यासाठी त्यांनी १९२४ मध्ये लोणावळा या ठिकाणी कैवल्यधाम नावाची योगशिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या पुढे मुंबई, राजकोट वगैरे ठिकाणी शाखा निघाल्या. आपल्या विविध प्रयोगांनी त्यांनी भारतेतर देशांचेही लक्ष वेधून घेतले. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी, म्हणून त्यांनी योगमीमांसा (१९२४) हे इंग्रजी त्रैमासिक काढले व आपले संशोधनपर लेख त्यामधून ते प्रसिद्ध करू लागले. त्यांची ही शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांस शारीरिक शिक्षण समितीचे सदस्यत्व १९२७ मध्ये देण्यात आले. १९३७ ते १९४२ च्या काळात ते समितीचे अध्यक्ष होते. युद्धोत्तर शैक्षणिक पुरर्रचनेचे सदस्यत्वही त्यांस दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३८ मध्ये शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाचे बारा वर्षे ते अध्यक्ष व केंद्रीय शारीरिक शिक्षण सल्लागार मंडळाचे ते अखेरपर्यंत सदस्य होते. महाराष्ट्राबाहेरील शारीरिक शिक्षण व व्यायाम शिक्षकांचे प्रशिक्षण यांतही त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या गुरुजींच्या नावाने श्रीमन् माधव योगमंदिर ही संस्था स्थापून योगिक शिक्षण-संशोधनाची सोय केली. उर्वरित आयुष्यात योग आणि योगाभ्यास हाच त्यांचा ध्यास होता.
योगासंबंधीचे आपले विचार त्यांनी ग्रंथांद्वारे सिद्ध केले. त्यांची योगासने (१९३१), प्राणायाम (१९६६) आणि योगिक थेरपी (१९६३, सहलेखक डॉ. सं. ल. विणेकर) ही इंग्रजी भाषेतील तीन पुस्तके अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांनी मराठीमध्ये सुदामदेवचरित्र (१९०४), काव्यरत्नावली (१९०४) व कुवलयानंदांची गाणी (१९१७) ही पुस्तके लिहिली. याशिवाय बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति (१९२९) व गोरक्षशतक (१९५८) हे दोन संस्कृत ग्रंथ संपादित केले. त्यांचे यौगिक संघव्यायाम (१९३६) हे हिंदीतून लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. वरील ग्रंथांव्यतिरिक्त त्यांचे अनेक संशोधनात्मक लेख आणि भाषणे प्रसिद्ध झाली असून योगमीमांसा या इंग्रजी त्रैमासिकाचे १ ते ७ खंड प्रकाशित झाले आहेत.
योगविद्येस अद्भुततेच्या वलयातून बाहेर काढून स्वामीजींनी तीस जी वैज्ञानिक बैठक तयार केली, त्यामुळे त्यांचा लौकिक झाला. आपले कार्य करीत असता, वयाच्या ८३ व्या वर्षी मुंबई येथे ते निधन पावले.
पहा : कैवल्यधाम.
घाणेकर, मु. मा.
“