कुर्दिस्तान : इराण, इराक, तुर्कस्तान यांत विभागलेला कुर्द लोकांचा पठारी व डोंगराळ प्रदेश. हा मुख्यतः आग्नेय ॲनातोलियात आणि झॅग्रॉस पर्वतश्रेणीच्या वायव्य भागात मोडतो. पश्चिम इराणचा २८,१६१ चौ. किमी. क्षेत्रफळाचा आणि ६,२४,२५६ (१९६६) लोकसंख्येचा पठारी प्रदेशही कुर्तिस्तान याच नावाचा असून त्याची राजधानी सानांदाज आहे. सोव्हिएट ट्रान्सकॉकेशियाच्या नैर्ऋत्य आझरबैजानमध्येही या नावाचा छोटासा डोंगराळ विभाग असून, त्याचे मुख्य ठिकाण लाचिन आहे. सोव्हिएट आर्मेनियाच्या ॲरगॅट्सच्या डोंगराळ भागातही बरेच कुर्द लोक राहतात. हे लोक कडवे सुन्नी मुस्लिम असून, थोडी शेती करणारे परंतु मुख्यतः पशुपालक आहेत. ते दुसऱ्यांचे वर्चस्व न मानणारे व प्रसंगी क्रूर व लुटारूही आढळतात. ते पठारी भागात गहू व बार्ली यांचे व दऱ्याखोऱ्यांतून तांदूळ, मका, कापूस, तंबाखू, फळे यांचे उत्पन्न काढतात धान्य, फळे, कातडी, लोकर, गालनट यांची निर्यात करतात. सातव्या शतकात अरबांनी यांना इस्लामची दीक्षा दिली. कुर्दांच्या प्रदेशावर सेल्जुक तुर्क, मंगोल, इराण, तुर्कस्तान यांची सत्ता होती. पहिल्या महायुद्धानंतर कुर्दांचा स्वायत्ततेचा हक्क मान्य झाला. लोझॅनच्या तहात (१९२३) त्याचा उल्लेख न झाल्यामुळे १९२५ व १९३० मध्ये तुर्कस्तानात आणि १९४६ मध्ये इराणमध्ये त्यांनी उठाव केले परंतु ते दडपून टाकण्यात आले. कुर्दांची एकूण लोकसंख्या ३० लक्षांहून अधिक असावी.
कुमठेकर, ज. ब.