ग्रेस : (१० मे १९३७–     ). आधुनिक मराठी कवी. खरे नाव माणिक गोडघाटे. जन्म नागपूरचा. नागपूर विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम्‌.ए.ची परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण सुवर्णपदकाचे मानकरी (१९६६). त्यानंतर दोन वर्षे नागपूरच्या ‘धनवटे नॅशनल कॉलेजा’त मराठीचे प्राध्यापक. १९६८ पासून नागपूर येथील ‘नागपूर महाविद्यालया’त प्राध्यापक. युगवाणी  ह्या ‘विदर्भ साहित्य संघा’च्या मुखपत्राचे ते काही काळ संपादक होते (१९७१–७४). त्यानंतर मुंबईच्या ‘रायटर्स सेंटर’ ह्या संस्थेच्या संदर्भ  ह्या द्वैमासिकाचे ते संपादक झाले. चोखंदळ वाङ्‌मयदृष्टी आणि व्यापक सामाजिक संदर्भ ह्यांचे भान ठेवून ह्या दोन्ही नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले व त्यांना अभिरूचिसंपन्न वाचकवर्गाचा प्रतिसाद मिळवून दिला.

संध्याकाळच्या कविता (१९६७) व राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांच्या आणखी काही कवितांचा संग्रह चंद्रमाधवीचे प्रदेश  ह्या नावाने प्रसिद्ध व्हावयाचा आहे. चर्चबेलमध्ये (१९७४) त्यांचे ललित निबंध आहेत.

ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी. तथापि त्यांच्या कवितेतील नवाई आणि उत्कट आत्मपरता भावात्म नादलयींच्या अंगाने बहरत गेली. त्या दृष्टीने मराठीतील भावकवितेच्या परंपरास्त्रोताशी तिचे जिवंत नाते असले, तरी तिची पृथगात्मकता वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. प्रस्थापित वृत्तांची चौकट अनेकदा स्वीकारूनही त्यांची कविता वृत्तांच्या आधीन झालेली दिसत नाही. त्यांच्या अशा कवितांतून भावबीजानेच वाढतावाढता वृत्ताचा आकार स्वाभाविकपणे धारण केल्याचा प्रत्यय मिळत राहतो, तर त्यांच्या मुक्त रचनांतूनही विविध संदर्भसमृद्ध भावानुभव आपापले घाट सहजपणे कोरीत जातात. इंद्रियसंवेदनांना रूप देणाऱ्या संपन्न प्रतिमासृष्टीमुळे त्यांची कविता पुष्कळदा सुंदर चित्रलिपीप्रमाणे भासते. अनेक संध्यारूपांतून आत्मरूपाचा शोध घेत जाणाऱ्या संध्याकाळच्या कविता  आणि एका विशिष्ट अनुभवव्यूहाचे दर्शन घडविणाऱ्या राजपुत्र आणि डार्लिंगमधील कविता ह्या दृष्टीने लक्षवेधी ठरतात. शब्दांचे माध्यम अत्यंत परिणामकारकपणे वापरूनही त्यांच्या कवितांतून काही वेळा मौनसदृश, पण भावस्पर्शी (लिरिकल) दुर्बोधता जाणवते. मृत्यू आणि एकटेपण ह्यांचे एक उदास भान आणि त्यांतून निर्माण होणारी करुणा हे त्यांच्या कवितेच्या मूलाशयाचे महत्त्वपूर्ण घटक होत. गद्य आणि काव्य ह्यांच्या सीमारेषेवर वावरणाऱ्या चर्चबेल  ह्या त्यांच्या ललितनिबंध संग्रहातही हा अनुभव येतो. ह्या भावकाव्यात्म निबंधांतून ग्रेस ह्यांच्या कवितांतील अनेक व्यक्तिगत संदर्भ आणि बंदिस्त जागा मोकळ्या झाल्यासारख्या वाटतात ह्या निबंधांचे व त्यांच्या कवितांचे दुवे एकमेकांत मिसळून गेलेले आहेत.संध्याकाळच्या कविता  ह्या संग्रहास १९६८ साली महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार (कवी केशवसूत पारितोषिक) लाभला.

कुलकर्णी, अ. र.