क्रॉमवेल, ऑलिव्हर : (२५ एप्रिल १५९९–३ सप्टेंबर १६५८). पहिल्या चार्ल्सच्या वेळच्या इंग्लंडच्या यादवी युद्धातील पार्लमेंट पक्षाचा एक सेनाप्रमुख. इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड यांच्या कॉमनवेल्थचा लॉर्ड प्रोटेक्टर म्हणून (१६५३–५८) तो प्रसिद्ध आहे. तो हंटिंगडन येथे जन्मला. त्याने केंब्रिज विद्यापीठात असताना
शिक्षण सोडले. १६२८ मध्ये तो प्रथम पार्लमेंटवर निवडून आला. त्याच्या घोडदळाने नेझ्बी येथे पहिल्या चार्ल्स राजाचा १६४५ मध्ये पूर्ण पराभव केल्यामुळे त्याच्याकडे सर्व सत्ता आली. त्याच्या इंडिपेंडंट पक्षाने चार्ल्सची चौकशी करून त्याला देहान्ताचे शासन दिले. इंग्लंडच्या इतिहासात प्रथमच क्रॉमवेलच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक राज्य सुरू झाले ‘रंप’ (अवशिष्ट) पार्लमेंटने हाउस ऑफ लॉर्ड्स बरखास्त केले. क्रॉमवेलची नेमणूक मुख्य सेनापती म्हणून करण्यात आली. क्रॉमवेलने १६५३ मध्ये पार्लमेंटच्या सभासदांना हाकलून प्यूरिटन पंथाच्या लोकांचे नवीन पार्लमेंट (बेअरबोन) भरविले. या पार्लमेंटने इन्स्ट्रूमेंट ऑफ गव्हर्नमेंट म्हणून नवीन संविधान तयार केले आणि क्रॉमवेलला प्रोटेक्टर नेमले. लवकरच त्याने पार्लमेंटही रद्द केले व लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने हुकूमशाही राजवट स्थापन केली. मात्र पुढे लोकमतासाठी त्यास नवीन पार्लमेंट बोलवावे लागले. बदलत्या परिस्थित्यनुरूप पार्लमेंटने देऊ केलेला राष्ट्ररक्षक (प्रोटेक्टर) हा किताब क्रॉमवेलने स्वीकारला आणि राज्याभिषेकाच्या पद्धतीनेच आपणास अभिषेक करून घेतला.
क्रॉमवेलने इंग्लंडला प्रथमच लिखित संविधान व अध्यक्षीय लोकसत्ताक राज्यपद्धती दिली. त्याच्या कारकीर्दीत धार्मिक सहिष्णुता वाढीस लागली, न्यायपद्धती सुधारली व इंग्लंडचा दरारा यूरोपात वाढला. हिवतापाने त्याचे लंडन येथे निधन झाले.
संदर्भ : Ashley, M. P. Ed. Cromwell, London, 1969.
राव, व. दी.
“