कुलकर्णी, जी. ए. : (१० जुलै १९२३ –   ). स्वातंत्र्योत्तर काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार. पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. जन्म बेळगाव येथे. शालेय शिक्षण बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण तेथल्याच लिंगराज महाविद्यालयात. लिंगराज महाविद्यालयात अधिछात्र म्हणून निवड (१९४३). १९४६ पासून निरनिराळ्या महाविद्यालयांतून इंग्रजीचे अध्यापन. धारवाड येथील जनता कॉलेजमध्ये १९५० पासून इंग्रजीचे प्राध्यापक.

पहिला कथासंग्रह निळासावळा (१९५९) प्रकाशित झाल्यावर यांच्या कथेचे सामर्थ्य दिसून आले. ते म्हणजे कथेच्या अंतःस्वरूपात बदल घडवून आणण्याचे तिचे वेगळेपण. त्यानंतर पारवा (१९६०), हिरवे रावे (१९६२), रक्तचंदन (१९६६) आणि काजळमाया (१९७२) असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. यांपैकी निळासावळा आणि रक्तचंदन  या दोन कथासंग्रहांस महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. शिवाय रक्तचंदन  या संग्रहाला ललित मासिकातर्फे पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमीने १९७३ मध्ये काजळमाया  या संग्रहाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पारितोषिक दिले परंतु त्यांनी हे पारितोषिक परत केले.

जी. ए. यांना कथा हा साहित्यप्रकार आव्हान देणारा म्हणून प्रिय वाटतो. त्यांचे कथालेखन हा त्यांच्यापुरता एक शोध आहे. प्रसिद्ध रशियन कादंबरीकार डॉस्टोव्हस्कीप्रमाणे त्यांना मानवी जीवनाच्या अंतिम वास्तवाविषयी चिंतन करणे आवडते.  ‘माणूस नावाचा बेटा’, ‘राधी’,‘पराभव’, ‘गुंतवळ’, ‘प्रदक्षिणा’ यांसारख्या कथा एखाद्या दाट जंगलासारख्या असून त्या वाचकाला पार गुंतवून टाकतात, झपाटून टाकतात. अर्थहीन जगात माणूस किती केविलवाणा ठरतो, हे जसे त्यांच्या कथा वाचीत असताना ध्यानात येते  तसे जीविताच्या रखरखीत वाळवंटात प्रवास करणारी माणसे मायेच्या नाजूक धाग्यांनी बांधलेली असतात, हेही ध्यानात येते. 

जी. ए. हे चार भिंतींतील माणसांची कथा काव्यात्म शैलीने सांगतात आणि माणसामाणसांमधील भावबंधनाचे व त्यांना अगतिक, नगण्य बनवणाऱ्या नियतीच्या असीम शक्तीचे दर्शन घडवितात. ठिपका, विदूषक, दूत इ. रूपककथांचे रूप वेगळे. त्या मनाचा पिच्छा पुरविणाऱ्या दुःस्वप्‍नासारख्या वा अतिवास्तववादी चित्रासारख्या वाटतात. त्यांतून ते जन्ममृत्यू, नियतीचे सामर्थ्य, माणसाची जीवनेच्छा व या सर्वांतून जाणवणारे जीविताचे गूढ यांचे भेदक विश्लेषण करतात. त्यांना मानवी दुःख आणि मानवाची असत्‌प्रवृत्ती यांतून एक प्रकारची उग्रता व दाहकता जाणवते. त्यांचा जिवंत अनुभव त्यांच्या कथेतून उमलतो. त्यांच्या चांगल्या कथा लेण्यातील शिल्पासारख्या भव्य वाटतात. १९४५ नंतर उदयास आलेल्या मराठी नवकथेचा पुढचा एक विकसित टप्पा त्यांच्या कथासाहित्याने गाठला आहे.                                                                      

  फडके, भालचंद्र