क्रिक, फ्रॅन्सिस हॅरी कॉम्पटन : (८ जून १९१६– ). ब्रिटिश जीवभौतिकीविज्ञ व आनुवंशिकीविज्ञ. डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाची [डीएनएची, → न्यूक्लिइक अम्ले ] रेणवीय रचना शोधून काढल्याबद्दल विल्किन्झ आणि वॉटसन यांच्या समवेत क्रिक यांना १९६२ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
त्यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्दॅम्प्टन येथे झाला. लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजातून १९३७ साली त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. पीएच्. डी करिता ते संशोधन करीत असताना दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यात खंड पडला. त्यांनी १९३९ पासून नौदलामध्ये शास्त्रीय विभागात आठ वर्षे कार्य केले. त्यावेळी त्यांनी पाणसुरुंगासंबंधी संशोधन केले. युद्धानंतर त्यांना मेडिकल रिसर्च कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळून केंब्रिजच्या स्ट्रेजवेज लॅबोरेटरीत दोन वर्षे त्यांनी कार्य केले. त्यानंतर त्यांनी १९४९ मध्ये पेरूट्झ यांच्या मार्गदर्शनाखालील मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या रेणवीय जीवविज्ञान प्रयोगशाळेत संशोधन केले. ह्या प्रयोगशाळेत महत्त्वाच्या बृहत्-रेणूवर संशोधन चालू होते. क्ष-किरण विवर्तनीय (अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून किरणांचा मार्ग बदलण्याच्या गुणधर्माचा उपयोग करणाऱ्या) विश्लेषण तंत्राचा उपयोग करून रेणुरचनेचा जीवविज्ञानीय दृष्टीने अर्थ लावण्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. विल्किन्झ यांनी स्फटिकविज्ञानाच्या मदतीने डीएनए रेणुरचनेविषयी अभ्यास केला होता. क्रिक व वॉटसन यांनी त्याचा अर्थ लावून ही रचना निश्चित केली. १९५४ मध्ये ते त्याच प्रयोगशाळेचे कायम सभासद झाले व त्याच वर्षी त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्. डी. मिळाली. त्यानंतर त्यांनी १९५३-५४ मध्ये ब्रुकलिन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रथिन रचनेविषयी संशोधन केले. १९५९ आणि १९६२ मध्ये ते रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यागत प्राध्यापक होते. १९५९ मध्ये लंडन रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९६०-६१ मध्ये ते केंब्रिज येथील चर्चिल कॉलेजचे फेलो झाले. १९६२ मध्ये ते कॅलिफोर्नियातील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीजचे सभासद झाले आणि त्याच वर्षी लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजचे फेलो झाले. त्यांनी अनेक शास्त्रीय निबंध लिहिले असून ऑफ मॉलिक्यूल्स अँड मेन (१९६६) हा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध आहे.
कानिटकर, बा. मो.